शिक्षण म्हणजे समाज व राष्ट्र उन्नतीचा विचार आहे. शिक्षण हे केवळ अक्षरांच्या साक्षरतेसाठी नाही. मिळणारे मार्क म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण नाही. शिक्षण म्हणजे स्वतःच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार नष्ट करण्याबरोबर इतरांच्या जीवनातील अंधकार नष्ट करण्याचा राजमार्ग आहे. शिक्षणामुळे माणसांच्या अंगी स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण होते. स्वातंत्र्य उर्मी माणसाला अधिक गुलामीच्या विचारापासून दूर नेत असते. शिक्षण घेतलेली माणसं म्हणजे समृध्द समाज. राष्ट्र व समाजाच्या कल्याणाचा मार्ग हा शिक्षणातूनच जात असतो, मात्र दुर्दैवाने वर्तमानात शिक्षणाचा विचार ज्यास्तरावर आणि ज्यापध्दतीने केला जातो त्यातून समृध्दतेचा विचार हरवत चालला आहे.
शिक्षणाचा दर्जा, गुणवत्ता हे शब्द सातत्याने उच्चारले जातात. आपण जेव्हा शिक्षणाच्या गुणवत्तेचा विचार करतो तेव्हा आपण व्यक्तीचा दर्जा आणि गुणवत्तेचा विचार गृहीत धरत असतो. दुर्दैवाने तसे समाजात घडताना दिसत नाही. शिक्षण घेऊनही भौतिक दर्जा उंचावला असेल मात्र मानसिक परिवर्तन होताना दिसत नाही. आपली वाट अद्यापही अंधारलेली आहे. गुलामीच्या दिशेचा प्रवसाबददल आपल्याला आता चिड येताना दिसत नाही. आपण स्वतंत्रपणे विचार करण्याची हिम्मत दाखवत नाही. स्वतंत्र अभिव्यक्ती करताना दिसत नाही. आपल्या भूमिका समोरच्याच्या भूमिकेवर ठरू लागल्या आहेत. आपल्या आतल्या आवाजाऐवजी बाहेरच्या बॉशला काय हवे हे महत्वाचे ठरत आहे. प्रत्येकवेळी आपण आपले विचार प्रतिपादन करताना कचरत असू तर त्या शिक्षणाचा उपयोग काय? कधी एकेकाळी महात्मा फुले, राजाराम मोहन रॉय, आगरकर, गांधी, सावरकर, गोखले, फुले, आंबेडकर अशी कितीतरी नाव होती. ज्यांनी समाज व राष्ट्राच्या प्रगतीसाठी भूमिका घेत लढा दिला होता. अनेकांनी ज्यांच्या सत्तेचा सूर्य कधी मावळत नव्हता अशा महासत्तेशी दोन हात केले होते.
आपण जेव्हा विचाराची भूमिका घेऊन कार्यरत राहातो तेव्हा त्यांनी परिणामाच्या जाणीवेचा विचार केलेला नाही. शिक्षण म्हणजे प्रकाश असतो असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा त्यात ज्ञानाचा साक्षात्कार असतो. त्या साक्षात्कारात जीवनाचा पर्वास घडत असतो. त्या ज्ञान प्रकाशात हिम्मत पेरलेली असते. त्यादृष्टीने वर्तमानात शिक्षणाचा परिणाम दिसत नाही. व्यक्तीच्या जीवनात शिक्षणाच्या प्रकाशाची छाया पडलेली नाही. आपल्या जीवनात शिक्षण यावे म्हणून आपल्या राष्ट्रपुरूषांनी कितीतरी प्रयत्न केले आहे. आज ते शिक्षण झाल्यानंतर आणि हाती पदवी आल्यानंतर आपल्यात खरच शिक्षणाने जे परिवर्तन अपेक्षित केले आहे ते खरचं झाले आहे का? असा प्रश्न पडतो. आपल्या व्यक्तीगत जीवनात शिक्षणाचा जशा प्रभावात्मक परिणाम दिसत नाही त्याप्रमाणे सामाजिक जीवनातही तो परिणाम साधला गेला आहे असे दिसत नाही. अन्यथा आपल्या समाजात आज दिसणारे जे प्रश्न आहे ते प्रश्न दिसलेच नसते. कारण शिक्षणाचा उददेशच मुळी समाज उन्नत करणे आणि समस्या निराकरणाची शक्ती बहाल करणे हा आहे.
