अहिल्यानगर | सचिन दसपुते| Ahilyanagar
जिल्ह्यात औषधी दुकानांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या सहा हजार 285 औषधी दुकाने (मेडिकल) कार्यरत आहेत. त्या उलट येथील औषध प्रशासनाच्या अधिकार्यांची संख्या कमी आहे. सध्या चार अधिकार्यांवर जिल्ह्याचा भार असून चार पदे रिक्त आहे. आजघडीला दुकानांना परवानगी देण्याचे काम औषध प्रशासनाकडून केले जात असून त्यांच्या तपासणीचे काम त्याप्रमाणात होत नसल्याचे वर्षभरातील तपासणीच्या आकडेवारीतून समोर आले आहे. वर्षभरात फक्त 295 मेडिकलची तपासणी करण्यात आली आहे. हे प्रमाण जिल्ह्यातील एकूण मेडिकलपैकी अवघे साडेचार टक्के आहे. तर तपासणी झालेल्या मेडिकलपैकी 25 टक्के मेडिकल नियम पाळत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे अद्याप तपासणीच्या कक्षेबाहेर असलेल्या मेडिकल दुकानांवरील ‘ग्राहक सेवे’बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
राज्यभरात बनावट औषधांचा प्रकार सुरू आहे. सरकारी रूग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा होऊ शकतो, त्यामुळे ‘मेडिकल’मध्येही बनावट औषधांचा पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही; परंतू औषध प्रशासन आणि गेल्या वर्षभरातील औषधांची तपासणीची स्थिती पाहता सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे. येथील औषध प्रशासनात दोन सहायक आयुक्त व सहा औषध निरीक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र आजघडीला एक सहायक आयुक्त आणि तीन औषध निरीक्षक कार्यरत असून निम्मे पदे रिक्त आहेत. यामुळे चार अधिकार्यांवरच जिल्ह्याचा अतिरिक्त भार आहे. या अधिकार्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील सहा हजार 285 मेडिकल पैकी फक्त 295 मेडिकलची तपासणी करण्यात आली. त्यातील 69 मेडिकल दोषी आढळून आल्या आहेत.
फॉर्मासिस्ट नसणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे देणे, औषधांची बिले नसणे असे विविध कारणामुळे 69 मेडिकलवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातील सहा मेडिकलचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले असून 63 मेडिकलचे परवाने निलंबित केले आहे. 295 मेडिकलच्या तपासणीत तब्बल 69 मेडिकल दोषी आढळून आल्या आहेत. जिल्ह्यातील मेडिकल दुकानांची संख्या व तपासणीचे प्रमाण पाहता तपासणीला औषध निरीक्षक कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे रिक्त पदे तात्काळ भरण्याची गरज निर्माण झाली आहे.औषध निरीक्षकांना प्रत्येक महिन्याला 10 ते 15 औषध दुकानांची तपासणी करण्याचे आणि नियमांचे पालन होत असल्याबाबत, तसेच तपासणीसाठी औषधी नमुने घ्यावी लागतात. मात्र जिल्ह्यात निरीक्षकांची संख्या पाहता ही तपासणी पूर्ण क्षमतेने होत नसल्याचे दिसून आले आहे.
65 नमून्यात 7 औषधे आढळले अप्रमाणित
जिल्ह्यातील सरकारी रूग्णालय, औषध पुरवठा व वितरित केल्या जात असलेल्या ठिकाणी औषध प्रशासनाकडून तपासणी करण्यात आली. वर्षभरात 65 नमूने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील सात कंपन्यांची औषधे अप्रमाणित आढळून आली आहेत. यातील तीन कंपन्यांवर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून चार कंपन्यांची चौकशी सुरू असल्याचे सहायक आयुक्त अशोक बर्डे यांनी सांगितले.