नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच घेतलेल्या काही निर्णयांपैकी एक म्हणजे जगावर टॅरिफ वॉर लादणे! डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातल्या देशांवर वेगवेगळ्या प्रमाणात टॅरिफ लागू केले. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दुसरा झटका म्हणजे एलॉन मस्क यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनापासून स्वत:ला दूर ठेवण्याची घोषणा केली. त्यांनी बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट करत ही घोषणा केली. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना एकाच वेळी दोन हादरले बसले.. जगभरातील देशांना व्यापारासाठी धोका निर्माण करणाऱ्या टॅरिफ धोरणालाला अमेरिकेच्या फेडरल कोर्टाकडून बंदी घालण्यात आली आहे.
अमेरिकन कोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे. खुद्द ट्रम्प यांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेत टॅरिफ निर्णयाचे समर्थन केले होते. त्यांच्या या निर्णयावर जगभरातील अनेक देशांनी आक्षेप देखील घेतले होते. पण ट्रम्प टॅरिफ लागू करण्याच्या निर्णयापासून माघार घ्यायला तयार नव्हते. आता खुद्द अमेरिकेतल्याच न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे त्यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायद्याचा (IEEPA) वापर करून टॅरिफ लागू करणे, हे राष्ट्राध्यक्षांच्या अधिकारांवरील घटनात्मक मर्यादांचे उल्लंघन असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. “अमर्यादित टॅरिफ लागू करण्याचा अधिकार देणे हे सरकारच्या दुसऱ्या शाखेला कायदेविषयक अधिकार अयोग्यरित्या बहाल करण्यासारखे आहे,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. हा निर्णय ट्रम्प यांच्या ‘लिबरेशन डे’ टॅरिफ लागू करण्याच्या योजनेसाठी कायदेशीर धक्का मानला जात आहे.
एलॉन मस्क ट्रम्प प्रशासनातून झाले वेगळे
डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मित्र मानले जाणारे टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनापासून वेगळे होत असल्याची घोषणा केली. त्यांनी संघीय नोकरशाही कमी करण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेतला होता. पण आता ते डोनाल्ड ट्रम्प यांचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांची सरकारी जबाबदारी सोडत आहेत. ट्रम्प आणि मस्क यांची मैत्री अखेर तुटली. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू होती. आता एलन मस्क यांनी आपला निर्णय जाहीर केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




