नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिका आणि इराण यांच्यात अखेर युद्धविरामाची घोषणा झाली आहे. दोन आठवड्यांसाठी ही शस्त्रसंधी लागू असणार आहे. अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भूमिकेत अचानक बदल केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्यापुरती लष्करी कारवाई थांबवण्याची घोषणा केली. अमेरिका इस्रायल आणि इराण दरम्यान कोणताही बॉम्ब हल्ला केला जाणार नाही. मात्र असे असले तरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्ध खोर धोरणाविरोधात अमेरिकेत मोठे प्रदर्शन झाले. तर आता युद्धबंदी जाहीर केल्यानंतर डेमोक्रॅट्सच नाही तर रिपब्लिकन खासदारही ट्रम्प यांच्यावर तुटून पडले आहेत.
इस्रायलने इराणवर लादलेल्या युद्धात अमेरिकेने अचानक उडी घेतली होती. २८ फेब्रुवारीपासून चालू झालेल्या युद्धात सुरुवातीपासूनच अमेरिकेने आक्रमक भूमिका घेत इराणवर जोरदार हल्ले केले. इराणच्या नागरी पायाभूत सुविधांवर बॉम्बफेक करून नागरी जीवन विस्कळीत केले. एवढंच नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक अन् शिवराळ भाषेमुळेही हे युद्ध अधिक चर्चेत राहिले आहे. ट्रम्प यांच्या या कृतीमुळे जगात अमेरिकेची नाचक्की केल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर करण्यात आला आहे. डेमोक्रॅटिक खासदारांनी सोशल मीडियावर ट्रम्प यांना लक्ष्य केले आहे. हे खासदार लवकरच 25 व्या घटनादुरुस्ती आधारे ट्रम्पविरोधात महाभियोग आणणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
अमेरिकेतील एका गटाकडून युद्धविरामाच्या घोषणेवरून ट्रम्प यांच्यावर टीका होऊ लागली आहे. या संघर्षामध्ये डोनाल्ड ट्रम्प झुकले आणि त्यांनी इराणसमोर सरेंडर केले. इराणविरुद्धच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांचा पूर्ण पराभव झाला आहे. ट्रम्प यांनी इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीचे नियंत्रण देण्यास सहमती दर्शवली आहे. ही बाब संपूर्ण जगासाठी असामान्य आणि घातक आहे, अशी टीका अमेरिकेचे सिनेटर ख्रिस मर्फी यांनी केली आहे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
एपस्टीन फाईल्सवरून लक्ष हटवण्यासाठी युद्ध?
डोनाल्ड ट्रम्प यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. हे सर्व खासदार विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे असले तरी, ट्रम्प यांना यापूर्वी कधीही इतक्या व्यापक विरोधाच्या दबावाला सामोरे जावे लागले नव्हते, असे म्हटले जात आहे. एपस्टीन फाइल्समधील कृत्ये लपवण्यासाठी ट्रम्प यांनीच हे युद्ध सुरू केले, असा मतप्रवाह अमेरिकेत असल्याचे सांगितले जात आहे.
ट्रम्प विरोधात महाभियोग चालवणार?
डेमोक्रॅटिक खासदारांनी सोशल मीडियावर ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचे जाहीर केल्यानंतर लागलीच त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. वरिष्ठ सिनेटर, प्रतिनिधीगृहाचे काही सदस्य, महिला आणि पुरूष काँग्रेस सदस्य, माजी उपराष्ट्रपती आणि काही राज्यांच्या राज्यपालांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे. तर रिपब्लिकन खासदारही ट्रम्प यांच्या धोरणांवर आणि हडेलहप्पी स्वभावाने नाराज असल्याचे म्हटले जात आहे. या युद्धाने अमेरिकेत महागाई वाढवल्याचा दावा आता ट्रम्प यांच्या पक्षातूनही दबक्या आवाजात सुरू झाला आहे.




