Wednesday, June 26, 2024
Homeनंदुरबारवेषांतर करुन वाळू तस्करावर कारवाई

वेषांतर करुन वाळू तस्करावर कारवाई

दोंडाईचा – Dondaicha – श.प्र :

- Advertisement -

येथील अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांनी शिंदखेडा हद्दीतील बुराई नदीतून अवैधपणे वाळू उपसा करून वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरला वेषांतर करून हातनूर गावाजवळ पकडले. ट्रॅक्टर ताब्यात घेऊन जवळील चिमठाणे पोलीस आउट पोस्टला जमा केले. त्यांच्या कारवाईमुळे शिंदखेडा महसूल विभागापुढे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

शिंदखेडा तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून अवैध वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. मात्र याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अलाने, चिरणे, कदाने, येथील बुराई नदीतून अवैध वाळू मोठ्या प्रमाणात वाहतूक होऊन दोंडाईचा भागात पाठवली जात असल्याची तक्रार अनेक दिवसांपासून दोंडाईचा अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांच्याकडे नागरिकांनी केली होती.

त्यानुसार त्यांनी तलाठी संजीव गोसावी, तलाठी कोकणी, तलाठी भगत, तलाठी माजळकर, वाहन चालक युवराज माळी यांनी बुराई नदीतून कुठून रेतीचे वाहन जाते, याची रेकी केली. त्यायनंतर रात्री अलाने हातनूर येथील रोडवर वेषांतर करून दबा धरून साडेबारा वाजेच्या सुमारास शिंदखेडा तहसील हद्दीतील अलाने गावाकडून रेतीचे ट्रॅक्टर हातनूरकडे येतांना दिसले. त्याचा हातनूर गावाच्या वेशीवर येईपर्यंत पाठलाग करून हातनूर हद्दीत ट्रॅक्टरने प्रवेश करताच शिताफीने पकडले.

मिठेसिंग गिरासे (रा.अलाणे) असे चालकाने त्याचे नाव सांगितले. ट्रॅक्टर तहसीलदारांनी ताब्यात घेऊन चिमठाणे आउट पोस्टला जमा केले. एकुण 1 लाख 22 हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

फार्मुल्याची जोरदार चर्चा

तालुक्यातील वाळूबाबत तालुक्यात 26,11,17 (हजार) या फार्मुलाल्याची जोरदार चर्चा असून या प्रमाणे वाळूचे अर्थकारण चालत असल्याचे बोलले जात आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालण्याची मागणी जोर धरत आहे. या फार्मुलाल्याचे गुड काय? याबाबत तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या