Saturday, May 4, 2024
HomeUncategorized‘अनामिके’चा नामी उद्योग !

‘अनामिके’चा नामी उद्योग !

भारतात रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. लाखो पदवीधर आणि उच्चशिक्षित तरुण आशाळभूतपणे रोजगाराच्या शोधात रुतले आहेत. मात्र नोकर्‍या दुर्मिळ झाल्या आहेत. रोजगार पुरवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. किंबहुना आहे ते घालवण्यात यशस्वी ठरत आहे. अनेक उच्चशिक्षितांनी नाईलाजाने ‘चपराशी’ वा ‘चौकीदार’ पदांसाठी अर्ज केल्याच्या बातम्या अधूनमधून माध्यमांत झळकतात.

देशातील बेरोजगारीच्या वास्तवाची भयाणता अधोरेखित करणार्‍या या बातम्यांची भरपूर चर्चाही होते. नंतर ‘अति झाले आणि हसू आले’ या न्यायाने सरकारसोबत सार्‍यांनाच त्याचा विसरही पडतो. मध्य प्रदेशातील ‘व्यापम’ घोटाळा जगभर गाजला. त्याच्या तपासात आतापर्यंत 50-60 अधिकार्‍यांच्या जीवांची आहुती पडली, पण ते होमकुंड सध्या काहीसे थंडावले आहे.

- Advertisement -

देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशात मात्र त्याची नवी आवृत्ती आकार घेत आहे. ‘अनामिका शुक्ला’ नामक शिक्षिका एकाच वेळी 25 शाळांमध्ये नोकरी करीत असल्याचा प्रकार परवा-परवा उजेडात आला. राज्याच्या शिक्षण विभागाने शिक्षकांचे माहिती संकलन सुरू केल्यावर अनामिका शुक्ला हे नाव अमेठी, आंबेडकरनगर, रायबरेली, प्रयागराज, अलीगढ कासगंज आदी 25 ठिकाणच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांच्या यादीत आढळले. तेरा महिन्यांत तब्बल एक कोटी रुपये वेतन या नावे दिले गेले. हा सगळा प्रकार कुठल्याही गुप्तहेर कादंबरीला मसाला पुरवणारा आहे.

‘आंधळं दळतं अन् कुत्रं कसं पीठ खातं’ याचा एक ‘अनामिक’ नमुना उत्तर प्रदेशात सध्या घडत आहे. काहीतरी गडबड आहे हे लक्षात आल्यावर आता शिक्षणाधिकार्‍यांनी प्रकरणाची चौकशी (की झाकपाक?) सुरू केली आहे. त्या 25 ‘अनामिकां’चे वेतन रोखले आहे. चौकशी सुरू झाल्यावर एका बेरोजगार महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवली तर दुसर्‍या कोणा ‘अनामिके’चा राजीनामा (इस्तिफा) शिक्षणाधिकार्‍यांकडे कुणा एकामार्फत पोहोचला आहे. शिक्षणाधिकार्‍यांनी कळवल्यावर पोलिसांनी ‘तिला’ चतुर्भुज केल्याचे वृत्त आहे. आपले नाव ‘अनामिका सिंह’ असल्याचे तिने माध्यमांना सांगितले, पण पोलीस तपासात ‘प्रिया जाटव’ असे नाव सांगितले. ऑनलाईन पडताळणीत मिळालेल्या कागदपत्रांत आधारकार्डावर अनामिका शुक्ला हे नाव आहे. ‘नोकरीसाठी एका व्यक्तीने मदत केली. त्याला आपण एक लाख रुपये दिले’ असेही तिने म्हटले आहे.

एकूण ‘अनामिकां’च्या नावे एक कोटी रुपये वेतनापोटी अदा झाले, पण ते एकाच खात्यावर की वेगवेगळ्या? 25 ठिकाणी नोकरी करणारी ‘अनामिका’ एकच की त्याच नावाने नोकरी करणार्‍या महिला वेगवेगळ्या? याचा उलगडा अजून व्हायचा आहे. एकूणच हा घोटाळा एकट्या-दुकट्याचा पराक्रम कसा असेल? पडद्यामागे अनेक ‘अनामिक’ आणि ‘अनामिका’ दडलेल्या असणार हे सांगायला ज्योतिषाची गरज आहे का? प्रकरणाचा स्फोट झाल्यावर राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

यथावकाश वास्तव उघड होईल की झाकले जाईल? खर्‍या चेहर्‍यांचा पर्दाफाश होईलच हे मुख्यमंत्री तरी खात्रीने सांगू शकतील का? ‘न खाऊंगा, न खाने दुंगा’ असे पंतप्रधानांचे टाळ्या वसूल करणारे घोषवाक्य आहे. मात्र भ्रष्टाचार्‍यांवर त्याचा कोणताही परिणाम नाही. खाणारे खातच आहेत. बोलणारे बोलत आहेत. भारतातील भ्रष्टाचार खोदून काढणार्‍या कुणालाही शेवटी अपयशाचीच कबुली का द्यावी लागते? याची कारणे ‘व्यापम’ किंवा ‘अनामिका’सारख्या प्रकरणांतच दडलेली असतात. ती दडवून ठेवण्याचीच जबाबदारी चौकशी करणार्‍या यंत्रणेला इमाने-इतबारे किती काळ पार पाडावी लागत राहणार?

- Advertisment -

ताज्या बातम्या