नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांना हरवून विजय मिळवलाय. या विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडातील पाम बीच इथे समर्थकांशी संवाद साधला. अमेरिकेसाठी हे सुवर्णयुग असल्याचे ते म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. हा इतिहासातील महान राजकीय क्षण असल्याच ट्रम्प यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प मतदारांना संबोधित करताना म्हणाले की, “आम्ही मतदारांसाठी सर्व काही ठीक करणार आहोत. हा एक राजकीय विजय आहे. असा विजय आपल्या देशाने कधी पाहिलेला नाही. ४७ वा राष्ट्रपती म्हणून प्रत्येक दिवस तुमच्यासाठी लढेन. हा अमेरिकेचा शानदार विजय आहे. अमेरिका पुन्हा एकदा महान राष्ट्र बनेल” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मी तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी लढेन. प्रत्येक दिवशी मी तुमच्या प्रत्येक श्वासासाठी लढेन. जोपर्यंत भक्कम, सुरक्षित आणि समृद्ध अमेरिका होणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसू शकणार नाही असेही ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सुवर्णयुग सुरू कऱण्याची शपथ घेताना म्हटले की, हे एक असे आंदोलन होते जे याआधी कधीच कुणी पाहिले नाही. खरे सांगायचे तर मला वाटते की आतापर्यंतचे हे सर्वात मोठे राजकीय आंदोलन होते. या देशात यापेक्षा मोठे कधी काही झाले नसावे.
एलॉन मस्क यांचे केले कौतूक
“लोकांनी अमेरिकेत परत आले पाहिजे पण कायदेशीररित्या. इथे उपस्थित असलेला प्रत्येकजण खास आणि महान आहे” असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी एलॉन मस्कच कौतुक केले. “मस्क कमालीचा माणूस आहे. एलॉन मस्कने जे करुन दाखवले, ते रशिया करु शकतो का?. चीन करु शकतो का?. कोणी अन्य असे करु शकत नाही” त्यांनी स्पेस एक्सच्या लॉन्चच सुद्धा कौतुक केले. अमेरिकन बॉर्डर सुरक्षित करण्याचा मुद्दा ट्रम्प यांनी पुन्हा मांडला.
डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. याआधी २०१६ च्या निवडणुकीत त्यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला होता. मात्र २०२० च्या निवडणुकीत ज्यो बायडेन यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला होता.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा