नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युध्द आपण थांबवले असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार करत आले आहेत. भारताने त्यांचा दावा प्रत्येक वेळी फेटाळून लावला आहे. यादरम्यान बुधवारी पुन्हा एकदा ट्रम्प यांनी आपण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी केल्याचे म्हटले आहे. पण, यावेळी त्यांनी आणखी एक नवीन दावा केला आहे. ते म्हणतात की, त्यांनी दोन्ही देशांना ३५० टक्के शुल्क आणि पूर्ण व्यापारबंदीची धमकी दिली होती, ज्यामुळे दोन्ही देश घाबरले आणि युद्ध थांबवण्यास तयार झाले. ट्रम्प यांच्या दाव्यावर अद्याप भारताने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
यूएस-सौदी इन्व्हेस्टमेंट फोरममध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान एकमेकांवर आण्विक शस्त्रांनी हल्ला करणार होते. मी दोन्ही देशांच्या प्रमुखांना फोन केला आणि सांगितले की, हल्ला केला, तर मी दोन्ही देशांवर 350% शुल्क लावीन आणि अमेरिका तुमच्यासोबत कोणताही व्यापार करणार नाही. या इशाऱ्यानंतर दोन्ही देशांनी आम्हाला असे न करण्याची विनंती केली. मी त्यांना स्पष्ट सांगितले की, मला फरक पडत नाही. तुम्ही युद्ध थांबवा, तेव्हाच मी माझे शब्द मागे घेईन. माझा वाद मिटवण्यात चांगला हातखंड आहे, आणि मी नेहमीच तसा राहिलेलो आहे. अगदी यापूर्वीही मी अनेक वर्षांपासून खूपच चांगल्या प्रकारे ते केले आहे.
ट्रम्प यांच्या मते भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी त्यांना अशी कारवाई न करण्याची विनंती केली. त्यांनी दावा केला की याला उत्तर देताना ते म्हणाले की, “मी हे करणार आहे. माझ्याकडे परत या आणि मी ते हटवेन. पण मी तुम्हाला एकमेकांवर अण्वस्त्र डागू देऊन, लाखो लोकांची हत्या होऊ देणार नाही आणि ‘न्यूक्लियर डस्ट’ लॉस एंजेलिसवर तरंगू देणार नाही. मी हे करणार नाही.”
तसेच ट्रम्प पुढे बोलताना म्हणाले की, टॅरिफ लादण्यासाठी पूर्णपणे तयार होते. त्यांनी ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेन्ट यांना सांगितले होते की, त्यांनी संघर्ष मिटवण्यासाठी ३५० टक्के टॅरिफ लादावे आणि जर दोन्ही देशांनी युद्ध थांबवले तर आपण एक चांगला व्यापार करार करू, करण त्यावेळी दोन्ही देश अशा करारासाठी वाटाघाटी करत होते.
“आता हे दुसऱ्या कोणत्याही राष्ट्राध्यक्षाने केले नसते…. मी ही सर्व युद्धे थांबवण्यासाठी टॅरिफचा वापर केला, सर्वच नाही. अर्थव्यवस्थेमुळे, व्यापारामुळे आणि टॅरिफमुळे आठ पैकी पाच संघर्ष मिटले. हे मी केले,” असे ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांनी असेही म्हटले की, युद्ध थांबवल्यानंतर, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांना फोन करून त्यांचे आभार मानले आणि म्हटले की, त्यांनी लाखो लोकांचे जीव वाचवले आहेत. दरम्यान, ट्रम्प यांनी युद्ध थांबवल्याचा दावा करण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा हा दावा केला आहे. मात्र, भारताने यापूर्वीच स्पष्ट केले की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्यात तिसऱ्या देशांचा सहभाग नव्हता. पाकिस्तानच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने हल्ले थांबवले. पुढे ट्रम्प यांनी दावा केला की मोदी म्हणाले की, “आम्ही आता युद्ध करणार नाही.” यावर ट्रम्प पुढे म्हणाले की, त्यानंतर त्यांनी मोदींचे आभार मानले आणि , “चला एक करार करूया,” असा प्रतिसाद दिला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




