शिक्षण म्हणजे काय? असे विचारले तर वर्तमानात उत्तर असते, शासनाने नेमलेल्या पाठयपुस्तकांचे अध्ययन, अध्यापन झाले की शिक्षण झाले असे मानले जाते. पाठयपुस्तके शिकवले की आपला अभ्यासक्रम संपला असे व्यवस्था मानते. पाठयपुस्तकातील आशयावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अधिकाधिक मार्क मिळवले, की विद्यार्थी हुशार झाला असे मानले जाणार.
आपली मूल्यमापन व्यवस्था देखील पाठपुस्तकातील आशयाचे मूल्यमापन करते. पाठयपुस्तकाच्या बाहेरचे आणि जीवनाविषयी, अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने जरी काही विचारले तर ती प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरचे मानलं जातात. हा प्रश्न पुस्तकातील आशयाच्या बाहेरचा आहे असे सांगितले जाते. पुस्तकात जे पाठ, कविता, संकल्पना असतील तेवढेच शिक्षण असा समज आहे. मुलांच्या साक्षरतेपुरता विचार करता आली की झाले. मात्र त्या वाचनातील वाचन समजपूर्वक किती आणि गणितातील क्रिया आकलनयुक्त किती याबददलचा विचार केला जात नाही. वर्तमानात साधारण फक्त तांत्रिकदृष्टया आपण विचार करतो… आणि ते आले की झाले असे आपण मानतो.
समाजालाही शिक्षणाचा विचार या पलिकडे करण्याची गरज वाटत नाही. जीवनाच्या गुणवत्तेपेक्षा स्पर्धेच्या नावाखाली मिळालेले मार्क अधिक महत्वाचे वाटतात.एकूणच आपल्या व्यवस्थेत शिक्षणाचा विचार अत्यंत संकुचित करण्यात आपल्याला यश मिळाले आहे. शिक्षण म्हणजे साक्षरता इतकाच विचार केला जाऊ लागल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते आहेच पण त्यापेक्षा राष्ट्राचे अधिक नुकसान होते आहे हे लक्षात घ्यायला हवे. पुस्तकात गुंतलेले शिक्षण आपण पुस्तकाबाहेर काढण्याची गरज आहे. शिक्षणाचा विचार हा व्यापक दृष्टीने करण्याची गरज आहे. पुस्तक म्हणजे ज्ञान असा विचारच सोडून देण्याची नितांत गरज आहे. पुस्तक म्हणजे शिक्षण नाही तर जीवनातील अनुभवाचे पुस्तके हेच खरे शिक्षण आहे.त्यामुळे शाळाशाळांमधून जीवन शिक्षणाचे पुस्तक उलगडून दाखविण्याची गरज आहे. विनोबा म्हणतात ,की “ज्यांना पुस्तकाच्या आधाराने ज्ञान देणे सोपे वाटते त्यांची दिशाभूल होत आहे”. गांधी, विनोबांच्या नई तालीम मधील शिक्षणाचा विचार आणि भूमिका वर्तमानात देखील अत्यंत गरजेची गोष्ट आहे. पुस्तकाशिवाय असलेले आणि जीवनाशी जोडून दिलेले अनुभवाचे ज्ञान हेच खरे शिक्षण आहे. पुस्तकातील पाठयांश शिकल्यामुळे विद्यार्थ्याला जीवनातील समस्या निराकरणाची शक्ती मिळते का ? जीवनात निर्माण झालेल्या समस्या आपल्याला सोडविण्यासाठी सक्षमता नसेल तर ते शिक्षण कुचकामी आहे.
गांधी ,विनोबांचा शिक्षण विचार म्हणजे ख-या शिक्षणाची वाट आहे. आपण त्यांनी सूचवलेल्या नई तालीमकडे दुर्लक्ष केले आहे. अनेकांना चरखा शिक्षणातून काय ज्ञान मिळणार ? असा सवाल केला आहे. चरखा हे प्रतिक आहे.काळ जसा पुढे जाईल त्याप्रमाणे चरख्याची जागा बदलत जाईल.काळाप्रमाणे शिक्षणात बदल अपरिहार्य आहे. मात्र आपण त्यामागील भूमिका आणि विचार समजावून घेण्यात निश्चित कमी पडलो आहोत.आपण शिक्षणात किती प्रगती केली असली आणि कितीही संशोधने केली तरी ती संशोधने देखील त्याच पाऊलवाटेचे समर्थन करताना दिसता आहेत.वर्तमानात शिक्षणाचा विचार करताना सर्वच तज्ज्ञ हे सांगू लागले आहे ,की आपण कृतीयुक्त शिक्षणाची वाट धरावी .त्या वाटेचे प्रवास आपल्याला गुणवत्तेचे शिखर दाखविणारे आहे. आपण ज्ञानरचनावादी तत्वज्ञान शिक्षणात रूजावे म्हणून प्रयत्न करत आहोत मात्र यापेक्षा विनोबा वेगळे काहीच सांगत नाहीत. नई तालीमचा शिक्षण विचार आणि अभ्यासक्रम हा जीवनाशी नाते सांगणारा आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडयात सांगितलेली तत्वे ही देखील विनोबाच्या शिक्षणाच्या विचार धारेतील दिसता आहेत.
कोणतेही शिक्षण हे माणसांचे जीवन अधिकाधिक सुखी करण्यासाठी असते. जीवनात निर्माण होणा-या समस्या निराकरण झाल्या ,की जीवन सुखी होते.त्या समस्या निराकरणाचा विचार शिक्षणातून येणार नसे तर शिक्षणाचा काय उपयोग आहे.शिक्षण अधिकाधिक जीवनाभिमुख करण्याची भूमिका सातत्याने प्रतिपादन करण्यात येत आहे. जीवनातील प्रश्नांचे निराकरण करणारे ते शिक्षण हवेच . शिक्षणातून जगण्याला हिम्मत आणि आत्मविश्वास मिळायला हवा. त्यामुळे शिक्षण अधिकाधिक जीवनाभिमुख करण्यावर विनोबाजी भर देतात. विनोबा म्हणतात की “समजा मुलांना गणित विषय शिकवायचा आहे. गणितातील बेरीज घटक शिकवायचा आहे. समजा दोन आणि तीन मिळून पाच होतात हे शिकवायचे आहे. मी तर म्हणतो की दोन आणि तीन एक होऊच शकत नाहीत. दोन दोनच राहतात आणि तीन तीनच राहतात ; पण मुलाला जर सांगितले की दोन आंबे आणि तीन आंबे मिळून पाच आंबे होतात, तर हे अधिक लवकर त्याच्या लक्षात येते. प्रत्यक्ष ज्ञान देणे कठीण आहे असे लोक म्हणतात. परंतु आज ज्या पद्धतीने ज्ञान दिले जाते ते त्याहून कितीतरी अधिक कठीण आहे. सृष्टी आणि मनुष्य यांच्यात पडदा उभा करून हे ज्ञान दिले जाते. अश्व म्हणजे घोडा असे शिकविले जाते, पण ज्याने घोडा पाहिलाच नाही त्याला ‘घोडा’ सांगूनही काय समजणार? तुम्ही मुलाला पदार्थ न शिकविता केवळ पर्यायपद शिकविता आहात. जे केवळ पदेच पाहतात त्यांचे ज्ञान भ्रांत असते”. त्यामुळे वर्तमानात विद्यार्थ्यांचा पूर्वानुभव लक्षात घेऊन अध्ययन अनुभवाची मांडणी करण्याची भूमिका प्रतिपादन करण्यात आली आहे.
विद्यार्थ्याला जे ज्ञान आहे त्याच्याशी जोडून आपण पाठातील एखादी संकल्पना पुढे घेऊन गेलो तर त्यातून आकलनास अधिक मदत होते.आकलन झाले तरच शिक्षणातून विवेक आणि शहाणपणाची पेरणी होण्याची शक्यता आहे.आकलनाशिवाय दीर्घकाळ स्मरणात तरी कसे राहणार ? जे आकलन होत नाही त्याचे स्मरण ठेवावे लागते.त्याच बरोबर साधारण जे जीवनाभिमुख आहे ते लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही.अनुभवातून जे शिक्षण मिळते ते शिक्षण विद्यार्थ्यांच्या आय़ुष्याचे निराकरण करण्यासाठीची हिम्मत देत असते.पुस्तकातील संकल्पना,आशय सोबत घ्यायला हवा मात्र तो प्रत्यक्ष जीवनाशी देखील जोडायला हवे हे विनोबा अत्यंत सुंदररितीने पटवून देताना दिसतात. एका विनोदी लेखकांनी एका इन्स्पेक्शन कथेत अत्यंत विनोदानी सांगितलेली प्रसंग नमूद केला आहे . त्यातील मतितार्थ लक्षात घ्यायला हवा.साहेब एकदा वर्गात तपासणीसाठी जातात.मुलांना पंधरा पेढे अधिक वीस पेढे असे गणित सांगतात.मात्र उत्तर अनेक मुलांना येत नाही.मग साहेब गुरूजींकडे पाहतात..आणि प्रश्न विचारतात “ गुरूजी मुलांना गणित शिकवले नाही का ? ” तर गुरूजी म्हणतात ,की साहेब मुलांना गणित येते पण प्रश्न चुकला आहे. तेव्हा साहेब आश्चर्य चकित होतात आणि विचारतात . “ माझे काय चुकले ? ” तेव्हा गुरूजी म्हणतात “ साहेब मुलांना गोटयांचे गणित शिकवले आहे ,तुम्ही पेढयांचे गणित विचारले आहे मग त्यांना ते गणित येणार नाही.” यात गणिता संदर्भात आकलनाचा विचार महत्वाचा आहे. विनोबाची दृष्टी आणि दिशा ही मुलांच्या गुणवत्तेची आहे.त्यामुळे पुस्तकाबाहेरचे शिक्षण जरी असले तरी ते कृतीयुक्त असेल तर आकलनाचा मार्ग अधिक सुलभ होतो.त्यामुळे वर्तमानात विनोबाची वाट आपल्याला शिक्षणाचा अर्थ दर्शित करते.त्यामुळे ती वाट चालायला हवी.
विनोबा म्हणतात ,की अठरा-वीस वर्षांपर्यंत पुस्तकांच्या आधाराने शिकत राहिल्यानंतर तुम्ही प्रवीण बनता आणि म्हणून तुम्हाला ती पद्धती सोपी आहे असे वाटते. परंतु ती सोपी नव्हे.अगदी खरे आहे.आपला मार्ग चांगला वाटणे साहजिक आहे मात्र त्यापलिकडे जाऊन वेगळा विचार केला गेला आणि त्या पध्दतीने अनुभव घेतला तर आपल्याला ती पध्दत योग्य वाटेल.कोणती पध्दती योग्य याचा विचार करण्यासाठी अनुभव आणि विश्लेषन यांचा विचार करायला हवे.जुने ते सोने असेलही पण ते शास्त्रीय पध्दतीने सिध्द करण्याची जबबादारी आहे.शिक्षण हे जितके अनुभव संपन्न आणि पाठयपुस्तकाच्या बाहेर जाईल तितके ते महत्वाचे आहे. विनोबानी अध्ययन अध्यापनाचा विचार करताना कसा विचार करायला हवा.याबाबत अधिक दृष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना आपण जितके प्रत्यक्ष जीवनातील अनुभव देऊ तितके शिकणे परिणामकारक होत असते. शेतक-यांची मुले शाळेत शिकत असतात.मुले सतत निसर्गाच्या सोबत असतात.मात्र त्यांना वनस्पती आणि वनस्पतीचे अवयव वर्गात शिकवले जातात. ते वर्गात सांगून ,कथन करून शिकवले आणि त्या घटकांविषयी प्रश्न विचारले तर पुन्हा मुलांना अवयव सांगणे कठीण जाते याचे कारण शिकणे वर्गात आणि अनुभवाशिवाय झाले आहे.आता तोच घटक प्रत्यक्ष अनुभव देत परिसरात झाले तर मुलांच्या सहज लक्षात राहील.त्यातून ते पंचज्ञान इंद्रियाच्याव्दारे अध्ययन अनुभव घेत असतात.जे अनुभव पंचज्ञान इंद्रियाच्या आधारे घेतले जातील ते अधिक काळ लक्षात राहण्यास मदत होत असते.त्यामुळे अनुभवाच्या आणि कृतीच्या आधारे शिकवणे म्हणजे पंचज्ञान इंद्रियाच्या आधारे शिकणे होत असते.या दिशेने जितके शिकणे अधिक होईल तितक्या मोठया प्रमाणावर गुणवत्तेची वाट चालणे शक्य आहे.त्यामुळे आपण कोणत्या दिशेने जायचे हे निश्चित करायला हवे.असे अनुभवाचे आधारे शिक्षण,जीवनाशी जोडून शिक्षण म्हणजे पूर्णतः पुस्तकावर बहिष्कार असे नाही.नई तालीम पुस्तकांवर बहिष्कार घालीत नाही, तर त्यांचा समुचित उपयोग करते आहे.केव्हा पुस्तक वापरायचे आणि केव्हा प्रत्यक्ष अनुभव द्यायचा याचा विचार करण्याची गरज आहे.
प्रत्येक गोष्ट ज्ञान-साधनेसाठीच केली जात असते.जगातील प्रत्येक गोष्ट आम्हाला शिक्षण देते.विनोबा म्हणतात एक दिवस मी उन्हात फिरत होतो. चहूकडे मोठमोठे हिरवे वृक्ष दिसत होते. मी विचार करू लागलो की वरून इतके कडक ऊन लागत आहे, तरी हे वृक्ष इतके हिरवेगार कसे दिसतात ? ते वृक्ष माझे गुरू बनले. माझ्या लक्षात आले की जे वृक्षावरून इतके हिरवेगार दिसत आहेत त्यांची मुळे जमिनीत अति-खोल गेली आहेत आणि तेथून ते पाणी घेतात. याप्रमाणे आम्हाला आतून भक्तीचे पाणी आणि बाहेरून तपश्चर्येचे ऊन मिळेल तर आम्ही उंच वृक्षांप्रमाणे हिरवेगार होऊ. आमच्यासमोरील निसर्ग ज्ञानाने परिपूर्ण आहे. आमचे स्वयंपाकघर ही आमची प्रयोगशाळा असली पाहिजे. तेथे काम करणाराला कोणत्या खाद्यात किती उष्णांक, किती ओज, किती स्नेह इत्यादी सर्व शास्त्रीय गोष्टी माहीत पाहिजेत. कोणत्या वयाच्या माणसाला कोणत्या कामाला कसा आहार लागेल याचे गणित त्याला करता आले पाहिजे. स्वयंपाक करणे, भाजी कापणे या गोष्टीतून देखील शिकणे होणार आहे.त्यामुळे आपल्या जीवनातील अनुभव हेच शिक्षण आहे.त्या प्रत्येक अनुभवात दडलेल्या शिक्षणाचा शोध घेण्याची गरज आहे.तो शोध आपल्याला शिक्षणाच्या अपेक्षित उददीष्टांपर्यंत घेऊन जाईल यात शंका नाही.अनुभव हेच शिक्षण लक्षात घेऊन पुढील दिशा घ्यायला हवी.
– संदीप वाकचौरे
(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)