अहिल्यानगर (प्रतिनिधी)
येथील समतानगर परिसरात गुरूवारी (27 नोव्हेंबर) रात्री घडलेल्या रोकड चोरीच्या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले आहे. चाकूचा धाक दाखवून कारमधील तीन लाख रूपये लंपास झाल्याची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याच्या रात्र गस्तीवरील पोलिसांनी वेगाने तपास सुरू करताच हा गुन्हा काही बाहेरील चोरट्यांनी नव्हे, तर कारचालकानेच रचलेला कट असल्याचा उलगडा झाला. फक्त काही तासांत पोलिसांनी चालकासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेत चोरीची रोकडही हस्तगत केली.
प्रदीप बिशनदास पंजाबी (वय 65, रा. यशवंत कॉलनी) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा पुतण्या शिवम पंजाबी (वय 24) व चालक भरत मलसमिंदर हे एमआयडीसी परिसरातील राहुल वाईन्स येथून तीन लाख रूपये घेऊन कारने परतत होते. रात्री सुमारे 9.15 च्या सुमारास समतानगरातील अष्टविनायक अपार्टमेंटजवळ चालक भरतने भाजी घेण्यासाठी कार थांबवली. शिवम कारमध्येच थांबले होते. तेवढ्यात एक व्यक्ती कारजवळ आला. त्याने चालक बाजूचा दरवाजा उघडून शिवम यांना चाकूचा धाक दाखवला.
समोरील दोन्ही सीटच्या मध्ये ठेवलेली रोकड असलेली कॅरीबॅग त्याने हिसकावून घेत पळ काढला. घाबरलेल्या शिवम यांनी तत्काळ काका प्रदीप पंजाबी यांना फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात तातडीने गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्ह्याची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचार्यांनी रात्र गस्ती दरम्यान घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांची माहिती आणि घटनास्थळावरील परिस्थितीचा वेगाने पडताळा घेतल्यावर पोलिसांना संशय चालक भरत मलसमिंदर याच्यावर गेला.
चौकशीदरम्यान अनेक विसंगती समोर येताच पोलिसांनी भरत अशोक मलसमिंदर (वय 32, रा. पारिजात चौक, सावेडी) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यासोबत या कटात सहभागी असलेल्या नवनाथ भाऊसाहेब जाधव (वय 32, रा. बोल्हेगाव) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोकड हस्तगत केली.
पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार सुनील चव्हाण, सतीष त्रिभवन, सौरभ त्रिमुखे, बाळासाहेब भापसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.




