अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगरच्या विळद घाटात नवीन एमआयडीसी उभी करून मुलांना रोजगार देणारच, असा विश्वास व्यक्त करत लग्नात बुंदी वाटायची, कपडे धुव्वायचे, एसटी चालवायाची ही खासदारांची कामे आहेत? असा सवाल करत दुर्दैवाने मी अॅक्टींग करू शकलो नाही. तो माझा स्वभावच नाही, या शब्दांत भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खा. नीलेश लंके यांच्यावर टीकेची झोड उठवली.
अकोळनेर येथे डॉ. विखे पाटील, आ. शिवाजी कर्डिले आणि आ. काशिनाथ दाते यांचा सत्कार समारंभ झाला. यावेळी माजी खासदार डॉ. विखे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले की, दुर्दैवाने, मी राजकारणातील अभिनयगिरीत अपयशी ठरलो, पण प्रामाणिकपणे विकास कामे केली आणि करत राहीन. मला नाकारले गेले तरीही, माझी सेवाव्रताची भूमिका कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अकोळनेर येथे प्रतीक युवा मंचच्या वतीने आयोजित या सत्कार समारंभात डॉ. विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार कर्डिले, आमदार काशिनाथ दाते, आमदार पाचपुते तसेच लाडक्या बहिणींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. विखे पाटील म्हणाले, पारनेर विधानसभा मतदारसंघातील सत्तांतरामुळे तालुका सुरक्षित राहिला आहे. बीड जिल्ह्यात जे घडले, ते नगर जिल्ह्यात टळले. यासाठी मी पारनेरमधील महिलांसह समस्त जनतेचा मनापासून आभारी आहे. असे मत मांडून त्यांनी सत्तांतर समाजहितासाठी कसे गरजेचे होते आणि त्यासाठी नागरिकांनी दिलेला कौल कसा परिणामकारक ठरेल यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी साकळाई योजनेच्या अंतर्गत अकोळनेरला पाणी पुरवठा करण्याचा निर्धार देखील यावेळी बोलून दाखवला. ते म्हणाले, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा मंत्रिपद मिळाल्याचा जिरायत भागाला मोठा फायदा होणार आहे.
निश्चितच परिसरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेल व आ. कर्डिले आणि आ. दाते यांच्या सहकार्याने पाणीपुरवठा लवकरच पूर्ण होईल आणि समस्त शेतकर्यांचा महत्वाचा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल, असे स्पष्ट केले. 40 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या साकळाई योजनेचा प्रश्न ही सोडविला जाईल व नागरिकांच्या मागणीला यश मिळेल असे त्यांनी आश्वासन दिले. तसेच जो आपल्या गावासाठी पाणी देईल, त्यालाच पाठिंबा द्या, असे आवाहन देखील डॉ. सुजय विखे पाटील यांनी जनतेला केले. तसेच जो संकटाच्या काळात आपल्या बाजूने नाही, त्याला संघटनात स्थान नाही. असे देखील मत मांडून कठीण प्रसंगी साथ सोडणार्यांना त्यांनी टोला लगावला.