Wednesday, May 22, 2024
Homeब्लॉगनई तालिम-परिवर्तनाची वाट

नई तालिम-परिवर्तनाची वाट

शिक्षणात मांडण्यात आलेल्या अनेक क्रांतीकारक विचाराच्या पाऊलवाटेने चालणे झाले असते तर जगाच्या पाठीवर निश्चित परिवर्तन झालेले आपल्याला अनुभवास आले असते. शिक्षणात प्रचंड मोठी शक्ती सामावलेली आहे हे आजवर अनेकदा अनेक देशांनी आपली प्रगतीची झेप घेऊन सिध्द केले आहे. शिक्षणात जर एवढी मोठी शक्ती असेल तर शिक्षणासंदर्भाने अधिक गंभीर विचार करण्याची गरज आहे. आज आपण ज्याला शिक्षण म्हणतो ते शिक्षण म्हणजे केवळ अक्षरांची साक्षरता आहे.

खरंतर शिक्षणात नाविन्याचा शोध आहे, सृजनाची वाट आहे. शिक्षणाने जीवनाची मुक्ती आणि समाजाचा उध्दार आहे. शिक्षणात अनेक उन्नतीचे मार्ग सामावलेले आहेत. मात्र गेले अनेक वर्ष आपण ती वाट चालूनही आपल्याला शिक्षणाच्या ध्येयाचा अनुभव घेता आलेला नाही. याचा अर्थ शिक्षणाची शक्ती संपली आहे असे नाही, तर शिक्षणाची दिशा चुकली आहे असे म्हणता येईल. शिक्षणातील शक्तीचा अनुभव येत नसेल तर शिक्षण कुचकामी आहे असे नाही तर नेमके काय चुकते आहे हे जाणून घ्यायला हवे. संत ज्ञानेश्वरानी म्हटले आहे ,की “देवाची ये व्दारी उभा क्षणभरी / तेणे मुक्ती चारी साधलिया..” जीवनाची सार्थकता म्हणजे मुक्ती आहे. ती तर केवळ क्षणभर देवाच्या दारात उभे राहिले तरी मुक्तता प्राप्त होणार आहे. इतकी मोठी जीवनाच्या उन्नतीचा वाट सहज सुलभतेने ज्ञानेश्वर महाराज दाखवत आहे. अलिकडे काही लोक तर वर्षानुवर्ष देवाच्या दारात उभे आहेत पण त्यांना मुक्तीचा अनुभवाची वाट सापडत नाही.देवाच्या दारात उभ्या राहण्यात असलेला भाव महत्वाचा आहे. त्या उभे राहण्यात किती आर्तता आहे हे महत्वाचे आहे.आपण देवाच्या दारात केवळ मागण्यासाठीच उभे राहणार असू.. तर त्याचा काय उपयोग? सतत मागणी घेऊन उभे असणा-या भक्ताला खरच देव पावेल का ? मागण्यात देखील प्रकार आहे.

- Advertisement -

आपले मागणे म्हणजे भीक ठरता कामा नये. संत ज्ञानेश्वरांनी आश्वासन देऊनही जर आपल्याला तसा अनुभव येत नसेल तर आपल्या साधनेत दोष आहे हे लक्षात घ्यायला हवे.संतानी मांडलेला विचारात अनुभवाची मांडणी आहे .संताचे अभंग म्हणजे काही शब्दांचा फुलोरा नाही . त्यांच्या शब्दात असलेली शक्ती ही अनुभवाची आहे.त्यात सत्व सामावलेले आहे म्हणून त्यांच्या शब्दांना अभंगत्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे विनोबा ज्या नई तालिमबददल बोलता आहेत तो शिक्षणातील विचार हे परिवर्तनाचा आहे. त्यांच्या शिक्षण विचारात मोठी शक्ती सामावलेली आहे. त्यांची वाट अवघड आहे मात्र ती समाजाच्या व राष्ट्राच्या कल्याणाची आहे. आज आपण चालत असलेल्या शिक्षणाच्या वाटेने परिवर्तन दिसत नसेल तर पुनर्विचार करण्याची निंतात गरज आहे.

विनोबां, गांधीनी मांडलेल्या नई तालिम शिक्षणात मूलगामी परिवर्तनाचा विचार आहे. नई तालीममध्ये मांडलेल्या विचारात वरवर फार काही असे वाटत असेलही. नई तालिम म्हणजे चरखा आणि सूत कताई असेच काहींना वाटत असेल, पण त्या प्रक्रियेत आणि विचारात प्रचंड शक्ती सामावलेली आहे. ही वाट चालणे ज्यांनी पसंत केली आणि जगाने अनुभवले आहे त्यांना त्या शिक्षणाची विचाराची शक्ती ज्ञात आहे. नई तालीमच्या वाटेने चालत गेले तर आपल्याला सामाजिक क्रांतीचा विचार त्यात सामावलेले अनुभवास येईल. त्या वाटेच्या प्रवासाने समाजात दिसणारी सामाजिक विषमता नष्ट करता येणार आहे. त्या शिक्षण धारेत परिवर्तनाची शक्ती सामावली आहे. विनोबांना त्या शक्तीचा अंदाज केव्हाच आला होता.त्यामुळे स्वातंत्र्यानंतर ही वाट चालणे खरचं गरजेची होती. आपल्याला केवळ इंग्रजाच्या तावडीतून मुक्तता मिळाली म्हणजे स्वातंत्र्य मिळाले असे नाही. आपण इंग्रजांनी निर्माण केलेल्या गुलामीच्या शिक्षण वाटा देखील दूर सारायला हव्या होत्या.

आपण त्यांनी चाललेल्या वाटेनेच प्रवास सुरू ठेवल्याने आपल्याला येणारे अनुभव देखील त्यांना जे अपेक्षित होते त्याच स्वरूपाच अनुभवास येत आहे.नई तालीमच्या शिक्षण विचारात राज्यसत्ता नष्ट करण्याची शक्ती सामावलेली आहे असे म्हटले जाते.विनोबा म्हणतात ,की काल (१९५६) काकासाहेब कालेलकरांनी म्हटले होते ; की राज्यसत्तेला नष्ट करणे हे विनोबांचे काम आहे व त्यासाठी नई तालीम साधन म्हणून उपयोगी पडेल. त्यांनी विलक्षण भाषेत ती वस्तू तुमच्यासमोर मांडली. त्यात नई तालीमचे यथार्थ वर्णन सामावलेले आहे. भगवान बुद्धांनी म्हटले होते, ‘तदुट्ठाय तमेव खादति’ लाकडातून एक किडा उत्पन्न होतो आणि त्या लाकडालाच खातो. त्याप्रमाणे आज आस्तित्वात असलेल्या शासनाने जर नई तालीमला जन्मास घातले तर ती नई तालीम ते शासन नष्ट करील. अशा स्वरूपाचे शासन नष्ट होण्यातच समाजाचे भले आहे. शिक्षणातील शक्ती किती आहे हे यातून अधोरेखित करण्याचा केलेला प्रयत्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर अंदाज येऊ शकेल.कदाचित यामुळे तर अनेकांनी नई तालिमची वाट चालणे नाकारले तर नाही ना ?

बिहारमध्ये तुर्की येथे झालेल्या शिक्षण परिषदेला विनोबांनी संदेश पाठवला होता, त्यात त्यांनी म्हटले होते ; की “ शिक्षण आणि रक्षण असे दोन विभाग असतात, परंतु अहिंसक समाजात शिक्षण हेच रक्षण असते. पोलिस व सैन्य यांना खतम करण्याची जबाबदारी शिक्षणाची असली पाहिजे. अशी शक्ती ज्या शिक्षणात नाही, ते शिक्षण दासी आहे, राणी नाही. ते नेहमी पराधीन राहील. शिक्षण हेच समाजाचे रक्षक असायला हवे ”. शिक्षणाची वाट चालत गेले तर समाज अहिंसेच्या मार्गानेच चालणे पसंत करेल.हिंसा ही शिक्षणाची वाट नाही.जो समाज शिकला आहे आणि तरी हिंसा करणे पसंत करतो आहे याचा अर्थ शिक्षणाचा कोणताही परिणाम त्यांच्या मनावर साधला गेलेला नाही. अंहिसेची वाट चालणारा समाज असेल तर आपल्याला इतर कोणत्याही संरक्षण व्यवस्थेची गरजच पडणार नाही. शिक्षणातून विचार पेरले जात असतात. विचाराची बीजे मस्तकात असतील तर हिंसा घडत नाही.शिक्षण म्हणजे विचाराची पेरणी असते हे लक्षात घ्यायला हवे. शिक्षण जर मूल्यांचा विचार पेरत जाईल तर समाजातील मूल्यहीनते पासून असलेला धोकाही दूर करण्याची शक्ती शिक्षण देऊ शकेल.

शिक्षणाची पेरणी उत्तम झाली तर समाजातील संघर्ष संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही.शिक्षणाचा उददेशच विषमता नष्ट करणे ही आहे. विषमता नष्ट करण्यात जर यश आले तर समाजातील संघर्ष आपोआप थांबतील. संघर्षाची जी अनेक कारणे आहेत त्या कारणांचा विचार केला तर आपल्या सहजतेने लक्षात येईल ,की गरीबीमुळे मोठा संघर्ष आहे. इच्छा नसताना देखील अनेकांना चुकिच्या वाटा चालाव्या लागतात. गरीबीतून अनेक प्रश्न निर्माण होतात हे जगाने अनुभवले आहे. त्यामुळे गरीबी नष्ट झाली तर समाजातील अनेक संघर्ष थांबतील.गरीबी पदरात असल्याने उदरनिर्वाहासाठी पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे शिक्षणावरील खर्च म्हणजे चैन वाटते.त्यातून व्यक्तीच्या जीवनात शिक्षणाचा अभाव आपोआप येतो. गरीबीमुळे पोटभर अन्न नाही.गरीबीमुळे शिक्षण नाही.शिक्षणाचा अभाव असल्याने भोवताल जाणून घेण्यात अडचणी येतात.आकलनात देखील अडचणी येणार .शिक्षणाशिवाय शहाणपण आणि विवेक नाही म्हणजे त्याचा अभाव असणार हे साहजिक आहे .त्यामुळे संघर्षातून सुटका कशी होणार ? आपल्याला शिक्षण उत्तम आणि गुणवत्तापूर्ण मिळाले तर शहाणपणाची पेरणी होण्यास मदत होईल.त्यातून समाजातील संघर्ष आपोआप थांबण्यास मदत होईल. समाजात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले तर शहाणपणाने समाजात कोणताही भेद राहणार नाही.विषमता देखील संपुष्टात येण्यास मदत होईल त्यामुळे एका अर्थाने शिक्षण हे समाजाच्या रक्षणाची भूमिका पार पाडेल.शिक्षणातून माणूस घडला तर बरेच प्रश्न निकाली निघतील.शिक्षणातून मूल्यांची पेरणी झाली, मूल्यांचा विचार मनामनावर उमटवला गेला तर अनितीची वाट कोणी चालणार नाही. सारा समाजच मूल्यांच्या वाटेने चालेल तर बरेच प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल.त्यामुळे शिक्षणाच्या अभावाने निर्माण होणारे प्रश्न शिक्षणाच्या मदतीने निश्चित दूर करता येईल.

शिक्षण हे सर्वार्थाने रक्षक आहे. मूल्यांची स्थापना करायची असल्याने क्रियेद्वारे ज्ञान देण्याची भूमिका विनोबा मांडता आहेत. मात्र ही वाट चालली म्हणजे काही नई तालीम बनत नाही. शिक्षणाच्या या वाटेच्या प्रवासाने नवा समाज स्थापन करण्याची अपेक्षा विनोबा व्यक्त करत आहे. अगदी नव्या समाजाची स्थापना करू इच्छितात म्हणून नई तालीम असे नाव या योजनेला देण्यात आले आहे. नई तालीम ही केवळ शिक्षणाची एक पद्धती आहे, उद्योगाद्वारा शिक्षण देण्याची पद्धती आहे, असे कोणी म्हणत असेल तर ते चुकीचे आहे. नई तालीम तर नव्या समाजाची निर्मिती करण्यासाठी आहे.शिक्षण म्हणजे केवळ एका अंगाने उददीष्ट नाही तर शिक्षणातून आपण समाज घडवत असतो.शिक्षण संस्थेचे मुख्य काम हे समाज घडविण्याचे आहे.आज तर केवळ आपण अक्षराची साक्षरता पेरत आहोत.त्यामुळे समाज घडविण्याचा विचारही आज शिक्षणाच्या प्रवासात होताना दिसत नाही.मात्र नई तालिमचा विचार केवळ साक्षरतेचा नव्हता,त्यातून माणूस आणि समाज घडविणे हे मुख्य ध्येय होते.ती वाट चालण्याची गरज तर वर्तमानात अधिकाधिक अधोरेखित होते आहे.आपण शिक्षणाच्या मूळ ध्येयापासून दूर जात आहोत हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होते आहे.

नई तालीम म्हणजे नव्या मूल्यांची स्थापना आहे. जुनी तालीम चोरीला पाप समजत होती; नई तालीम फक्त चोरीलाच नव्हे तर जास्त संग्रहाला देखील पाप मानते. आपल्या शिक्षणात मूल्यांचा विचार आहे.अपरिग्रह ही वृत्ती शिक्षणातून विकसित करण्याचे आव्हान आहे.संग्रह करण्याने इतरांच्या जीवनावर त्या वृत्तीचा परिणाम होतो.देण्याची वृत्ती राखते ते खरे शिक्षण तर संग्रही करायला शिकवते ती निरक्षरता आहे. शिक्षणातील बदलाचा विचार यात आहेच ; पण नई तालिमने नवी दृष्टी देण्याचे काम केले आहे.जुनी तालीम शारीरिक आणि मानसिक परिश्रम यांच्या मूल्यांत फरक करत होती. नई तालीमचा विचार केला जातो तेव्हा दोहोंचे मूल्य समान मानले जाते.आपल्याला केवळ श्रम करून उन्नतीच्या दिशा मिळेल असे घडणार नाही.त्यासाठी शारीरिक आणि मानसिक परिश्रमाचा विचार करण्याची गरज आहेच.त्यांच्यात भेद असला तरी उन्नती आणि प्रगतीचा वाट दोन्हींच्या सोबतीने घडणार आहे. त्यामुळे दोन्हीचा विचार महत्वाचा आहे एवढेच नव्हे तर दोहोंचा समन्वय करण्याचा विचारही महत्वाचा आहे हे लक्षात घ्यायला हवे. नई तालिममध्ये दोहोंचा समवाय साधला जात आहे. जुनी तालीम क्षमतेला महत्त्व देत होती. नई तालीम क्षमतेला समतेची दासी मानते. जुनी तालीम लक्ष्मी, शक्ती, सरस्वती यांना स्वतंत्र देवता मानून त्यांची पूजा करीत असे. नई तालीम मानवतेला पूजते आणि त्या तिघांना तिच्या सेवेचे साधन समजते.

नई तालिमचा विचार हा मानवतेचा आहे.मानवता ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे.आज आपण मानवतेचा विचार गमावला आहे.शिक्षणातून तो विचार प्रतिबिंबीत होण्याची गरज असताना ते घडताना दिसत नाही.त्यामुळे नई तालिममध्ये मानवतेला अधिक महत्व आहे.तिथे होणारी पूजा ही देखील मानवतेची आहे.मानवतेची पूजा करायची आहे त्यासाठी लक्ष्मी,सरस्वती आणि शक्तीची गरज आहे.त्यांच्याव्दारे मानवतेची पूजा केला जाईल.ही गोष्ट कितीतरी महत्वाची आहे. आज ज्यांच्याकडे लक्ष्मी आहे त्यांच्यामध्ये मानवतेचा दृष्टीकोन असेलच असे नाही.सरस्वती असलेल्यांमध्ये देखील मानवतेची उपासना होण्याची शक्यता नाही. शक्ती असलेली माणसं मानवतेची वाट चालतील असे नाही , मात्र नई तालिममध्ये असलेला विचारांत मानवतेच्या उपासनेचा विचार केला जात आहे.त्यामुळे नई तालिम म्हणजे केवळ शिक्षणाचा विचार नाही तर त्या माध्यमातून मानवतेचा विचार रूजविणे आहे.जेथे ज्ञान आहे आणि मानवता आहे अशीच वाट अधिक महत्वाची आहे. त्यामुळे या वाटेने आपण गेलो तर आपल्याला एका चांगल्या समाजाची वाट सापडेल. शेवटी आपण जीवनात यश मिळवायचे म्हणजे काय तर मानवतेचा विचार घेऊन पुढे जाणे आहे.त्यामुळे नई तालिमचा विचाराने आपण प्रवास सुरू केला तर परिवर्तन निश्चित आहे.

संदीप वाकचौरे

( लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे )

- Advertisment -

ताज्या बातम्या