पाच वर्षांच्या आतील मुलांच्या कुपोषणासंदर्भात युनिसेफचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. कुपोषणात श्रीमंत आणि गरिबांची मुले असा भेद राहिलेला नाही याकडे हा अहवाल लक्ष वेधून घेतो. ही गंभीर आणि खोलवर मुरत चाललेली समस्या आहे. तथापि त्याबरोबरीने अजून एका कुपोषणाचा विचार समाजाने गांभीर्याने करण्याची गरज आहे.
आहाराबरोबरच वैचारिक कुपोषणदेखील वाढत चालले असावे का? मुले जेवताना त्यांच्या अवतीभोवती कोणत्या क्रिया सुरू असतात? वातावरण कसे असते? मुले चवीने जेवतात की जेवताना टीव्ही किंवा मोबाईल बघतात? त्यावर नेमके काय बघतात? मुळात जेवताना मुलांना काहीतरी दाखवयाची गरज का भासते? हे प्रश्नही महत्त्वाचे आहेत. भारतीय संस्कृतीत आहार आणि वातावरण याचा सखोल विचार केला गेला आहे. सर्वांचाच तितका अभ्यास असणे तज्ज्ञांनादेखील अपेक्षित नसते. तरीही ‘जसा आहार; तसा विचार’ हे सूत्र सर्वांच्याच लक्षात येऊ शकेल का? अन्नाचा मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी संबंध असतो असा त्याचा व्यापक अर्थ घेतला जाऊ शकेल का? म्हणजेच खाणार्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य अन्न निश्चित करते. मग आहार घेतानाचे वातावरणदेखील महत्त्वाची भूमिका बजावते. ‘त्याच्या हातात मोबाईल दिल्याशिवाय तो जेवतच नाही किंवा टीव्ही लावून दिला की ती पटापट जेवते’ या सबबी मुलांच्या वाढीसाठी घातक ठरू शकतील.
मानसतज्ज्ञदेखील याकडे लक्ष वेधून घेतात. मुलांच्या हातात मोबाईल देऊन किंवा त्यांच्या डोळ्यासमोर टीव्ही सुरू करून त्यांच्या तोंडात घास कोंबणारे पालक हे चित्र बहुसंख्य घरात आढळते. हे मुलांचे मानसिक कुपोषणच म्हणता येईल. अनेक घरांमध्ये जेवणापूर्वी हातपाय धुणे, प्रार्थना म्हणणे, जेवताना कमी बोलणे आणि ताटातील वाढलेले सगळे अन्न संपवणे असा प्रघात आढळतो. त्यामागची धारणा ‘जसे अन्न, तसे मन’ हीच आहे. पाच वर्षांपर्यंत मुलांच्या विविध इंद्रियांचा झपाट्याने विकास होतो. त्यात गंध आणि चवीशी संबंधित क्षमतांचा समावेश आहे.
मुले मोबाईल किंवा टीव्ही बघत जेवत असतील तर त्यांना उपरोक्त गोष्टी कशा समजणार? क्षमता कशा विकसित होणार? जेवताना मुले मारधाड कार्टून, एकमेकांच्या कुरघोड्या आणि मारामार्या बघत असतील तर त्याच भावना प्रबळ होत गेल्या तर त्यात नवल ते काय? मुले त्यांच्या वयाला साजेशा पद्धतीनेच जेवतात, वेळ घेतात, मस्ती करतात, अन्न चिवडतात किंवा सांडतात हे किती पालक सहजगत्या स्वीकारतात? किंबहुना मुलांनी तसे करू नये म्हणूनच पालक त्यांच्या हातात मोबाईल देत असू शकतील का? पण असे करून भविष्यातील मानसिक वाढीच्या समस्या पेरत आहोत, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. शारीरिक कुपोषणाबरोबरच मानसिक कुपोषणही विचारात घेतले जाईल का? त्यासाठी ‘जसे खाल, तसे व्हाल’ ही म्हण समजून घेतली तरी पुरे.