राहाता | Rahata
शिर्डी आणि राहाता नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महायुतीमधील विखे पाटील गटात तिकीट वाटपावरून होणारी बंडखोरी रोखण्यासाठी आणि इच्छुक उमेदवारांची नाराजी दूर करण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी रविवारी सायंकाळी दोन्ही शहरांमध्ये महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत डिसिप्लिन पॉलिटिक्स आचारसंहिता जाहीर करून इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण केली.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या अनोख्या शैलीत कार्यकर्त्यांना खदखदून हसवले आणि त्याचवेळी गंभीर चेहरा करण्यासही भाग पाडले. उमेदवारी अर्ज दाखल करू इच्छिणार्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना त्यांनी मिश्किलपण कठोर शब्दांत कानपिचक्या दिल्या. विखे पाटील म्हणाले, अनेक इच्छुक उमेदवार स्वतःला स्वयंघोषित नगरसेवक व नगराध्यक्ष समजत आहेत. पण 17 तारखेला जर तिकीट कापले गेले, तर अतिउत्साही उमेदवारांना अॅडमिट करण्याची वेळ येईल. डीजेची बुकिंग, गुलाल आणि फटाक्यांचा खर्च देखील वाया जाईल.
त्यामुळे उमेदवारी मिळेलच म्हणून अति उत्साहीपणा दाखवू नका. डॉ. विखे पाटील यांनी उमेदवारांसाठी शिस्तीचे कठोर नियम जाहीर केले, ज्यामुळे अनेक कार्यकर्ते बैठकीनंतर अस्वस्थ झाल्याचे चित्र होते. जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही, तोपर्यंत कुणीही आपल्या मोबाईलवर किंवा सोशल मीडियावर उमेदवारीचे स्टेटस ठेवू नये. तसेच परस्पर उमेदवारी अर्ज दाखल करू नये. नियमांचे उल्लंघन करणार्या कार्यकर्त्यांसाठी संघटनेचे दरवाजे कायमस्वरूपी बंद करण्यात येतील. तिकीट न मिळणार्या उमेदवारांनी नाराज न होता पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार करावा. या निवडणुकीत बंडखोरी करणार्या उमेदवारांची देखील पक्षातून थेट हकालपट्टी केली जाईल.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना त्यांची ‘डिसिप्लिन पॉलिटिक्स’ आचारसंहिता नेमकी कशी असते, हे दाखवून दिल्याने या बैठकीची चर्चा दोन्ही शहरांमध्ये चांगलीच रंगली होती. इच्छूक उमेदवारांनी त्यांच्या या नियमांची गांभीर्याने दखल घेतल्याचे चित्र आहे.




