अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
बनावट कागदपत्रे सादर करून साडेआठ कोटींचे कर्ज प्रकरण करून अन्य संचालकांचा विश्वासघात केल्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी डॉ. राकेश गांधी (रा. पाईपलाइन रस्ता, सावेडी) आणि डॉ. आशिष अजित भंडारी (रा. सारसनगर) यांचे जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. लोणे यांनी नामंजूर केले आहे.
रेंज फौंडेशनच्या स्थापनेपासून डॉ. राकेश गांधी हे अध्यक्ष आहेत. बाबाजी हरी कर्पे पाटील प्रतिष्ठानमार्फत साई एंजल स्कूल, तवलेनगर, सावेडी हे चालविले जात आहे. त्यामध्ये अमित रसिकलाल कोठारी, डॉ. राकेश गांधी, डॉ. आशिष भंडारी हे विश्वस्थ आहेत. साई एंजल स्कूलच्या दुसर्या मजल्याच्या बांधकामासाठी डॉ. राकेश गांधी व डॉ. आशिष भंडारी यांनी 9 फेब्रुवारी 2023 ते 13 फेब्रुवारी 2024 या कालावधीत बनावट कागदपत्रांच्या आधारे साडे आठ कोटींचे कर्ज प्रकरण बँकेत सादर केले.
या कर्ज प्रकरणासाठी प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांचे बनावट ठरावही सादर केले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर अमित कोठारी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्ह्यात डॉ. गांधी व डॉ. भंडारी यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. अतिरिक्त सरकारी वकील यु. जे. थोरात यांचा युक्तिवाद ग्राह्यधरून न्यायालयाने दोघांचे जामीन अर्ज नामंजूर केले.