अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बहुचर्चित ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी घोटाळ्याप्रकरणी जप्त स्थावर आणि जंगम मालमत्तेसंदर्भातील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे) संरक्षण अधिनियमानुसार बीडचे उपविभागीय अधिकारी यांची ‘सक्षम प्राधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रक्रिया सुरू आहे. या निर्णयामुळे अहिल्यानगर व बीड जिल्ह्यातील ठेवीदारांना आपले पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून श्रीरामपूर, नेवासा, राहुरी, जामखेड तालुक्यातील सुमारे 1 हजार 300 ठेवीदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
ज्ञानराधा मल्टिस्टेटने आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारल्या होत्या. मात्र मुदत संपल्यानंतर ठेवी परत न मिळाल्याने ठेवीदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या प्रकरणी बीडसह विविध जिल्ह्यांत मिळून एकूण 98 गुन्हे दाखल आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातही जामखेड व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले असून दोन्ही गुन्ह्यांचा तपास नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. श्रीरामपूर येथील गुन्ह्याचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ सुरू असून जामखेड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात ‘मनीट्रेल’ तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, बीड पोलिसांनी चेअरमन सुरेश कुटे, अर्चना कुटे यांच्यासह संचालक व कर्मचार्यांची सर्व स्थावर-जंगम मालमत्ता जप्त केली आहे. बँक खातीही गोठविण्यात आली आहेत. त्यामुळे अहिल्यानगरच्या आर्थिक गुन्हे शाखेला येथील प्रकरणात मालमत्ता जप्त करता आलेली नाही. जप्त मालमत्तेची पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ठेवीदारांना पैसे देण्याची कार्यवाही बीड पोलिसांकडून केली जाणार आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जामखेड पोलीस ठाण्यातील सुमारे 975 आणि श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील सुमारे 300 ठेवीदारांची नावे संरक्षण अधिनियमनुसार तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात समाविष्ट करण्यासाठी अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेने बीड पोलिसांकडे प्रस्ताव पाठविला आहे.
जामखेड प्रकरणात जामखेड, खर्डा व राहुरी येथील शाखांमध्ये गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांचे जबाब आर्थिक गुन्हे शाखेने नोंदविले आहेत. तर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात श्रीरामपूर व नेवासा येथील गुंतवणूकदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. सर्व ठेवीदारांना पैसे परत मिळण्यासाठी बीड पोलिसांकडून तयार करण्यात येणार्या प्रस्तावात सर्वांची नावे समाविष्ट होण्यासाठीची प्रक्रिया अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेने पूर्ण केली आहे.




