Friday, May 3, 2024
Homeनाशिकसाहित्य खरेदीसाठी ई-निविदा राबवावी : डॉ. कुंभार्डे

साहित्य खरेदीसाठी ई-निविदा राबवावी : डॉ. कुंभार्डे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातंर्गत करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली औषध-साहित्य खरेदी संशयास्पद असल्याची तक्रार निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी केली. यानंतर भाजपचे गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनीही औषध-सहित्य खरेदीत घोटाळा झाल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

बाजारात कमी दराने औषधे व साहित्य उपलब्ध असताना चढया दराने खरेदी करून शासनाचे आर्थिक नुकसान केले जात आहे. करोनाकरिताची औषधे व साहित्य खरेदी ई -निविदा प्रक्रीयेव्दारे राबवावी, अशी मागणी डॉ. कुंभार्डे यांनी केली आहे.

डॉ. कुंभार्डे यांनी बनसोड यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जि.प.च्या आरोग्य विभागांतर्गत कोविड -१९ करिता आमदार निधी व जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मोठया प्रमाणात निधी प्राप्त झालेला आहे. मार्च ते एप्रिल २०२० या दरम्यान आरोग्य विभागाने औषधे व साहित्य खरेदी करण्याची प्रक्रिया राबविली.

ही खरेदी जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडील उपलब्ध दरानुसार केली आहे. सदरचे दर हे बाजारभावातील दरापेक्षा अधिकचे आहेत. त्याअनुषंगाने जि.प.च्या आरोग्य विभागाने औषधे व साहित्य खरेदी बाजारभावापेक्षा चढ्या दराने केलेली आहे, अशी तक्रार आमदार बनकर यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केली आहे.

तथापि आजमितीस खुल्या बाजारात जि.प.च्या आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या औषधे व साहित्याच्या तुलनेत चांगल्या प्रतीचे व गुणवत्तापुर्वक अशी औषधे बाजारात कमी दरात उपलब्ध आहेत. त्याबाबतची उपलब्धता मोठया प्रमाणात असल्याकारणाने दर देखील प्रचंड प्रमाणात कमी आहे. जि.प. आरोग्य विभागाने यापूर्वी खरेदी केलेले औषधे व साहित्य आपत्ती व तात्काळ या नावाखाली चढया दराने केलेली आहे.

सदर बाब ही शासनाच्या निधीचा अपव्यय करणारी आहे. या खरेदी प्रक्रियेत मोठया प्रमाणात त्रुटी असून गंभीर आहे. या खेरदीची जि.प. प्रशासनाने दखल घ्यावी. तसेच यापुढील जि.प.च्या आरोग्य विभागांतर्गत करावयाची औषध व साहित्य खरेदी ही ई -निविदेव्दारे करण्यात यावी, अशी मागणी डॉ. कुंभार्डे यांनी पत्रात केली आहे. प्रशासनाने याची योग्य ती दखल न घेतल्यास विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्याचा इशारा डॉ.कुंभार्डे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या