Thursday, October 24, 2024
Homeनगरदडपशाही व गुंडगिरीच्या संस्कृतीत संगमनेर अडकले

दडपशाही व गुंडगिरीच्या संस्कृतीत संगमनेर अडकले

डॉ. सुजय विखे यांचा हल्लाबोल || विकास केवळ ठेकेदार पोसण्यासाठी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

दडपशाही व गुंडगिरीमध्ये संगमनेर तालुक्याची संस्कृती अडकली आहे. येथील विकास फक्त ठराविक कुटुंबाचे भले आणि ठेकेदार पोसण्यासाठी सुरू आहे. युवा संवाद यात्रा काढतात. पण तुमच्यासोबत युवा राहिला आहे का? असा थेट सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

हिवरगाव पावसा येथे आयोजित युवा संकल्प मेळाव्यात बोलताना डॉ.सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा आ.बाळासाहेब थोरात यांच्या कार्यपध्दतीवर हल्लाबोल केला. येथील जनता 40 वर्षे एकच भाषण कसे ऐकते? असा उपरोधीक सवाल करुन, तालुका आमचे कुटुंब असल्याची भाषा केवळ खोटी सहानुभूती मिळविण्यासाठी केली जाते, असा टोलाही त्यांनी लगावला. आमदारांनी तालुक्यातील जी गावे दत्तक घेतली, त्या गावांना एक रुपयांचा निधी त्यांनी दिला नाही. याच गावात मात्र विखे पाटील यांना मानणारे सरपंच निवडून येतात. आता त्यांच्याकडे दत्तक जाऊ नका. कारण त्यांच्या कुटुंबात जागा नाही, त्यांच्या कुटुंबात फक्त ठेकेदारांना संधी आहे. विखे पाटील परिवार तुमच्यासाठी समर्थ आहे. आमच्या गाडीत ठेकेदारांना नव्हे तर कार्यकर्त्यांना संधी आहे. अंगणवाडीच्या कामात सुध्दा पैसे खाणारे ठेकेदार यांनी निर्माण केले, हीच का तुमची संस्कृती याचे उत्तर आता जनता मागत आहे.

या तालुक्यात फक्त संस्कृतीवर भाषणं सुरू होतात. मात्र आमची संस्कृती जमीन हडपण्याची नाही. माजी महसूल मंत्र्यांनी गायरान जमीन स्वत:च्या संस्थांच्या नावावर करून घेतल्या. मात्र महसूल मंत्री ना.विखे पाटील यांनी साडे तीनशे कोटी रुपयांच्या जमिनी या अनेक गावांच्या विकासासाठी आणि औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी दिल्या. एकदा संस्कृतीवर चर्चा कराच, असे आव्हानही डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिले.

निळवंडे होऊ देत नाही, असे अनेक आरोप विखे पाटील परिवारावर झाले. स्व.बाळासाहेब विखे पाटील यांना बदनाम केले गेले. परंतु ‘भगवान के घर देर है अंधेर नही’. निळवंड्याचे पाणी मंत्री ना.विखे पाटील यांनीच आणून दाखविले. यासाठी ज्येष्ठ नेते पिचड यांचेही मोठे सहकार्य मिळाले. त्यांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. कधीतरी खरं बोलायला शिका, केवळ फ्लेक्स लावून स्वत:चा उदोउदो करून घेणारी ही माणसं शेतकर्‍याला पाणी देवू शकत नाही. आमच्या तालुक्यात आम्ही स्वत:च्या खिशातून पैसे घालून शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविले. परिवर्तन करण्याची हीच संधी आहे. महायुती सरकारने अनेक योजना दिल्या आहेत, त्याचा लाभ सर्वांनाच मिळाला आहे.

राजहंस दूध संघाला सुध्दा दूध अनुदानापोटी 14 कोटी रुपये दिले. येणार्‍या काळात यांच्या दडपशाहीची संस्कृती उखडून टाकण्याचे काम तुम्हाला करायचे आहे. निर्धार करा, या तालुक्याचा यंदाचा आमदार हा महायुतीचाच करायचा आहे, असे आवाहन डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले. याप्रसंगी रामभाऊ राहाणे, काशिनाथ पावसे, संदीप देशमुख, आरपीआयचे आशिष शेळके यांचीही भाषणं झाली. काही आ.थोरात समर्थक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या