कोल्हार |वार्ताहर| Kolhar
दादागिरी व गुंडगिरीबाबत कोल्हार भगवतीपूरने सहनशीलतेची सीमा ओलांडली आहे. गावाचे गावपण संपविण्यात गावकरी जबाबदार आहेत. गावकर्यांनो वेळ द्या, थोडा त्यागही सहन करा. गावाचे चित्र बदलून दाखवतो. अशा शब्दांत माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्थांना आधार दिला.
मी आयुष्यात पहिल्यांदाच इतकी मोठी ऐतिहासिक ग्रामसभा पाहत आहे.जर गावाने आदर्श पाळला असता, तर ही वेळ आलीच नसती असे त्यांनी स्पष्ट केले. कोल्हार व भगवतीपूर येथे महिला सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न, वाढते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे प्रकार लक्षात घेता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. होते. या ग्रामसभेला प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अॅड.सुरेंद्र खर्डे, सरपंच निवेदिता बोरुडे, भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रेय राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे, डीवायएसपी शिरीष वमने, विविध पदाधिकार्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसभेला मार्गदर्शन करताना डॉ. विखे म्हणाले, गावातील प्लॉटिंग व जमीन व्यवहारात अंदाधुंदी दिसते. कोण विकतो, कोण विकत घेतो याचा तपास न करता फक्त पैशासाठी व्यवहार केले जात असल्याची गंभीर बाब आहे. गावात जे अवैध धंदे चालू आहेत ते सांगा, तिथे जेसीबी फिरवला जाईल. पोलिसांकडून न्याय मिळाला नाही, तर कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल. गावातील वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत पुढील दोन महिन्यांत पोलीस व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश दिले असून, अशा व्यक्तींना गावात व व्यापारात सहभागी होऊ देणार नाही. कोल्हार भगवतीपरचे गावपण गावकर्यांनीच नष्ट केले असून गावकर्यांनी आत्मपरीक्षण करावे असे आवाहन डॉ. विखे यांनीे यावेळी केले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची घोषणा त्यांनी केली. प्रत्येकाने यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. भास्करराव खर्डे म्हणाले, या गावाची ओळख यापूर्वी संवेदनशील गाव होती. पूर्वीचे हिंदू मुस्लिमांचे वाद आता राहिलेले नाहीत. मात्र आता दादागिरी व गुंडगिरी वाढत चालली आहे. थोरामोठ्यांची मानमर्यादा ठेवली जात नाही. विद्यार्थिनींना टारगट पोरं त्रास देतात. व्यापार्यांना अरेरावी करतात. गावातील भांडणे नामदार साहेब व सुजय दादांकडे गेल्यावर तात्पुरते नमती घेतात परंतु गावात आल्यावर पुन्हा त्यांची दादागिरी सुरू होते. आम्ही राजकीय गट विसरून गावकर्यांबरोबर राहू असे आश्वासन डॉ. खर्डे यांनी दिले.
सुरेंद्र खर्डे म्हणाले, भगवती देवीच्या पावन भूमीवर अशी सभा घ्यावी लागते हे दुर्दैव आहे. डॉ. विखे यांनी सांगितले होते, सभेला मी स्वतः हजर राहील. गुंडगिरीपायी वस्त्यांवरील शेतकर्यांना गावात येण्याची भीती निर्माण झाली आहे. दोन-तीन वर्षापासून गावातून मुली पळवून नेण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. याप्रसंगी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. स्थानिक पातळीवर अनेक ठराव याप्रसंगी संमत करण्यात आले