Saturday, November 23, 2024
Homeअग्रलेखजुने जाऊ द्या…!

जुने जाऊ द्या…!

महाविकास आघाडीतील सर्व तरुण आमदार नवा महाराष्ट्र कसा असावा याबद्दलच्या नव्या संकल्पनेने नव्या विचारांची पेरणी करायचा प्रयत्न करणार आहेत. महाराष्ट्राची विभागणी होऊ शकते अशी भीती अलीकडे व्यक्त केली जात आहे.

राज्य व समाजाची फाळणी करायचा हा प्रयत्न आहे. मात्र तरुण आमदारांना जातीपातीमुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे’ असा विश्वास महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकताच एका मुलाखतीत व्यक्त केला.

- Advertisement -

मोठ्या संख्येने तरुण आमदार राज्याच्या विधानसभेत यंदा दाखल झाले आहेत. नव्या पिढीच्या नजरेत उद्याच्या महाराष्ट्राची संकल्पना वेगळी आहे. ‘जुने ते सोने’ असे बोलले जाते. तथापि जुने विचार व त्यावर आधारित मत-मतांतरे कालबाह्य ठरत आहेत असेच कदाचित तरुण आमदारांना सुचवायचे असावे.

भाषावाद, प्रांतवाद व सीमावादांची भिजत घोंगडी अनेक वर्षांपासून भिजत आहेत. याच मुद्यांभोवती राजकारण फिरत असल्याने त्यावर व्यवहार्य तोडगे काढण्यात हेतूपुरस्सर चालढकल केली जाते असा समज वाढत आहे. तथापि अशा जुन्या दुखण्यांचे ओझे, राजकारण करण्याचे परंपराबद्ध सरधोपट मार्ग नव्या पिढीला मान्य नसावेत. राजकारणातील नवी पिढी या चौकटीतून बाहेर पडू पाहत असल्यास ती स्वागतार्ह बाब आहे.

जनतेच्याही दैनंदिन जीवनात अनेक बदल होतच असतात. बँकेत खाती उघडल्याने कोट्यवधी लोकांना बँकेतील व्यवहारांची माहिती झाली आहे. सरकारी अनुदाने थेट त्यांच्या खात्यावर जमा होत आहेत. मोबाईलसारखी साधने व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तरुण शेतकरी नवे-नवे प्रयोग करीत आहेत.

समाज माध्यमांचा दुरुपयोग जास्त चर्चेत असला तरी तरुण पिढी चतुराईने या माध्यमांचा वापर व्यवसाय विकासासाठीसुद्धा करीत आहे. त्यांच्या पुढाकाराने राजकारणही बदलू शकले तर ते राज्याच्या भवितव्याला वळण देणारे ठरू शकेल. तरुण आमदारांच्या वतीने आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलेले बदलाचे संकेत मराठी मुलखासाठी नव्या आशा प्रज्वलित करणारे ठरू शकेल का? जातीपातींच्या राजकारणाची मुळे नेत्यांच्या मनात घट्ट रुजलेली आहेत.

त्यांचे उच्चाटन ही नवी पिढी कशी करेल? हे काम वाटते तितके सोपे नाही याचा अंदाज तरुण आमदारांनाही असेलच. सध्या राजकारणात वर्चस्व गाजवणार्‍या अनुभवी ज्येष्ठांची भूमिका नव्या कल्पनांबद्दल काय असेल? दोन पिढ्यांच्या विचारातील फरक बदलाला किती अनुकूल ठरतील? सतत जुनीच धुणी धोपटणार्‍या अतिउत्साही कार्यकर्त्यांचा बंदोबस्त कसा करणार? तरुण आमदारांच्या मनातही असे प्रश्न पिंगा घालत असतीलच.

तथापि मुंबई अहोरात्र चालू असावी हा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. ती आदित्य ठाकरे यांनीच काही वर्षे जोपासलेली योजना आहे. ती यशस्वी करण्याकडे तरुण आमदारांना विशेष लक्ष पुरवावे लागेल. राजकारणाच्या जुन्या चाकोरीबद्ध कार्यपद्धतीत बदल करण्याच्या कामात तरुण आमदार यशस्वी व्हावेत अशीच जनतेची अपेक्षा राहील.

मात्र अनुभवी ज्येेष्ठांचा विरोध डावलताना त्यांची भूमिका नव्या संकल्पनांविरोधात बळकट होणार नाही याची दक्षता तरुण आमदारांना घ्यावी लागेल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या