Tuesday, May 28, 2024
Homeनाशिकविशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द; जाणून घ्या सविस्तर

विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द; जाणून घ्या सविस्तर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचे आज 27 ऑक्टोबर, 2023 रोजी प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीं समवेत झालेल्या बैठकीत दिली.

- Advertisement -

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी निमित्त आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत मंगरूळे, तहसिलदार (निवडणूक) मंजूषा घाटगे, नायब तहसिलदार राजेश अहिरे, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यावेळी म्हणाले की, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मतदार याद्यांचे आज 27 ऑक्टोबर, 2023 रोजी प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच 27 आक्टोबर ते 9 डिसेंबर, 2023 दरम्यान दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत शनिवार 4 नोव्हेंबर, रविवार 5 नोव्हेंबर, शनिवार 25 नोव्हेंबर व रविवार 26 नोव्हेंबर, 2023 या चार दिवशी मतदार नोंदणीसाठी विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.

8 ते 19 वयोगटातील मतदार नोंदणीचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने विशेष मोहिम हाती घेतली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात येणार असून नवयुवकांमध्ये मतदार नोंदणीसाठी जनजागृती केली जाणार आहे. यातून नवमतदांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे मतदार याद्यांची तपासणी करून त्यात जर काही त्रुटी असतील त्यांची पूर्तता त्वरीत करण्यात येईल. शासकीय कर्मचाऱ्यांची दुबार नावे वगळण्याबाबत प्रशासनामार्फत लवकरच परिपत्रक काढून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी सांगितले. तसेच वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी तसेच सर्व पात्र मतदारांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी केले.

नाशिक जिल्ह्यातील मतदार यादींचे विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाची संक्षिप्त माहिती

 •  सन 2024 सालची अंदाजित लोकसंख्या – 72,61,159

 •  नाशिक जिल्ह्याची एकुण मतदार संख्या-46,50,640

 •  पुरुष मतदारांची संख्या-24,29,801 (52.25%)

 •  स्त्री मतदारांची संख्या- 22,20,758 (47.75%)

 •  तृतीय पंथी मतदारांची संख्या- 81

 •  प्रती हजार पुरुषांच्या मागे स्त्री मतदारांचे प्रमाण- 914

 •  एकुण दिव्यांग मतदारांची संख्या- 19,461 (0.42%)

 •  पुरुष दिव्यांग मतदार -12,094 (62.14%)

 •  स्त्री दिव्यांग मतदार – 7,367 (37.86%)

 •  18 ते 19 या वयोगटातील मतदारांची संख्या- 44,341 (0.85%)

 •  जिल्हयातील एकुण मतदान केंद्राची संख्या- 4,739

 •  पैकी शहरी भागातील मतदान केंद्राची संख्या- 1657

 •  ग्रामीण भागातील मतदान केंद्राची संख्या- 3082

 •  मतदान केंद्र ठिकाणांची (Location) संख्या- 4426

 •  शहरी मतदान ठिकाणांची संख्या- 1454

 •  ग्रामीण मतदान ठिकाणांची संख्या- 2972

 •  एकुण मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) संख्या-4739

 •  सर्वाधिक मतदार संख्या असलेला मतदार संघ- नाशिक पश्चिम

 •  सर्वात कमी मतदार संख्या असलेला मतदार संघ- देवळाली.

या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदार संघातील 4739 मतदान केंद्रांकरीता नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, नविन मतदार नोंदणीचे, मयत मतदार वगळणी, मतदार स्थलांतरण, मतदार तपशिलातील बदल या संदर्भातील दावे व हरकती स्विकारतील.

दिनांक 01/01/2024 या अर्हता दिनांकास ज्या मतदाराचे वय 18 वर्ष पुर्ण होत असेल तो मतदार नांव नोंदणीसाठी फॉर्म क्र. 6 भरुन मतदार नोंदणी करु शकतील, त्याशिवाय दिनांक 01/04/2024, 01/07/2024 व 01/10/2024 या अर्हता दिनांकास ज्या मतदाराचे वय 18 वर्ष पुर्ण होत असेल असा मतदार आगाऊ अर्ज भरुन देऊ शकतो.

मतदार नोंदणी संदर्भातील कामकाज हे ऑनलाईन स्वरुपात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे BLO App द्वारे करणार असुन Voter Helpline App किंवा voters.eci.gov.in या संकेत स्थळावर नागरीक स्वत: देखील त्याच्या नावाची मतदार यादीत नवीन नोंदणी, तपशिलातील दुरुस्ती करु शकेल.

ऑफलाईन अर्ज संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत स्विकारले जातील.

18 ते 19 या वयोगटातील नवमतदारांची 100% मतदार नोंदणी करुन घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांची मदत घेतली जाणार असुन प्रत्येक महाविद्यालयातुन पात्र 100% विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार.

महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी विशेष शिबिरे प्रत्येक गावी घेतले जाणार.

प्रारुप मतदार यादीचे प्रत्येक ग्रामसभेत वाचन करुन पात्र मतदारांची नोंदणी, मयत व कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांची वगळणीची कार्यवाही केली जाणार.

नाशिक जिल्ह्यात एकुण 15 विधानसभा मतदार संघ व 4739 मतदान केंद्र आहेत व एकुण 46,50,640 मतदार आहेत. पुरुष मतदार-24,29,801 व स्त्री मतदार-22,20,758 तर तृतीय पंथी 81 मतदार आहेत.

सैन्य दलातील 9187 मतदार असुन या कालावधीत सैन्य दलातील मतदारांची नांव नोंदणीची कार्यवाही ऑनलाईन स्वरुपात केली जाणार.

सर्वाधिक मतदार संख्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात असुन तेथे 4,33,782 मतदार आहेत तर सर्वात कमी मतदार संख्या देवळाली विधानसभा मतदार संघात 2,65,453 इतकी आहे.

मतदारांच्या अडचणी निराकरणासाठी टोल फ्री क्रमांक 1950 हा सुरु करण्यात आलेला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी 156 मतदान केंद्रांच्या खोल्या बदलवुन नवीन चांगल्या खोल्या घेण्यात आलेल्या आहेत.

सर्व पात्र मतदारांनी या विशेष पुनरिक्षण कार्यक्रम कालावधीत जर आपले नांव यापुर्वी कोठेही नोंदविलेले नसल्यास फॉर्म क्र.6 भरावा.

मतदार यादीतून नाव वगळावयाचे असल्यास फॉर्म क्र.7 सोबत मृत्यु दाखला जोडुन मयत व्यक्तीच्या नावाची मतदारयादीतुन वगळणी करुन घ्यावी.

आपल्या मतदार यादीतील नांव, वय, लिंग, पत्ता, फोटो या संदर्भातील दुरुस्ती फॉर्म क्र.8 भरुन करुन घ्यावी.

मतदार जर एका ठिकाणाहुन दुसरीकडे स्थलांतरीत झाला असल्यास फॉर्म क्र.8 भरुन मतदार संघ किंवा यादी भाग स्थलांतरीत करुन घ्यावा.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या