मुंबई । प्रतिनिधी
राज्याच्या काही भागात अवकाळी पावसामुळे दिलासा मिळत असला तरी राज्यभरात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून आजच्या घडीला २५ जिल्ह्यातील २ हजार ९७३ गावे आणि ७ हजार ६७१ वाड्यांना ३ हजार ६९२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. यापैकी सर्वाधिक टँकर मराठवाड्यात सुरु आहेत. दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना मान्सूनची प्रतीक्षा असताना धरणातील उपयुक्त पाणीसाठा आटला आहे. राज्यातील सर्व धरणात मिळून आज २३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी यावेळी हाच पाणीसाठी ३९ टक्के इतका होता. राज्यात दुष्काळाचे चटके जाणवू लागल्यानंतर राज्य सरकारने आढावा बैठकीचे सत्र सुरु केले असून दुष्काळाच्या प्रश्नावर विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम संपताच पाणीटंचाई आणि दुष्काळाची तीव्रता समोर आली आहे. याशिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने आज मंत्रालयात दुष्काळी भागात चारा छावण्या सुरु करण्याबाबत निर्णय घेतला. चारा छावण्या सुरु करण्यास किती निधी लागेल याचा अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने चारा छावण्या सुरु केल्या जाणार आहेत. याशिवाय मदत आणि पुनर्वसन विभागाच्या स्थायी आदेशानुसार दुष्काळी भागात दुष्काळ निवारण उपाययोजना सुरु केल्या जाणार आहेत. त्यानुसार पीककर्जाचे पुनर्गठन, कृषी वीज बिल, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक शुल्कात सवलती लागू केल्या जाणार आहेत.
धरणातील उपयुक्त पाणीसाठा
विभाग | आजची स्थिती | गतवर्षीची स्थिती |
नागपूर | ३८.८३ टक्के | ४२.५८ टक्के |
अमरावती | ३९.९४ टक्के | ४९.२५ टक्के |
छ. संभाजीनगर | ९.५५ टक्के | ३८. ९५ टक्के |
नाशिक | १६.३७ टक्के | ३०.६४ टक्के |
पुणे | १७.५९ टक्के | १९.८३ टक्के |
कोकण | ३७.११ टक्के | ३९. २६ टक्के |
विभागनिहाय टंचाईग्रस्त गावे आणि वाड्या
विभाग | गावे | वाड्या | टॅक्टर्स |
कोकण | २३२ | ७६६ | १७७ |
नाशिक | ७५६ | २५७० | ८१२ |
पुणे | ६३१ | ३८२९ | ७५५ |
छ. संभाजीनगर | १२५६ | ५०६ | १८४९ |
अमरावती | ८७ | – | ९२ |
नागपूर | ११ | – | ०७ |
एकूण | २९७३ | ७६७१ | ३६९२ |
दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष : पवार
शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत राज्यातील दुष्काळी स्थितीवरून चिंता व्यक्त केली. राज्यात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांनी फारशा गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे त्यांना जागे करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जर ते जागे झाले नाही तर अन्य मार्ग आमच्याकडे आहेत, असा इशारा पवार यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिला. जूनअखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होणार नाही. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. परिणामी फळबागांना पाणीपुरवठा करण्यासाठी अनुदान, रोजगार हमी योजनेच्या कामांना सुरुवात आणि चारा छावण्या सुरू करण्याबाबण्याची तातडीन आहे. दुष्कळाच्या प्रश्नावर आम्ही राजकारण करणार नाही. सरकारला सहकार्य करू. ही परिस्थिती गंभीर गरज आहे, असेही पवार म्हणाले.
पाणी आणि चाऱ्याकडे लक्ष द्या : वडेट्टीवार
राज्यातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आता संपला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने पाणी आणि चाऱ्याची सोय करण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. दुष्काळी भागात चारा छावण्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सरकारने करावी. टँकर राज्यात सुरु असतील तरी राज्यातील पाणीसाठा इतका कमी आहे की येणाऱ्या दिवसात टँकर देण्यासाठी पाणी उपलब्ध असेल का हा प्रश्न आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
आचारसंहिता शिथिल करा : अजित पवार
आता राज्यातील लोकसभा निवडणूक संपली असून निवडणूक आयोगाने लागू आचारसंहिता शिथिल करावी. आचारसंहिता शिथिल केल्यास जेणेकरून राज्य सरकारला दुष्काळ, पाणीटंचाई याबाबत निर्णय घेणे सोपे जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात बोलताना सांगितले.