Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Elections: दुबार मतदारांना कसं ओळखणार? काय आहे 'डबल स्टार'ची स्ट्रॅटेजी? राज्य...

Maharashtra Elections: दुबार मतदारांना कसं ओळखणार? काय आहे ‘डबल स्टार’ची स्ट्रॅटेजी? राज्य निवडणुक आयोगाचं मोठं पाऊल

मुंबई | Mumbai
महाराष्ट्रामधल्या नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या तसेच निकालाच्या तारखांची घोषणा केली आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने निवडणुक आयोगाने मोठी घोषणा केली आहे. या निवडणुकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या मतदार याद्या पारदर्शक करा अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यात दुबार मतदारावरून विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. त्यावरून राज्य निवडणूक आयोगाने मोठे पाऊल उचलले आहे. राज्यात ज्या मतदार याद्या आहेत त्यात जे संभाव्य दुबार मतदार असतील त्यांच्या नावासमोर डबल स्टार केले जातील. या मतदारांची ओळख पटवली जाईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.

राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे, ज्यासाठी आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. ७ नोव्हेंबरला मतदार याद्या जाहीर होणार आहेत. तर १० नोव्हेंबरपासून १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. यानंतर १८ नोव्हेंबरला अर्जांची छाननी होईल. तर २१ नोव्हेंबरपर्यंत उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार आहे. तर २ डिसेंबरला मतदान पार पडेल आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाने अजून जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा केलेली नाही.

- Advertisement -

दुबार मतदारांबाबत निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय
यावेळी पत्रकार परिषदेत दिनेश वाघमारे म्हणाले की, जिथे संभाव्य दुबार मतदार असतील त्यांच्या नावासमोर डबल स्टार असेल. हा मतदार कुठल्या केंद्रावर मतदान करेल त्याची नोंद केली जाईल. आमच्याकडे एक टूल आहे त्याआधारे संभाव्य मतदारांच्या नावासमोर डबल स्टार करण्यात आले आहेत. दुबार मतदारांपर्यंत राज्य निवडणूक आयोगाचे कर्मचारी पोहचतील. असा मतदार केंद्रावर आल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल. त्याला एकाच केंद्रावर मतदान करता येईल असे त्यांनी सांगितले.

YouTube video player

डबल स्टार म्हणजे काय?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात येते. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत याबाबत त्यांच्याकडून नोंद घेतली जाईल. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर अशा मतदारांकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेतला जाईल. त्या दुबार मतदाराने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही परंतु प्रतिसाद न मिळाल्यास संभाव्य दुबार नाव असलेला मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे हमीपत्र लिहून घेण्यात येईल. त्याचबरोबर या मतदाराची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल.

असे असेल निवडणुकांचे वेळापत्रक
नामनिर्देशन पत्र – 10 नोव्हेंबर
अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
छाननी – 18 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेण्याची तारीख – 21 नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह वाटप – 26 नोव्हेेबर
मतदान – 2 डिसेंबर
निकाल – 3 डिसेंबर
3 डिसेंबरला निकाल

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikदैनिक 'देशदूत' आयोजित गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६फला आजपासून (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी...