Saturday, January 24, 2026
Homeक्राईमAhilyanagar : नगरच्या डॉक्टरला दीड कोटींचा गंडा

Ahilyanagar : नगरच्या डॉक्टरला दीड कोटींचा गंडा

शेअर बाजारातील ‘लाभा’चा सापळा || गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शेअर बाजार आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास शंभर टक्के हमखास परतावा मिळेल, असे आमिष दाखवून नगर शहरातील एका डॉक्टरची तब्बल एक कोटी 60 लाख 40 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी केडगाव परिसरातील रहिवासी असलेल्या 64 वर्षीय डॉक्टरने दिलेल्या फिर्यादीवरून येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टर यांना एका अनोळखी व्हॉट्सअप क्रमांकावरून इन्व्हेस्टमेंट क्लबमध्ये सहभागी होण्याचा संदेश आला होता. शेअर मार्केट व आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत मोठा नफा मिळेल, असा दावा करण्यात आला. पुढे संबंधित व्यक्तींनी डॉक्टरांना एका बनावट ट्रेडिंगद्वारे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. सायबर गुन्हेगारांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने डॉक्टरांचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला 10 ते 20 टक्के नफा झाल्याचे खोटे आकडे अ‍ॅपवर दाखवले. त्यामुळे डॉक्टरांचा विश्वास बसला. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यांत विविध बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे भरण्यास भाग पाडले.

YouTube video player

दरवेळी अधिक नफा मिळवायचा असल्यास आणखी गुंतवणूक आवश्यक असल्याचे सांगत आरोपींनी डॉक्टरांकडून कोट्यवधी रुपयांची रक्कम उकळली. मात्र, जेव्हा डॉक्टरने आपली मूळ गुंतवणूक व नफ्याची रक्कम परत मागितली, तेव्हा विविध कारणे सांगून टाळाटाळ करण्यात आली. अखेर कोणतीही रक्कम परत न मिळाल्याने आपण फसवणुकीला बळी पडलो असल्याचे लक्षात येताच डॉक्टरने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. तपासात सदर गुंतवणूक अ‍ॅप पूर्णतः बनावट असल्याचे तसेच वापरण्यात आलेले बँक खाते क्रमांक संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी व्हॉट्सअप ग्रुपचा चालक, बनावट अ‍ॅप चालवणारे आरोपी आणि संबंधित बँक खातेधारकांविरोधात भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik BJP Politics : महापौर पदासाठी भाजप खेळणार ‘हा’ मोठा डाव;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापौरपदासाठी (Mayor Post) भाजपकडून (BJP) धक्कातंत्र वापरले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. पारंपरिक आणि सध्या विविध निकषांवर चर्चिल्या जाणाऱ्या...