Wednesday, June 26, 2024
Homeनगरआता आपल्यावरच विलीन..; डॉ. सुजय विखे यांच्या मिश्किल टिप्पणीची चर्चा

आता आपल्यावरच विलीन..; डॉ. सुजय विखे यांच्या मिश्किल टिप्पणीची चर्चा

राहाता |वार्ताहर| Rahata

- Advertisement -

त्यांना (काँग्रेस नेत्यांना) विलीन व्हा म्हणता, म्हणता आता आपल्यावरच विलीन होण्याची वेळ आली आहे, अशी मिश्किल टिप्पणी भाजपचे नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी केल्यानंतर तो चर्चेचा विषय ठरला आहे. मुस्लिम बांधवांच्यावतीने बकरी ईद सण उत्साहात साजरा केला. डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील ईदगाह मैदानावर हजेरी लावत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. शिर्डी शहरातील भारतरत्न डॉ.अबुल कलाम सेवाभावी संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास डॉ.विखे पाटील यांनी हजेरी लावली.

कार्यक्रमस्थळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन दुचाकीवरून परतण्याच्या तयारीत होते. तोच डॉ.सुजय विखे पाटील यांनी त्यांना आवाज देऊन थांबविले. हा कार्यक्रम राजकीय नाही, सामाजिक कार्यक्रमासाठी राजकीय नेत्यांनी पक्षभेद विसरून एकत्र आले पाहिजे, असे डॉ. विखे म्हणाले. यावेळी चौगुले यांनीही प्रतिसाद देत त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. या हास्यकल्लोळात डॉ. विखे यांनी चौगुले यांचा राज्यातील सर्वात जास्त जागा जिंकलेल्या पक्षाचे शहराध्यक्ष असा उल्लेख केला. त्यावर एका नेत्याने सचिन चौगुले यांनी आता विलीन व्हावे, अशी टिप्पणी केली. त्यावर डॉ. विखे म्हणाले, त्यांना विलीन व्हा म्हणता म्हणता आता आपल्यालाच विलीन होण्याची वेळ आली आहे. त्यांच्या या मिश्कील टिप्पणीवर एकच हास्यकल्लोळ उडाला.

राजकीय जोडे बाजूला ठेवून सामाजिक कार्यात एकत्र येण्याच्या भूमिकेचे स्वागतच राहील, अशी भूमिका मांडत चौगुले यांनी डॉ.विखे पाटील यांच्या मताशी सहमती दर्शविली. कार्यक्रमासाठी डॉ. विखे पाटील निमंत्रित होते. मात्र मी योगायोगाने आलो, असे म्हणत चौगुले यांनी डॉ.सुजय विखे पाटील पुढील काळात विकासात्मक दृष्टिकोन कायम ठेवून वाटचाल करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या