Tuesday, May 21, 2024
Homeसंपादकीयकोरोनावरील औषधांची गर्दी; तथ्य किती ?

कोरोनावरील औषधांची गर्दी; तथ्य किती ?

कोरोनावर उपयुक्त ठरणारी औषधं, लसी याबाबत चर्चा सुरू आहे. पतंजलीने आयुर्वेदिक औषध बाजारात आणलं. रेमडेसवीर आणि फॅबी फ्लू या गोळ्यांचीही चर्चा आहे. इतरही अनेक संशोधनं सुरू आहेच. या विषाणूविरोधात लवकरात लवकर औषध उपलब्ध व्हावं यासाठी शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत आहेत. मात्र अद्यापही खात्रीशीर उपाय सापडलेला नाही. त्यामुळे सध्या तरी पर्यायी औषधांवरच अवलंबून रहावं लागणार आहे.

डॉ. ज्ञानेश्वर अयाचित

- Advertisement -

कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. देश अनलॉक झाल्यानंतर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली जात आहे. कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. म्हणूनच या विषाणूचा समूळ खात्मा करणार्या औषधाचा, लसींचा शोध सुरू आहे. कोरोनाविरोधी औषधांचे काही पर्याय उपलब्ध होत असले तरी त्यांच्या नेमक्या उपयुक्ततेबाबत खात्री देता येत नाही. कोणत्याही आजारावरील औषधनिर्मितीची प्रक्रिया सोपी नसते. औषधनिर्मिती प्रक्रियेला अनेकदा पाईपलाईन असंही संबोधलं जातं. प्रयोगशाळेत एखादं औषध तयार होतं. त्यानंतर त्याची तिथेच पहिली चाचणी होते. मग प्राण्यांवर चाचणी घेतली जाते. या दोन अग्नीपरीक्षा दिल्यानंतर माणसांवर चाचणी घेता येते. औषध किंवा औषधी घटकाचा शोध लागल्यानंतर ते बाजारात उपलब्ध होण्यासाठी एक दशक किंवा त्यापेक्षाही अधिक काळ लागू शकतो. बरीच औषधं एवढी मजल गाठू शकत नाहीत. याच कारणामुळे कोरोनावरील उपचारांसाठी सध्या उपलब्ध असणार्या औषधांचाच वापर होत आहे. उपलब्ध औषधं कोरोनाविरोधात प्रभावी ठरू शकतात का, हे जाणून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्यांची गरज असल्याचं इंग्लंडमधील शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे सध्या तरी सगळा भर उपलब्ध औषधांवर असल्याचं दिसून येत आहे. संसर्गाच्या तीन टप्प्यांमध्ये या विषाणूला लक्ष्य करता येईल, असं या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. कोरोनाला मानवी पेशींमध्ये प्रवेश करण्यापासून रोखणं, पेशींमध्ये प्रवेश केल्यानंतर या विषाणूच्या संख्येवर नियंत्रण ठेवणं आणि या विषाणूचा विविध अवयवांवर होणारा परिणाम कमी करणं हे ते तीन टप्पे आहेत.

कोविड-19 साठी विकसित करण्यात आलेली किंवा चाचणी घेण्यात आलेली बहुसंख्य औषधं विषाणूविरोधी (अँटी व्हायरल) आहेत. ही औषधं संसर्ग झालेल्या रुग्णांच्या शरीरातल्या विषाणूला लक्ष्य करतात. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास विषाणूविरोधी औषधं चांगलं काम करू शकतात, असं ‘क्यूनी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अँड हेल्थ पॉलिसी’तले प्राध्यापक डॉ. ब्रूस व्हाय. ली सांगतात. विषाणूने मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर झपाट्याने वाढ होण्याआधी तसंच त्याने शरीरातल्या अवयवाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्याआधी ही औषधं वापरणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. कोविड-19 विरोधी लढ्यात विषाणूविरोधी औषधं आणि लसी प्रभावी अस्त्रं ठरू शकतात, असं न्यूयॉर्क वैद्यकीय महाविद्यालयातल्या ‘स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस अँड प्रॅक्टिस’चे डीन डॉ. रॉबर्ट अलमर सांगतात.

