अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने मतदार याद्यांमधील घोळ, चुकासमोर आणल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. अशा दुबार नावे असलेल्या मतदारांना शोधून त्यांच्याकडून कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेतला जाणार असून संबंधीत मतदारांकडून एकाच ठिकाणी मतदान करणार याबाबतचे हमीपत्र भरून घेण्यात येणार आहे.
दरम्यान श्रीरामपूर नगरपरिषदेसह जिल्ह्यातील अन्य नगरपरिषद निवडणूकीकरिता तयार करण्यात आलेल्या मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांची यादी निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाली आहे. ही यादी पालिकांची नोटीस बोर्ड आणि पालिकांच्या बेबसाईटवर अवलोकनार्थ प्रसिध्द करण्यात आलेली आहे. संभाव्य दुबार मतदाराला कोणत्या प्रभागात मतदान करावयाचे आहे. त्याबाबत संबंधित नगरपरिषदेस 6 नोव्हेंबरपर्यंत लेखी स्वरूपात अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे उचित्त कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
मतदार यादीत दुरुस्ती केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, असा इशारा राज्यातील विरोधी पक्षाने दिला. यासाठी मुंबईत मोर्चा काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने संभाव्य दुबार नावाबाबत उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. तिचे केवळ महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि ग्रामंपचायतींच्या निवडणुकासाठी प्रभागनिहाय; तसेच जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय विभाजन केले जाते.
या मतदार याद्यांचे विभाजन करताना विधानसभा मतदारसंघाच्या मूळ यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे आणि पत्ते कायम ठेवले जातात. संभाव्य दुबार नाव असलेल्या मतदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यास असा मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्या मतदाराकडून त्याचे नाव असलेल्या इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत आणि करणार नसल्याबाबत विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. अशा मतदाराची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला मतदान करण्याची मुभा देण्यात येईल, असे आयोगाने म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रारूप अथवा अंतिम मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर असे चिन्ह नमूद करण्यात येते. ही संभाव्य दुबार मतदारांबाबत स्थानिकरीत्या तपासणी करून ती खरोखरच एकाच व्यक्तीची आहे किंवा वेगळ्या व्यक्तींची आहे, याबाबत खात्री केली जाईल. मतदाराचे नाव, लिंग, पत्ता आणि छायाचित्राची प्राथमिक तपासणीनंतर त्यात साम्य आढळून आल्यास त्या मतदाराकडून तो नेमका कोणत्या प्रभागातील, जिल्हा परिषद निवडणूक विभागातील/पंचायत समितीच्या गणातील मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज घेतला जाईल. अशा मतदारास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही.




