मुंबई : गेल्या दोन वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे संपूर्ण काम येत्या दोन वर्षांत पूर्ण करणार असल्याचे आश्वासन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. आज अजित पवार यांनी इंदू मिल ला भेट दिली, या भेटीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
आज सकाळी दादर येथील प्रस्तावित इंदू मिलला सकाळी भेट देऊन या कामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. यावेळी त्यांच्या बरोबर राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे भूमिपूजन २०१५ साली झाले होते. या मध्ये काय अडचणी आहेत याचा आढावा घेण्यासाठी आपण आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
या स्मारकासाठी काही परवानग्या बाकी असून त्या राज्य सरकारच्या अख्य्तारीत आहेत. मागच्या सरकारच्या निर्णयात काही बदल करायचा असल्याने मुख्यमंत्री महोदयांचे मत विचारात घेऊन त्याबाबत कॅबिनेट मिटींगमध्ये चर्चा करून निर्णय घेण्यात येतील.
या स्मारकासाठी सरकारकडून कुठेही पैसे कमी पडू देणार नाही.सर्व परवानग्या मिळाल्यानंतर प्रतक्ष कामास सुरवात होणार आहे. येत्या दोन वर्षात या स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल असे पवार यांनी ठामपणे सांगितले.
या स्मारकामध्ये पार्क वे कमी असल्याने ते वाढविण्यात येईल. त्याचबरोबर स्मारकातील पुतळ्याची उंची, पर्यावरणाच्या दृष्टीने ग्रीन बिल्डींग, सोलर सिस्टीम,चार लाख लीटरपेक्षा अधिक पाणी साठविण्यासाठी रेन वाटर हार्वेस्टिंग, बाजूला समुद्र असल्याने खाऱ्या वाऱ्याचा विचार करून त्या हवेत टिकतील अशी झाडे लावणे अश्या विविध बाबींचा आढावा अजित पवार यांनी घेतला.
या स्मारकासाठी शशी प्रभू हे वास्तुविशारद म्हणून काम पाहत असून बांधकामाची जबाबदारी प्रसिद्ध विकासक शापूरजी – पालनजी यांच्याकडे आहे. शासनाकडून सर्व परवानग्या मिळाल्यानंतर या महिन्यातच प्रतक्ष स्मारकाच्या बन्ह्कामास सुरुवात होईल.
सदर काम येत्या दोन वर्षात १४ एप्रिल २०२२ या बाबासाहेबांच्या जयंतीपर्यंत काम पूर्ण केले जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.