Friday, June 28, 2024
Homeनगरसुजय विखे यांनी घेतली फूल उत्पादक व विक्री व्यावसायिकांची बैठक

सुजय विखे यांनी घेतली फूल उत्पादक व विक्री व्यावसायिकांची बैठक

शिर्डी |प्रतिनिधी|Shirdi

- Advertisement -

शिर्डी परिसरात फूल विक्री कशी करावी व साई मंदिरात भक्तांनी अर्पण केलेली फुले व हार याची विल्हेवाट कशी लावावी याबाबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून साईबाबा संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीने त्याची कार्यपद्धती उच्च न्यायालयामध्ये जमा केली असून सगळ्यांच्या बाजू जाणून घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय देणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत फूल उत्पादक शेतकर्‍यांची व फूल विक्री व्यवसायिकांची बैठक घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

शिर्डीतील हॉटेल साई संगम येथे फूल विक्री व्यवसायिकांची तसेच हॉटेल शांती कमल येथे फुल विक्रेत्यांची स्वतंत्र बैठक डॉ. सुजय विखे पाटील यांनी आयोजित केली होती. डॉ. विखे पाटील म्हणाले, उच्च न्यायालयाने फुले विक्री करण्याबाबत साईबाबा संस्थान काय नियमावली करणार व साई समाधीवर अर्पण केलेल्या फुलांची विल्हेवाट कशी लावणार याबाबत संस्थानला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या प्रश्नाबाबत साई संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीने यापूर्वीच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयाकडे आपले म्हणणे मांडले आहे. याबाबत 12 जुलैला न्यायालयात सुनावणी असून फुल विक्री करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे.

या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही शेतकरी कोर्टामध्ये गेले होते. फूल विक्री कशी करावी यासाठी सर्वपक्षीय शेतकर्‍यांची एक कमिटी बनवली जाणार आहेत. त्या कमिटीत सर्व गावांचा समावेश असणार असून फूल उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही व भाविकांनाही वाजवी दरात फुले घेता येईल त्यासाठी समितीची नेमणूक करण्यात येणार आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून व ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेवरून फूल विक्री करणार्‍या शेतकर्‍यांना एक स्वतंत्र जागा दिली जाणार आहे. त्या ठिकाणावरून फूल उत्पादक शेतकरी फुलांची विक्री करणार आहेत. शिर्डीत भाविकांना अवाजवी फुलांची व हारांची विक्री केली जाते त्यामुळे अनेकदा भाविकांची व दुकानदारांची शाब्दिक चकमक होते.

यावर डॉ. विखे पाटील म्हणाले, असा प्रकार घडू नये यासाठी लवकरच नियमावली बनवली जाणार असून असा गैरप्रकार करणार्‍यांविरोधात कडक कारवाई करून कायदा मोडणार्‍यांना शिक्षा देखील केली जाणार आहे. साई दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी ग्रामस्थ व व्यावसायिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच येणार्‍या काही महिन्यातच शिर्डीतील वाढती गुन्हेगारी कमी कशी होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. 12 जुलै रोजी शिर्डीत फूल विक्री करण्यासंदर्भात उच्च न्यायालय जो निर्णय देईल तो आपल्याला मान्य राहील. मात्र उच्च न्यायालय फूल विक्री शेतकरी व व्यावसायिकांच्या भावना जाणून घेऊन सकारात्मक निर्णय देईल, अशी अपेक्षा डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, गोपीनाथ गोंदकर, ताराचंद कोते, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, मनसेचे दत्तात्रय कोते, गणेश कोते यांच्यासह फूल विक्रेते, शेतकरी तसेच शिर्डीतील व्यावसायिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

आमच्या कुटुंबावर साईबाबांचा सदैव आशीर्वाद आहे. माझ्या पराभवामागे बाबांचा काही उद्देश असावा बाबांनी जो न्याय दिला आहे तो समजून आपण परत समाजकार्याला लागलो आहे.
– डॉ. सुजय विखे पाटील

- Advertisment -

ताज्या बातम्या