नाशिक । प्रतिनिधी
वर्तमान चांगला झाल्याशिवाय भविष्य घडणार नाही. शिक्षणातून उद्याचे भवितव्य घडणार आहे. त्यासाठी मेक इन इंडियासारखा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. पुणे, नाशिकसारखी महाराष्ट्रातील शहरे बौद्धिक संपदा असलेली आहेत. त्यासाठीच भोसलासारखी संस्था नाशिककरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर यांनी केले.
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. ‘मेक इन इंडिया’ सरंक्षण उत्पादन साहित्य केंद्र म्हणून नाशिकची संभाव्यता या विषयावर ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, प्रमुख पाहुणे प्रदीप पेशकार उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व कारगिल युद्धात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेले लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर यांनी तीन दिवसीय व्याख्यानमालेचे शेवटचे म्हणजे तिसरे पुष्प गुंफले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला सैन्याची गरज नाही अशा मानसिकतेची मांडणी सुरुवातीच्या काळात झाली होती. त्याचवेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आझाद हिंद सेना उभी करून संघर्ष उभा केला. त्यामुळे केवळ सत्याग्रहाचे योगदान नसून क्रांतिकारकांचे योगदान तितकेच महत्वाचे आहे.
विपरीत भौगोलिक परिस्थिती आणि वातावरण भारतीय सीमेलगत प्रतिकूल आहे. त्यामुळे भारतात सरंक्षण निर्माण झालेले तंत्रज्ञान जगाच्या कुठल्या ठिकाणी वापरली जाऊ शकते. भारतातील 130 कोटी लोकसंख्या अनेक क्षेत्रात प्राविण्य मिळवते आहे. असे त्यांनी सांगितले. आपल्या जवळ असलेल्या संसाधनांचा उपयोग मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांसाठी करण्याची आवश्यकता आहे असे म्हणतांना त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या अमेरिकन विद्यापीठात विद्यार्थ्यांसमोर दिलेला भाषणाचा संदर्भ दिला. भारताकडे असलेली बौद्धिक संपदा हे आपले सामर्थ्य आहे. त्याचा उपयोग मेक इन इंडियासाठी होऊ शकतो. जगभरातील परिस्थितीचा विचार करता येणार्या काळात मेक इन इंडिया भारताला प्रगतीपथावर नेणारी ठरेल त्या दृष्टीने आपण सज्ज व्हायला हवे, सेही त्यांनी म्हटले.
पाहुण्यांचा परिचय स्नेहा कुलकर्णी यांनी केला. मान्यवरांचे स्वागत संस्थेचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत अंजली सहस्त्रबुद्धे यांनी स्वागत गीतातून केले.कार्यक्रमाचे आभार मुग्धा जोशी यांनी मानले. तर कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने रुपाली कुलकर्णी यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस पुराणिक यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शहरातील नागरिक, संस्थेचे सर्व पदाधिकारी, आणि संस्थेच्या विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
‘नाशिक’मेक इन इंडियासाठी योग्य
संरक्षण उत्पादनक्षेत्र मेक इन इंडीयासाठी नाशिकची भौगोलिक स्थिती योग्य आहे. नाशिक, अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद ही शहरे यासाठी पूरक असून नजीकच्या काळात हवाई वाहतूक चांगली झाली आहे. समुद्रमार्ग हा सुद्धा नाशिक शहरापासून अवघ्या दोनशे किमीवर आहे. येणार्या काळातील मोठ्या शहरांची वाढ दोनशे किमी परिघात होईल. त्या दृष्टीने नाशिक संरक्षण उत्पादनक्षेत्र यासाठी पूरक आहे.