विषाणूविरोधी औषधांबद्दल सांगायचं तर रेमडेसवीरची बरीच चर्चा झाली. दशकभरापूर्वी विकसित झालेल्या औषधाची 2014 मधली इबोलाविरोधी चाचणी अयशस्वी ठरली. मात्र हे औषध माणसांसाठी सुरक्षीत असल्याची बाब समोर आली. रेमडेसवीर विषाणूला आपली प्रतिकृती तयार करण्यापासून रोखत असल्याचं एमईआरएसने केलेल्या संशोधनातून समोर आलं. कोरोनासाठी या औषधाच्या जगभरात अनेक चाचण्या करण्यात आल्या. एक मे रोजी एफडीएने या औषधाच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली. लोपिनावीर आणि रितोनावीर या दोन औषधांच्या मिश्रणातून कालेत्रा हे औषध तयार करण्यात आलं. हे औषध एचआयव्हीवर प्रभावी ठरतं. ते कोरोनाविरोधात काम करू शकेल का, हे जाणून घेण्यासाठी वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या. कोरोनाची तीव्र लक्षणं असणार्या रुग्णांवर हे औषध प्रभावी ठरत नसल्याची बाब समोर आली. मात्र रिबाविरिन आणि इंटरफेरॉन बीटा वन बी या औषधांसोबत कालेत्रा दिल्यास रुग्णांच्या शरीरातून विषाणू कमी वेळात नष्ट झाल्याचं समोर आलं. आठ मे रोजी ‘द लँसेट’मध्ये हा शोध प्रकाशित करण्यात आला. फॅविपिरावीर या औषधाचा वापर इन्फ्ल्युएंझावरील उपचारांवर करण्यास काही देशांनी मान्यता दिली आहे. या औषधाची निर्मिती करणार्या जपानने सौम्य तसंच मध्यम स्वरुपाची लक्षणं असणार्या रुग्णांवरील वैद्यकीय चाचणीसाठी ते 43 देशांमध्ये पाठवलं.

दरम्यान, ग्लेनमार्क या औषधनिर्मिती क्षेत्रातल्या बड्या कंपनीने हे औषध भारतीय बाजारात उपलब्ध करून दिलं आहे. फॅबी फ्लू असं या औषधाचं नाव आहे. याच्या एका गोळीसाठी 103 रुपये मोजावे लागणार आहेत. ग्लेनमार्क भारतात याची निर्मिती करणार आहे. हे औषध साधारण एका आठवड्यात भारतभरात उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. या औषधामुळे रुग्ग्ण लवकर बरे होऊ शकतील. सध्या या गोळ्यांची किंमत बरीच जास्त असली तरी येत्या काळात इतर काही कंपन्या हे औषध उपलब्ध करून देणार आहेत. त्यानंतर त्याची किंमत कमी होईल. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ते घेता येईल. आर्बिडॉल नामक औषधाची चाचणीही घेण्यात आली. लोपिनावीर आणि रिटोनावीर या औषधांसह त्याची चाचणी घेण्यात आली होती. मात्र कोरोनाची सौम्य तसंच मध्यम लक्षणं असणार्या रुग्णांना याचा फारसा लाभ झाला नाही.

