विकास दुबे नावाच्या कुप्रसिद्ध गुंडाला पकडण्यासाठी गेलेले पोलीस पथक दुबेच्या गुंडांकडून घेरले गेले. त्या पोलिसांवर गुंडानी गोळीबार केला. 8 पोलीस बळी गेले. म दुबे प्रकरणात वीरमरण आलेल्या पोलिसांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी ठासून सांगितले. तरी विकास दुबेचा शोध मात्र अद्यापही लागलेला नाही. ही घटना घडण्यापूर्वी 1 तास दुबेने पोलिसांना फोन केला होता. त्यांचा जीव घेण्याची धमकी दिली होती असे पोलीस तपासात उघड झाले आहे. एका पोलिसाच्या फोनमधील रेकाँडींगही पोलिसांच्या हाती लागले आहे. त्या पोलिसाला आता निलंबित केले गेले आहे.
गुंडाला अटक करायला पोलीस जाणार आहेत याची खबर दुबेला कोणाकडून मिळाली? दुबेने धमकी दिली हे संबंधिताने वरिष्ठ अधिकार्यांना का सांगितले नाही? चौबेपूर पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस संशयाच्या घेर्यात आहेत. दुबेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पण आतापर्यंत एकाही गुन्ह्यात त्याला शिक्षा का होऊ शकलेली नाही? 2001 साली उत्तरप्रदेशमध्ये भाजपचेच सरकार होते. तत्कालीन सरकारने संतोष शुक्ला याना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता. त्यांच्या घरात घुसून त्यांची हत्या केल्याचा गंभीर आरोप दुबेवर होता. त्याही प्रकरणात दुबेला शिक्षा झाली नव्हती. सबळ पुरावे न्यायालयासमोर ठेवण्यात तत्कालीन संबंधित पोलीस अधिकार्यांना अपयश आले होते.
आपल्याच सरकारमधील मंत्रिपदाचा दर्जा दिला गेलेला होता. तथापि त्यांच्या कुटुंबियांना त्या हत्येचा न्याय मिळाला नाही. तेव्हाही भाजपचेच सरकार होते. आताही आहे. दुबे प्रकरणातील बळी गेलेल्या पोलिसांच्या कुटुंबांनी न्यायाची अपेक्षा केली तर ती पुरी होणार आहे का असे मागील अनुभवावरून त्यां कुटंबीयांना वाटत असेल का? योगी सरकारने गत तीन वर्षात 100 पेक्षा जास्त गुंडांचे एन्काऊंटर केल्याचे बोलले जाते. मग खुद्द मंत्र्यांची हत्या करणारा दुबे त्या सत्रातून शिल्लक कसा? चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींचाच प्रसार लवकर होतो असा समाजाचा सर्वत्र अनुभव आहे.
मेरठमध्ये उघडकीला आलेले ताजे करोना चाचणी प्रकरणही गंभीर आहे. तेथील एका खासगी रुग्णालयातील कर्मचारी लाच घेऊन करोनाची चाचणी नकारात्मक आल्याचे बोगस अहवाल रुग्णांना देत होते असा आरोप आहे. मेरठच्या मुख्य वैद्यकीय अधिकार्यांनी या प्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत. उत्तरप्रदेशात करोनाग्रस्तांचा आकडा 27 हजारांपर्यंतच मर्यादित कसा? या शंकेचे रहस्य कदाचित त्या तपासातून उघड होऊ शकेल. उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या राज्यातील एकूणच स्वच्छतेची परिस्थिती लक्षात घेता करोना इथे भारताच्या अन्य राज्यांच्या तुलनेत इतका दयाळू कसा झाला? त्या राज्यातील अलाहाबाद, अयोध्या, काशी सारख्या तीर्थक्षेत्रांचा तर हा प्रभाव नव्हे? की सर्वात पवित्र मानल्या गेलेल्या गंगा नदीची ही कृपा म्हणावी? कसेही असो पण मेरठच्या बनावट करोना चाचणी दाखल्यांचे प्रकरण उघडकीला आले आणि भाबड्या जनतेच्या मनातील या सर्व श्रद्धा आता डळमळू लागल्या असतील. या प्रकरणाची पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.
तथापि आपल्याच सहकार्यांचा बळी घेतल्याचा आरोप पोलिसांवरही घोंगावत आहे. असे संशयग्रस्त पोलीस बोगस प्रमाणपत्र प्रकरणाचा तपास निःपक्षपातीपणे करू शकतील का? एका वेळी 8 पोलिसांचे हत्याकांड होते, डॉक्टर आणि आरोग्यसेवकांवर सुद्धा हल्ले होऊ शकतात, तरी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रे देखील उत्तरप्रदेशातच आढळतात. खुद्द पोलीस संशयाच्या घेर्यात सापडतात यापेक्षा मअंधेर नगरी चौपट राजाफ या कथेतील काल्पनिक राज्य किती वेगळे असू शकेल? फरक एकच आहे,
उत्तरप्रदेशातील विद्यमान राजपद म्हणजेच मुख्यमंत्रीपद हे एक योगी भूषवित आहेत. योगी शब्द सुद्धा ऐकला की भाबडी भारतीय जनता श्रद्धेने नतमस्तक होते. मोहमाया, राग-लोभ, भय-चिंता, या सगळ्या बर्या वाईट विकारातून योगीजन मुक्त असतात असेही समाज मानतो. साहजिकच अशा मुक्त जीवात्म्याला सामान्य माणसाच्या भयचिंतांबद्दल किंवा सुरक्षेबद्दल तरी चिंता वाटेल ही अपेक्षाच अनाठायीठरावी अशीच अंधेर नगरी उत्तरप्रदेशात जनता अनुभवत असेल का?