शिक्षकाच्या नजरेला मुलांच्या भावभावना टिपता यायला हव्यात. एक माणूस म्हणून सभोवतालच्या मुलांच्या वागण्यातील बदल समजून घ्यावेत. मुलांविषयी सजग राहिले की ते मनात आणि मनातून थेट कागदावर टिपता येते. अशाच यादगार भेटी तुमच्यापर्यंत पोहोचवणारे नवे कोरे सदर.
आमच्या शाळेत मुक्कामाची सोय नसल्याने मी शाळेपासून सहा-सात किलोमीटर असणार्या एका गावात राहायचे. त्यामुळे दररोज शाळेत मी दुचाकीने जायचे. माझ्या राहत्या ठिकाणापासून शाळेकडे जाताना एक आदिवासी पाडा लागायचा. पूर्ण ओसाड रस्त्यावर मधोमध असणारी दुतर्फा हलकीशी झाडी आणि पत्र्याने शाकारलेली घरे त्या ठिकाणी वस्ती असल्याचे संकेत देतात. त्या पाड्यापासून माझ्या शाळेच्याच रस्त्यावर साधारण दोन किलोमीटर अंतरावर जिल्हा परिषदेची मराठी शाळा होती. त्या शाळेत शिकणारी मुले रोज त्यांच्या पाड्यापासून शाळेत पायी जात असायची.
सकाळी शाळेत जाताना आणि शाळेतून घरी येताना मी एकटीच असायचे. जाताना रस्त्याने कोणी लहान मुले किंवा एखादी बाई किंवा वृद्ध व्यक्ती दिसली की त्यांना लिफ्ट द्यायची असा माझा उद्योग असायचा. ऑक्टोबर महिना होता. त्या दिवशी रोजप्रमाणे मी असेच शाळेत जात होते. पाड्यावरची दोन मुले आणि एक मुलगीदेखील शाळेत पायी जात असल्याचे मला दिसले. त्यांच्याकडे बघून अंदाज आला की ते सर्वजण पहिली अथवा दुसरीत असावेत. रस्त्याने जाताना एक रिकामे फ्रुटीचे पाकीट उडवत जाण्याचा त्यांचा खेळ सुरू होता. मी थोडे पुढे जाऊन थांबले.
मी : यायचं का रे? चल. पुढे शाळेत सोडते तुम्हाला.
एक मुलगा : नका. जावा तुमी पुढं.
मी : कारे? नीट चालवते मी गाडी. व्यवस्थित सोडेन शाळेत.
एक मुलगी : व्हय. पण घरच्यांनी सांगलय की वळख नसली की जायाच न्हाय.
मी : बरं, ठीक आहे. मी जाते माझ्या शाळेत. टाटा आणि बाय (मी गाडी काढताच दुसर्या मुलाने आवाज दिला.)
दुसरा मुलगा : म्हंजी, तू शाळेत हाय व्हय. कंच्या वर्गात हायेस.
मी : अरे, मी शिकत नाही. मी टीचर आहे. पण तसं म्हणशील तर मी पहिलीच्या वर्गात आहे.
माझ्या या उत्तरावर सर्व फिदीफिदी हसू लागले.हीच संधी साधत मी म्हणाले, चला, आता झाली ना ओळख. हसलो ना आपण सर्व? बसा पटकन. पुढे एकाने उभे राहा आणि मागे बसा दोघांनी. पटकन सोडते. कशाला उन्हात जाताय उगीच.
मुलं यायला तयार झाली. त्यांच्यासाठी गप्पा करणे सुरू झाले. सगळ्यात आधी ओळख परेड झाली. माझे नाव त्यांनी विचारून घेतले आणि मग त्यांनी त्यांची नावे सांगितली. गप्पा करताना लक्षात आले की ते तिघे चुलत भावंडे आहेत. त्यातील राधिका दुसरीला होती. ओमकार आणि श्रीकांत दोघे पहिलीला होते. गाडीवर आमच्या गप्पा सुरू झाल्या. राधिका पुढे बसली. ओमकार आणि श्रीकांत मागे बसले.
ओमकार : कुठं राहते तू?
मी : हे इकडे. पुढच्या गावाला. नांदूरशिंगोटेमध्ये.
राधिका : लग्न झालंय का तुझं?
मी : (अनपेक्षित प्रश्नाने चकित होऊन ) हो गं राणी. का…काय झालं?
(तितक्यात पुढचा प्रश्न)
श्रीकांत : पोरं बाळ किती? आमच्या मम्मीला आम्ही दोघं हाये. मी अन् ही राधी.
माझ्या उत्तराची वाट न बघता पुढचा प्रश्न आला.
