डोंबिवली | Dombivali
डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ मध्ये झालेल्या भीषण स्फोटाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्फोटाच्या भीषण आवाजानंतर काही वेळातच आगीचे व धुराचे लोळ परिसरात उठले होते. या भीषण स्फोटाच्या दुर्घटनेत किमान ३९ कामगारांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर मृतांचा आकडा वाढला असून ६ जणांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. या दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
डोंबिवली एमआयडीसी फेज २ मधल्या कंपनीत मोठा स्फोट झाला ज्यानंतर कंपनीला आगीने वेढल्याने संपुर्ण कंपनी खाक झाली आहे. या आगीने जवळपासच्या तीन ते चार कंपन्यांनाही वेढले. या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली असून जीवीतहानी देखील झाली आहे. दोन महिलांसह सहा मृतदेह आढळून आले आहेत. तर आतापर्यंत ३९ जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर परिसरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. अजूनही कंपनीत दोन ते तीन जण अडकल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या आगीची तीव्रता जास्त असल्याने आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागत आहे.
हे ही वाचा : Dombivli MIDC Blast : डोंबिवलीमध्ये एमआयडीसीत भीषण स्फोट; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी
डोंबिवली सोनार पाडा परिसरातील एमआयडीसी फेस नंबर दोन मधील अंबर कंपनीतील बॉयलरचा मोठा स्फोट झाला, या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की त्याचा हादरा तीन ते चार किलोमीटर जाणवला, या कंपनीपासून २०० ते ३०० मीटर अंतरावर असलेल्या रहिवासी क्षेत्रातील इमारतींच्या काचा फुटल्या तसेच व्यावसायिक इमारतींचही मोठे नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री शिंदेंची आगीवर प्रतिक्रिया
डोंबिवली एमआयडीसी परिसरात कंपनी अगोदर आल्या मग वसाहत झाली, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान ब्लास्ट असणाऱ्या रासायनिक कंपन्यांना अंबरनाथमध्ये हलवण्यात येतील अशा निर्णय आम्ही घेतोय, असे मुख्यमंत्री म्हणाले.