विषाणूविरोधी औषधांसोबतच इतरही पर्याय धुंडाळले जात आहेत. आयब्यूप्रोफेन हे याच पर्यायांपैकी एक. हे वेदनाविरोधी औषध कोरोनासाठी वापरता येईल का, हे जाणून घेण्यासाठी जूनच्या सुरूवातीला चाचण्यांना सुरूवात झाली. या औषधाचे दाह कमी करणारे गुणधर्म कोरोनामुळे होणारा श्वसनासंबंधीच्या त्रासावर प्रभावी ठरू शकतील, असा त्यांचा कयास आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडिज विषाणूवर हल्ला करण्याच्या दृष्टीने रोगप्रतिकारकक्षमतेला सक्षम करतं. वीर बायोटेक्नॉलॉजीने ‘सार्स’मधून बर्या झालेल्या रुग्णांच्या अँटीबॉडिज घेतल्या आहेत. ही कंपनी चीनी कंपनीच्या सहकार्याने यावर संशोधन करत आहे. ऍबसेलेराने कोरानातून बर्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातल्या 500 अँटीबॉडिज घेतल्या आहेत. या अँटीबॉडीज कोरोनावर प्रभावी ठरू शकतील का, याबाबत संशोधन होणार आहे.

तिकडे पतंजलीने ‘कोरोनिल’ हे आयुर्वेदिक औषध बाजारात उतरवलं आहे. हे औषध कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरू शकतं, असा दावा करण्यात आला आहे. कोरोना रुग्णांवर या औषधाची चाचणी घेण्यात आली असून ते पूर्ण बरे झाल्याचं तसंच शरीरातल्या विषाणूंच्या संख्येत घट झाल्याची बाब समोर आल्याचं सांगितलं जात आहे. अश्वगंधा आणि गिलॉय या वनौषधींपासून हे औषध तयार करण्यात आलं असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 100 टक्के असल्याचं ‘पतंजली’चं म्हणणं आहे. तसंच देशभरातल्या पतंजलीच्या 12 केंद्रांमध्ये यावर संशोधन केल्याचंही सांगण्यात आलं. दरम्यान, आयुष मंत्रालय आणि आयसीएमआरने पतंजलीला हा दावा सिद्ध करण्यास सांगितलं. दावा सिद्ध केल्याशिवाय औषधाची जाहिरात न करण्याबाबत बजावण्यात आलं. आयुष मंत्रालयानेही कोरोनासाठी काही वनौषधींची चाचपणी सुरू केली आहे. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिचर्सच्या सहकार्याने ही चाचणी करण्यात येत आहे. यासाठी अश्वगंधा, ज्येष्ठमध, पीपली, गुडुची तसंच आयुष 64 या औषधांचं मिश्रण वापरण्यात येत आहे.

‘मॉडेर्ना’ ही कंपनी कोरोनाविरोधी लसनिर्मितीच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. कंपनी जुलैमध्ये तिसर्या टप्प्यातल्या चाचण्या सुरू करणार आहे. 30 हजार रुग्णांवर ही चाचणी होईल. ही लस 80 ते 90 टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरत असल्याचा कंपनीचा दावा आहे. थायलंडमध्येही एका लसीवर काम सुरू आहे. लसनिर्मितीची प्रक्रिया महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. या लसीचा दुसरा डोस माकडांना देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या लसीच्या सकारात्मक परिणामांची प्रतीक्षा आहे.

या टप्प्यातच लसीचं भवितव्य ठरणार आहे. माकडांवरील चाचणी यशस्वी ठरल्यास पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये माणसांवरील चाचणीला सुरूवात करता येईल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. चीनमध्ये सहा लसींवर काम सुरू असून त्यापैकी तीन लसी वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. 2020 च्या अखेरपर्यंत किंवा पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत चीनी लस सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध होईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. लसनिर्मितीत अग्रेसर असणारी सॅनोफी ही कंपनीही कोरोनाविरोधी लस तयार करत आहे. 2021 च्या सुरूवातीला या लसीला मान्यता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ब्रिटनमधल्या जीएसके कंपनीसोबत सॅनोफीची लसनिर्मिती प्रक्रिया सुरू आहे. सॅनोफीने याआधी फ्लूसारख्या विषाणूजन्य आजारांवर लसनिर्मिती केली आहे.

या अथक परिश्रमांचं लवकर सार्थक होऊन लस किंवा औषध उपलब्ध होवो किंवा सध्या अस्तित्वात असणारी औषधं कोरोनाला नष्ट करण्यात प्रभावी ठरोत, अशीच प्रत्येकाची अपेक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या