ओमकार : साडी मऊसूत हाये तुझी. वापरून पुरानी झाली की माझ्या आक्काला दे. मस्त, झ्याक पैकी येक गोधडी शिवून देईल ती.
मी : बरं, नक्की हं.
राधिका : डबा नेत असेल ना तू? की शाळेतला खिचडी भात खातेस?
मी : हे काय? बघ इथे पिशवीत आहे न डबा आणि कधी कधी खाते हं मी खिचडी मुलांसोबत.
श्रीकांत : त्ये खिचडीवर लसणाची मिर्ची खाऊन बघ. मस्त लागतीया एकदम.
मी : अरे, पण मला माहीत नाही रे कशी बनवतात ती लसणाची मिरची?
ओमकार : सोप्पंय. लाल मिर्च्या घ्यायाच्या. लसूण घ्यायाचा सालीसकट. मंग पाटा आणि वरवंटा ध्यायाचा. त्यावर दगड्या मीठ (खडे मीठ ) टाकायचं आन समदं वाटून घ्यायाचं. झालं.
मी : अरे, पण माझ्याकडे पाटा वरवंटा नाही रे. मिक्सर आहे आणि मुळात मला वाटता पण येणार नाही पाट्यावर.
श्रीकांत : (मोठ्याने हसत) आमची अक्का म्हणत्ये आजकालच्या पोरीना काय बी येत न्हाई.
यावर काय बोलावे कळेना. खरे तर असे एकामागून एक येणारे प्रश्न माझी बोलती बंद करत होते. खूप विषय उरकवून टाकायचे, असा चंग असेल लेकरांचा. तितक्यात राधिकाने त्यांच्या शाळेच्या गेटजवळ थांबायला लावले. मी गाडी थांबवली. राधिका, श्रीकांत आणि ओमकार हे तिघे उतरले.
श्रीकांत : तुझी शाळा कवा सुटते? म्हंजी आम्ही किती वाजता इथं उभं राह्याच?
अगदीच निष्पाप प्रश्न होता तो. अगदीच पंधरा मिनिटांपूर्वी अनोळखी वाटणारी मी त्यांना ओळखीची आणि हक्काची वाटायला लागले होते. मी शिक्षक आहे हे समजल्यावर मला अहो मॅडम असे न म्हणता त्यांनी अगं म्हटलेले मला खूप आवडले होते. त्याच्या प्रश्नावर मी त्याला म्हणाले, माझी शाळा सुटते साडेपाच वाजता. पण निघता निघता सहा-सव्वासहा वाजतात.
राधिका : आमची साळा बी तेवाच सुटत आसंन. त्ये घड्याळ शिकविलं न्हाय अजून. पर तू येस्तोवर आमी जातू पुढं पायी पायी. तू येशीलच की माग्न.
मी : बरे. भेटू संध्याकाळी. जाऊ मी आता की अजून काही हुकूम?
ओमकार : काही न्हाई. सांच्याला भेटू आपन.
तितक्यात श्रीकांतने त्याची बॅग खाली ठेवली. बॅग ठेवताना तो म्हणाला, थांब. तू हे घेऊन जा. मोठ्ठे केस हायेत तुजे. येणीमध्ये लाव.
त्यानंतर त्याने त्याच्या वहीमधून एक जपून ठेवलेले गुलाबाचे फूल माझ्या हातात दिले. त्याने वहीत जपून ठेवलेला गुलाब हा गावठी गुलाब असावा. वहीचे पान उघडताच त्या सुकलेल्या गुलाबाचा सुगंध दवळला. केसात माळला असता तर त्याच्या पाकळ्या गळून गेल्या असत्या. मी हे त्याला समजावून सांगितले. पण श्रीकांत नाराज झाला.
मी : अरे श्री, ऐक न. मी पण हा गुलाब माझ्या वहीत ठेवू? बघ ना किती छान. श्रीकडून हा गुलाब अमृताकडे. मी श्री म्हणताच त्याची कळी खुलली.
श्रीकांत : व्हय. येकदम भारी. ठेव ठेव तुज्या वहीत ठेव.
मी : चला, आता पळा वर्गात. शाळा भरली तुमची. मला पण उशीर होईल नाहीतर शाळेत जायला.
सांच्याला भेटू असे तिघांनी एकसुरात म्हणत हात हलवून बाय म्हटले.
अजून त्या सुकलेल्या गुलाबाचा सुगंध दरवळतो. त्याहीपेक्षा सतत आठवत राहते ते निरपेक्ष प्रेम आणि माया आणि मी अनोळखी असून अनोळखी नसल्याची भावना.