मुंबई | Mumbai
राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अनंत गर्जे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा दावा गौरी यांनी केला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गौरी आणि अनंत यांच्यामध्ये सतत भांडणे होत होती. अखेर या सगळ्याला कंटाळून गौरीने काल आत्महत्या केली. दरम्यान, आता या प्रकरणी वरळी पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे.
वरळी पोलिसांनी डॉ. गौरी पालवे आत्महत्येप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे- आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर त्रास देणे, अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. डॉ. गौरी पालवे यांना सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात होता. यामध्ये अनंत गर्जे यांच्यासह गौरी पालवे यांची नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे यांचा समावेश असल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबीयांनी केला होता.
गौरीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असा आरोपही गौरीच्या वडिलांनी केला आहे. याआधारे आता वरळी पोलिसांनी अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




