Sunday, May 31, 2026
HomeनगरAMC : मनपात योग्य व्यक्तीला योग्य जबाबदारी मिळाली

AMC : मनपात योग्य व्यक्तीला योग्य जबाबदारी मिळाली

नगरकरांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा निर्धार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

महानगरपालिकेतील पदाधिकारी व सभापती निवडीत यावेळी पहिल्यांदाच घोडेबाजार थांबला असून योग्य व्यक्तीला योग्य जबाबदारी मिळाली आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

अहिल्यानगर महानगरपालिकेतील स्थायी आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींच्या सत्कार समारंभाला डॉ. विखे पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी शहरातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत महापालिकेतील सत्तास्थापनेबाबत समाधान व्यक्त केले. डॉ. विखे पाटील म्हणाले की, अहिल्यानगरमधील जनतेने भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्पष्ट बहुमत दिले आहे. आपण आणि आमदार संग्राम जगताप यांनी नगरकरांना दिलेल्या आश्वासनांवर नागरिकांनी विश्वास दाखवला आहे. त्यामुळे आता आमच्यावरची जबाबदारी अधिक वाढली आहे.

महापालिकेतील सभापती निवड प्रक्रियेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, यावेळी पहिल्यांदाच घोडेबाजार थांबलेला दिसला. योग्य व्यक्तीला योग्य खुर्ची मिळाल्याचे समाधान आहे. आगामी काळात नगरकरांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यावेळी त्यांनी पुढे सांगितले की, स्व. अजित पवार यांच्या अनुपस्थितीतही राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. त्यांच्या माध्यमातून शहरासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत अहिल्यानगरचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तनपुरेंच्या वक्तव्यावर विखेंची फिरकी
राहुरी विधानसभा मतदारसंघाबाबत विचारलेल्या प्रश्नावर डॉ. सुजय विखे पाटील यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या वक्तव्यावर टोला लगावला. डॉ. विखे पाटील म्हणाले की, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या गटाचे अजित पवार यांच्या गटात विलिनीकरण होईल अशा चर्चा सुरू होत्या. आता थेट शरद पवार गट भाजपमध्ये विलीन होईल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. जर असे विलिनीकरण करण्याचा अधिकार त्यांच्या पक्षाने तनपुरेंना दिला असेल तर मला माहिती नाही. मात्र आमच्याकडून असा अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांनाच आहे. ते पुढे म्हणाले की, राहुरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा आहे. भाजप हा सर्वेक्षण आणि जनमतावर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्री जो उमेदवार देतील, त्यालाच आम्ही निवडून आणू. कोणालाही काहीही बोलण्याचा अधिकार आहे, मात्र राहुरीचा आमदार भाजपचाच होईल, असा दावा त्यांनी केला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी भाजपच्यावतीने चार उमेदवारी अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून भाजपच्यावतीने राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावे चार उमेदवारी अर्ज नेण्यात आले आहेत. हे...