मुंबई | Mumbai
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताबद्दल कतार येथील दोहा येथून मोठे विधान केले आहे. यामध्ये ट्रम्प यांनी Apple चे सीईओ टिम कूक यांच्या ॲपल कंपनीला भारतात iPhone बनवण्यापासून मनाई केली आहे. ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ Tim Cook यांना सांगितले की, भारताला स्वतःचे हितसंबंध सांभाळू द्या. भारताने काही अमेरिकन वस्तूंवर शून्य शुल्काची ऑफर दिली आहे तर दुसरीकडे ॲपल भारतात आपली उत्पादन क्षमता वाढवण्याची योजना आखत असताना ट्रम्प यांच्याकडून हे विधान करण्यात आले आहे.
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ७ मे रोजी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. त्यानंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामध्ये, भारतीय वायू दलाने आपली ताकद दाखवून दिल्याने जगाचे लक्ष याकडे लागले होते. त्यातच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील कारवाया थांबल्याचे सांगितले. ट्रम्प यांनी ट्वटि करुन दोन्ही देशांनी शस्त्रसंधी केल्याचीही माहिती दिली. विशेष म्हणजे आपणच यात मध्यस्थी केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. त्यानंतर, वारंवार ट्रम्प यांनी तो उल्लेख करत, भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधी थांबवावी अन्यथा दोन्ही देशांसोबत अमेरिका व्यापार संबंध तोडून टाकेल, असा दबावच टाकल्याचे म्हटले. त्यानंतर आता ट्रम्प यांनी Apple बद्दल विधान केले आहे.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
ट्रम्प म्हणाले, “मी काल टिम कुकशी बोललो. मी म्हटले टिम, आम्ही तुमच्याशी खूप चांगले वागतोय. तुम्ही 500 अब्ज डॉलर्सची कंपनी बांधत आहात पण, आता मी ऐकले आहे की तुम्ही भारतात कारखाने बांधत आहात. तुम्ही भारतात येऊ नये असे मला वाटते. तुम्हाला भारताला मदत करायची असेल तर ठीक आहे पण, भारत जगातील सर्वात जास्त शुल्क असलेल्या देशांपैकी एक आहे, तिथे विक्री करणे कठीण आहे. भारताने आम्हाला एक करार दिला आहे ज्यामध्ये त्यांनी आमच्या वस्तूंवर कोणतेही शुल्क न लावण्याचे आश्वासन दिले आहे.”
ट्रम्प पुढे म्हणाले, “आम्ही तुम्हाला चीनमध्ये कारखाने बांधताना वर्षानुवर्षे सहन केले. आता आम्हाला तुम्ही भारतात बांधकाम करावे असे वाटत नाही. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो. ते खूप चांगले काम करत आहेत. आम्हाला तुम्ही अमेरिकेत बांधकाम करावे असे वाटते.” ट्रम्प यांच्यानुसार ॲपल आता अमेरिकेत 500 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसह उत्पादन वाढवेल. या संभाषणानंतर, आता अॅपल अमेरिकेत आपले उत्पादन वाढवेल, असा दावा ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आम्हाला भारतात तुमचा प्लांट बांधण्यात रस नाही. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो.”
ट्रम्प यांच्या विधानाचा अर्थ काय?
ट्रम्प यांचे हे विधान त्यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाचे प्रतिबिंब आहे. ॲपलसारख्या बड्या ब्रँडने अमेरिकेत गुंतवणूक करावी जेणेकरून तिथे नोकऱ्या वाढतील, अशी त्यांची इच्छा आहे. भारतात ॲपल फॉक्सकॉन आणि टाटा यांच्या सहकार्याने आयफोन बनवत आहे. २०२५ मध्ये भारतात तयार होणाऱ्या आयफोनपैकी १५ टक्के आयफोन अमेरिकेत पाठवले जाणार आहेत. ट्रम्प यांचे हे वक्तव्य भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी आव्हान ठरू शकते.
दरम्यान, ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे Apple च्या भारतातील उत्पादन योजना अडचणीत येऊ शकतात. सध्या अॅपल कंपनींकडून चीनवरील अवलंबन कमी करण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणावर iPhone उत्पादन केले जात आहेत. विशेष म्हणजे पुढील वर्षअखेरीस भारतातूनच अमेरिकेसाठी iPhone आयात करण्याची तयारी आहे. सध्या Apple ची एकही iPhone उत्पादन युनिट अमेरिका देशात नाही. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे आता आयफोन कंपनी खरेच अमेरिकेत उत्पादन सुरू करणार का, हे पाहावे लागेल.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा