व्यक्ती ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला उच्चतम यश मिळवायचे असेल, तर ज्ञानाच्या भूकेला कोणताही पर्याय नाही.त्यामुळे ही ज्ञानाची भूक आपण कशी शमावतो हे महत्वाचे आहे. आपण ज्ञानाच्या प्रक्रियेत उपाशीच राहाण्याचा निर्णय घेतला तर जीवन कुपोषित होण्याची शक्यता अधिक आहे. शिक्षणात कार्यरत असताना ज्ञानाची भूक नसेल तर शिक्षणात प्रभावीपणे व परिणामकारक काम कसे करता येईल? ज्ञान मिळवायचे म्हणजे आपण नव्या प्रवाहाशी जोडून घ्यावे लागणार आहे. नवनविन विचार जाणून घ्यावे लागतील. चिंतन,मनन करावे लागणार आहे. जीवन सुखी करण्याचा हा एकमेव राजमार्ग आहे. अर्थात जीवनात प्रसिध्दी,प्रतिष्ठा,पैसा हे काही यशाचे मोजमापाचे सूत्र असू शकत नाही. त्यामुळे ज्ञानी माणूस या सर्व ‘प’ पासून दूर राहणे पसंत करतो. त्याला ज्ञानाची भूक असल्याने स्वतःच्या जीवनाची ओळख झालेली असते.
जीवन म्हणजे काय हे त्यांने जाणलेले असते.त्यामुळे शक्यतो ज्ञानी माणसं अलिप्त राहाण्याचा प्रयत्न करतात.ज्यांना ज्ञानाचा परिचय झाला ती माणसं जीवनभर फकिरी वृत्तीने जगत असतात.बौध्दांना ज्ञानाचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी संपत्ती आणि राजसत्तेचा त्याग केला.गांधी नावाच्या माणसांला जीवनाचा अर्थ कळाला आणि त्यांने नंगा फकिर म्हणून जगण्याची वाट शोधली.ज्ञान म्हणून जे जे काही आहे ते सारेच जीवनाचा अर्थ जाणून देण्याचा प्रयत्न करत असते.ज्ञानी माणसांचा बाहय संघर्ष कमी असतो आणि अंतरिक संघर्ष सतत सुरू असतो.म्हणून ज्ञानाची वाट चालणारी माणसं जीवन अधिक आनंदाने जगत असतात.अज्ञानात तर यशाच्या व्याख्या भिन्न आहे.अज्ञानात संग्रह ही संपत्ती आहे.ज्ञानशुन्यता असेल तर जीवनाच्या आनंदाच्या वाटा भिन्न असतात.त्यामुळे ज्ञानी त्यागाची वाट चालतो आणि अज्ञानी संग्रहाची वाट चालण्यात समाधान शोधत असतो.शिक्षणात तर संग्रह हवाच पण तो ज्ञानाचा हवा.ज्ञा नी माणसाला तशा अर्थांने संग्रह करण्याची वेळ पडत नाही.कारण त्याचे जीवन ज्ञानमय झालेले असल्याने तो ज्ञानासोबतच चालत असतो.
शिक्षणात तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही.जगाच्या पाठीवर सर्वच क्षेत्रात बदल होत असतील तर शिक्षणातही बदल अपराहार्य आहे.आपल्या भोवतालमध्ये आपण शोध घेतला तर आपल्याला काय दिसते ? परिवर्तनाचा विचार केला तर जगात शिक्षणात अत्यंत कमी वेगाने परिवर्तन होत असते. शिक्षणात जुने ते सोने या न्यायाने आपल्याला काम करून चालत नाही.शिक्षण हे चैतन्यदायी करायचे असेल तर शिक्षणात काम करणा-या प्रत्येकाने ज्ञानाची वाट चालण्याची गरज असते.ज्ञानाचा शोध घेत आपण चालू लागण्याची गरज आहे.आपल्या भोवतालमध्ये ज्ञान सामावलेले आहे.त्याचा शोध घेत गेले की ज्ञानाचा शोध लागत जातो.मुळात सारेच भोवतालमध्ये आहे.फक्त दृष्टी असली की ज्ञानापर्यंत पोहचता येते. वैज्ञानिकांनी जे संशोधन करत ज्ञान निर्माण केले ते काही नविन नाही.मुळात निसर्गात ते आस्तित्वात होते आणि जे आस्तित्वात आहे त्याचा फक्त शोध लावला.निसर्गात नाही आणि शोध लागला असे घडत नाही.त्यामुळे ज्ञानाची वाट चालण्यासाठी विविध मार्ग अनुसरण्याची गरज पडते.
जगाच्या पाठीवर कोणताही एक असा ज्ञानाचा मार्ग नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे. ज्ञानासाठी केवळ पुस्तके महत्वाची आहेतच,त्याशिवाय इतरही अनेक मार्ग आहेत.ज्ञानासाठी अनुभव,संवाद,ग्रंथ वाचन,शरीरश्रम यासारख्या अनेक मार्गानी आपण चालत राहायला हवे.तो मार्ग आपल्या एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाईल.जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत ज्ञानाची तृष्णा असेल तर आपण जगण्याला पात्र आहोत.ज्या क्षणी आपली ज्ञानाची तृष्णा थांबते त्या क्षणी आपण स्वतःच स्वतःला मृत घोषित करावे.इतरांना मृत वाटत नसलो तरी त्याची ओळख केवळ जीवंत शरीर अशी बनते. खरेतर आपण स्वतःला जितके ओळखत असतो तितके कोणीच आपल्याला ओळखत नाही. त्यामुळे आपण किती ज्ञानाची खोल खोल वाट चालतो हे आपण जाणत असतो.
ज्ञान शुन्यता असेल तर माणूस जीवंत आहे ही ओळख राहत नाही.आहे त्या ज्ञानावर आपला प्रवास सुरू राहीला तर आपण त्या क्षेत्रात स्वतः सिध्द करू शकत नाही.त्यामुळे शिक्षणात डी.एड,बी.एड.एम.एड सारख्या श्रेणीबध्द अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.अर्थात या पदव्यांतमध्ये आपल्याला माहिती मिळते मात्र ते ज्ञान नाही मात्र तरी त्या माहितीच्या अनुषंगाने ज्ञानाचा प्रवास करता येणे शक्य आहे.ज्ञानाची ओळख ही महत्वाची गोष्ट आहे.आपण शिकत जातो,पदव्या मिळवत जातो त्याप्रमाणात ज्ञानाचा विस्तार किती मोठा आहे हे लक्षात येत जातो.हा विस्तार जाणता आला की आपल्याला आपले शुन्यत्व जाणण्यास मदत होते.
अनेकदा आपल्या भोवती शिक्षण क्षेत्रात अनेक माणसं काम करताना दिसतात.कोणी अधिकारी असते आणि कोणी शिक्षक असते. ही सारी श्रेणीबध्द स्तरीय रचना आहे. उच्च पदाचा लोक आदर करतात , पण ती व्यक्ती ज्ञानी असेल तर त्यांच्या पदासह ज्ञानी व्यक्ती बददलही आदर केला जातो.त्यामुळे ती व्यक्ती पदावरून निवृत्त झाली तरी तीच्या बददलचा आदर सतत व्यक्त होत असतो. तो आदर पदाचा असत नाही तर तो ज्ञानाचा असतो. अनेकदा उच्च पदावर असताना ज्ञानाची साधना नसेल तर आदर कसा मिळणार ? हा प्रश्न आहे.ज्ञानाची भूक असलेल्या व्यक्तीला खोटया सन्मानाची गरज वाटत नाही. खोटा सन्मान,आदर ज्याला हवा वाटतो त्याला माणूस कसे म्हणावे ? खोटया प्रतिष्ठेची भूक ही ज्ञानशुन्यता आहे. ज्याला ज्ञानाची भूक आहे त्याला जगातील ज्ञानसाधकांचा परिचय असतो.
आपण केवळ ज्ञानाच्या उंचीवर असलेल्या माणसांचा विचार केला तर आपण फार काही मोठया उंचीवर नाही हे सहजतेने लक्षात येते.जगाच्या पाठीवर इतिहासात अनेक माणसं अशी होती , की जी सतत अभ्यास करत होती.अनेक माणसं सतत ज्ञानासाठी धडपड करत होती.आपल्या शिक्षण व्यवस्थेत ज्यांना सन्मान दिला गेला आहे,पेशाची प्रतिष्ठा त्यांना लाभली आहे असे साने गुरूजी,वि.स.खांडेकर,नरहर कुरूंदकर अशी कितीतरी माणसं अद्यापही समाजमनात जीवंत आहे.त्यांना जाऊन बराच काळ झाला पण ते गेले नाहीत , ती माणसं अजूनही मनामनात आहे.आपल्यासाठी ती वाट आहे.जीवनभर ही माणसं शिक्षक राहिली.त्यांनी वर्गात किती काळ शिकवले त्यापेक्षा त्यासाठी त्यांनी जीवनभर जी वाट चालत समाज शिक्षणासाठी पेरणी केली ती अधिक महत्वाची आहे हे लक्षात घ्यायला हवे.
शिक्षक हा केवळ वर्गाचा असत नाही तर तो समाज शिक्षक असतो.समाजाला शहाणे करण्याचा सतत प्रयत्न त्याने करायचा असतो.शिक्षक जेव्हा जातो तेव्हा त्यांना समाजासाठी काही मागे ठेऊन जाण्याची गरज आहे.समाजात त्यांने केलेली विचाराची पेरणी महत्वाची आहेच.जो ज्ञानी नसेल तो स्वतःची पाऊलवाट निर्माण करण्याचा प्रयत्न न करता मळलेल्या वाटेने जाणे पसंत करतात.ज्ञानी माणूस स्वतःची वाट स्वतः निर्माण करतात.आपण वर्तमानात ज्या वाटांनी चालणे पसंत करतो ती कोणी तरी निर्माण केली आहे.ती शहाणपणाची वाट आहे असे आपण म्हणतो ,मात्र त्या वाटेचा प्रवास हा काही आपल्या ज्ञानाचा नाही.त्यामुळे विद्यार्थी लहान असला की तो मोठयांच्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करतो आणि मोठा झाला की तो स्वतःची वाट निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतो.
विनोबा म्हणतात की लोक म्हणतात ‘ विनोबा एक शिक्षक आहेत ‘ हे म्हणणे अयोग्य नाही; परंतु मी एक विद्यार्थी आहे हे म्हणणे अधिक योग्य होईल. माझे तुरुंगाचे सोबती माझ्या विद्यार्थीपणाचे साक्षी आहेत. अध्ययनासाठी बाहेरच्या प्रेरणेची मला जरूर भासत नाही. मुळात स्वतःची ओळख झाली ,की आपणच आपली वाट निर्माण करण्यासाठी धडपडत असतो. स्वतः विद्यार्थी असणे ही ज्ञानाची वाट चालण्याची साक्ष आहे.आपण एकदा शिक्षक बनलो आहोत अशी धारणा निर्माण केली ,की मग ज्ञानाची वाट चालण्याचा प्रयत्नात कमतरता निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. खरंतर ज्ञानासाठी बाहय प्रेरणा असेल तर आपण निरंतर ज्ञानाची वाट चालू शकत नाही. वेतनवाढ मिळेल, पुरस्कार मिळेल म्हणून काम करणे समजू शकतो..पण ती वाट साध्य झाली की कामाची वाट अरूंद होत जाते.पण मला ज्ञान मिळवायचे आहे. ज्ञानी बनायचे आहे.हे सारे मला माझ्यासाठी करायचे आहे असे आपणच आतून ठरवले तर ज्ञानापासून दूरावण्याची शक्यता नाही.जगातील विचारवंत, तत्वज्ञ, ऋषी, मुनी,वैज्ञानिक,संशोधक यांच्यात तर अंतरिक प्रेरणा होती म्हणून ते ज्ञानाच्या वाटेने सतत चालत होते.
विनोबा म्हणतात ,की मी आपल्या आयुष्याचा अधिक काळ प्रत्यक्ष कामातच घालविला आहे. तरीही माझी बुद्धी नेहमी ताजी असल्याचा अनुभव मला येतो. मोकळ्या हवेत शरीरश्रम करीत राहणे हे याचे मुख्य कारण मी मानतो. त्यामुळे, तापलेली जमीन पावसाकरता जशी तयार राहते तशी बुद्धी ज्ञानग्रहणाला नेहमी तयार राहाते. शारीरिक मेहनतीने तापलेली बुद्धी ज्ञान ग्रहण करण्याकरिता उत्सुक असते आणि ज्ञानाला फलद्रूप करते .” जमिन तापली की पाणी आपोआप घेते.त्याप्रमाणे शाळा,महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान भरीत बसायचे नाही, तर त्यांच्यात ज्ञानाची तृष्णा उत्पन्न करावयाची आहे.ज्ञानाची तृष्णा प्राप्त झाली की त्या दिशेने तो प्रवास करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे तृष्णा प्राप्त करण्याची शक्ती शिक्षणातून निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर बरेच काही साध्य होण्याची शक्यता अधिक आहे.अलिकडच्या संशोधनातून हे सिध्द झाले आहे ,की विद्यार्थी स्वतःच शिकत असतो. उपनिषदात देण्यात आलेल्या विविध उदाहरणांचा आपण विचार केला तर लक्षात य़ेईल ,की विद्यार्थी राणावनात गाई चारत शिक्षण मिळवितो. तो निसर्गासोबत राहात असतो.त्यामुळे ज्ञानाची तृष्णा असल्याने भोवतामध्ये जे जे ज्ञानाचे मार्ग आहेत ते सारे मार्ग तो चालत राहाण्याचा प्रयत्न करत असतो. कधी त्याला एखादा बैल ज्ञान देतो, कधी एखादी चिमणी ज्ञान देते, कधी एखादा वृक्ष ज्ञान देतो.अनेकदा पर्वत,नदी,झाडे,पाने,फुलांच्याव्दारे त्याला ज्ञान प्राप्त होत असते. ज्ञान मिळाल्यामुळे त्याचा चेहरा सतेज होतो. त्याचा चेहरा पाहून गुरू म्हणतो,
‘वत्सा, तुला ज्ञान मिळालेले दिसते’. तो म्हणतो, ‘ गुरुमुखाशिवाय ज्ञान कसे?’ गुरू म्हणतो, ‘तुला खरोखर ज्ञान मिळालेले आहे. तुझी विद्या निर्दोष आहे.’ गुरूचा शिक्का मिळाला की त्याचा गुरुकुलवास समाप्त होतो. तेव्हा ज्ञान ही वस्तू माणसामार्फत मिळू शकते हा आपला अहंकारही व्यर्थ आहे. माणसाकडून मिळणारे ज्ञान अंशमात्र असते.त्यामुळे ज्ञान मिळाले की चेह-यावरील तेजात होणारी वाढ माणसांचा आनंद व्दिगुणीत करत असते.अनेकदा ज्ञानी माणसांला भेटल्यावर भेटणा-यांच्या मनात ज्या लहरी निर्माण होतात त्या लहरी या ज्ञानी व्यक्तीच्या तेजाच्या असतात आणि त्याच्या चेह-यावर असणारे तेज हे ज्ञानाचे असते.शिक्षक जर ज्ञानाची वाट चालेल तर त्याच्या चेह-यावर तेज निर्माण होईल.त्या तेजाने विद्यार्थी दिपून जाईन आणि तोही आपल्या शिक्षकांच्या वाटेने चालणे पसंत करेल.म्हणून समाजात शहाणपणाची पेरणी करायची असेल तर शिक्षकांनी ज्ञानाची वाट चालायला हवी.त्याचे शिकवणे म्हणजे दुसरे तिसरी काही नाही तर ज्ञानाची तृष्णा निर्माण करणे आहे.
संदीप वाकचौरे
( लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे )