पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
टाळकुटेश्वर पुलाच्या सांडव्याजवळ मंगळवारी मध्यरात्री रिक्षा गोदावरी नदीत कोसळून चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हमीद अजिद शेख (वय ४७, रा. नाईकवाडी, जुने नाशिक) असे मृताचे नाव असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरामुळे गोदाघाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित आहे. अंधारात रस्ता लक्षात न आल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित रिक्षा (क्रमांक एमएच १५ एफयु १७६२) थेट पाण्यात गेली.बुधवारी सकाळी स्थानिक नागरिकांना सांडव्याजवळ रिक्षा अडकलेली दिसली.
अग्निशामक दलाला माहिती दिल्यानंतर जवान संजय कानडे, संदीप जाधव, प्रणव बनकर तसेच जीवरक्षक दलाचे नरेंद्र जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. रिक्षा बाहेर काढण्याच्या प्रयत्नात चालक शेख मृतावस्थेत आढळून आला. मृतदेह पुढील तपासासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.या अपघाताची नोंद पंचवटी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.