महात्मा फुले या अत्यंत द्रष्ट्या महापुरूषांने आपल्या समाजातील अंधाराचे मूळ कारण जाणले होते. समाजातील अंधकार नष्ट करायचा असेल तर तात्पुरत्या मेनबत्या लावण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो. त्यांनी अंधार नष्ट होईल पण तो तात्पुरता असेल. आपल्याकडे अनेकदा प्रश्न निर्माण झाला की त्यावर तात्पुरत्या मलमपटटया करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. मात्र त्या प्रयत्नाने तात्पुरत्या वेदना कदाचित थांबल्या तरी समस्या मात्र सुटली जात नाही. महात्मा फुले यांनी समाजाच्या वेदना निराकरण करण्याचा मूळ प्रयत्नाचा विचार अधिक सखोल स्वरूपात केला होता. समाजातील सर्व प्रकारच्या असलेल्या वेदनांचे मूळ शिक्षणाच्या अभावात आहे. प्रश्न कोणताही असला तरी त्याच्या निराकरणाची शक्ती केवळ शिक्षणात आहे हे त्यांनी जाणले होते. त्यामुळे फुले यांनी शिक्षणाचा विचार अधिक खोलवर केला होता.त्यांना समाजाच्या अपय़शाचे गमक शिक्षणाच्या अभावात असल्याने जाणले होते. त्यामुळे त्यांनी जीवन प्रवासात परिवर्तनासाठी शिक्षणावर अधिकाधिक काम करत जीवनात अधिक महत्व दिले होते. त्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाचा राजमार्ग अनुसरण्याचे सातत्याने आवाहन केले होते. आज आपल्याला शिक्षण मिळाले पण त्यातून शिक्षणाचा परिणाम मात्र दिसून येत नाही.महात्मा फुले म्हणाले होते ,की “कनिष्ठवर्ग विचारसंपन्न नसल्यामुळे त्यांनी त्या मानसिक गुलामगिरीच्या दावनीत आपली मान अडकवली. अज्ञान म्हणजे अंधार व शिक्षण म्हणजे प्रकाश. शिक्षण हे सर्व सुधारणांचे मुळ आहे. कनिष्ठ वर्गातील लोकांना ज्ञानाचे दरवाजे खुले करून त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार केला तर समतेच्या कल्पनेने स्फुरलेले कनिष्ठ वर्गातील लोक सामाजिक समतेसाठी बंड करून उठतील.शिक्षण ही शक्ती आहे.ती अन्यायाच्या विरोधात बंड करण्याची हिम्मत देत असते.”
मात्र आज शिक्षण घेऊनही ती हिम्मत पेरण्याचे राहून तर गेले नाही ना ? असा प्रश्न पडतो. कनिष्ठ वर्गाला नेहमीचा पोटाचा प्रश्न आहे.त्यांना शिक्षणापेक्षा पोट महत्वाचे आहे.माणूस जगला तर शिक्षणाचा विचार केला जाऊ शकतो.जोवर पोट भरत नाही तोवर शिक्षणाचे मोल नाही.अनेकदा गरीबीची समस्येचे मुळ जर शिक्षणाच्या अभावात असेल तर अनेकांना असेही वाटते ,की त्यांना शिक्षण द्यायला हवे.मात्र शासन गरीबांचे शिक्षण व्हावे म्हणून योजना देते.मात्र तरी गरीब शिक्षणाच्या प्रक्रियेत सक्रीय होत नाही हे वास्तव आहे.याचे कारण आपल्या गरीबीचे निराकरण करायचे असेल तर शिक्षण घेण्याची गरज आहे ही जाणीव त्यांच्यामध्ये रूजलेली नसते.भूकेल्या पोटी तो विचार रूजण्याची शक्यता नाही. ज्यांची पहिली पिढी शिक्षणाच्या व्दारात आली आहे ते शिक्षणात अपेक्षित गुणवत्ता साध्य करण्याची शक्यता नाही.
मात्र आपल्या व्यवस्थेला त्यांच्यात देखील इतरांच्या सोबतची गुणवत्ता आणि दर्जा हवा असेल तर त्यांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असते.ते निर्माण होऊ नये म्हणून विनोबा सतत जीवनाभिमुख शिक्षणाचा आग्रह करताना दिसता आहेत.कारण जीवन शिक्षणात अनुभव आहे.तो अनुभव प्रत्येकाचा अनुभव भिन्न असला तरी त्यात एक प्रकारचे शिक्षण आहे.त्यामुळे ते शिक्षण अधिक महत्वाचे मानले गेले आहे.विशेषता कनिष्ठ वर्गासाठी शिक्षणाचा अनुभव नवा आहे.त्यांच्यासाठी आपण केवळ पुस्तकी शिक्षणाचा विचार करून आपल्याला चालणार नाही.जेव्हा जीवनात अनुभवाला प्राधान्य होते तेव्हा अक्षरांचा विचार आवश्यक होता.आज मात्र तोच विचार केंद्रस्थानी आला आहे आणि जीवन अनुभव शिक्षणाचा विचार मागे पडला आहे.त्यामुळे या पिढीशी जुळून घेण्यासाठी पुनर्विचार करण्याची गरज आहे.
महात्मा फुले म्हणाले की, शिक्षणाचा अभाव हे मानसिक गुलामीचे लक्षण आहे असे म्हटले होते.ज्याचे शिक्षण झाले आहे असा कोणताही माणूस हा गुलाम राहू शकत नाही.आज आपल्याकडे शिकलेली माणसं गुलामीच्या वाटेने जाणे पसंत करतात.याचे कारण गुलामीत सुख आहे असे त्यांना वाटते.अन्यायाच्या विरोधात लढणे हा त्याच्यासाठी दुःखाची वाट ठरते.मात्र गुलामीत तर आत्मा विकलेला असतो.आत्मा विकल गेला तर जगणे म्हणजे एकप्रकारचा मृत्यूच आहे.त्यामुळे शिक्षणातून ख-या उददीष्टयांच्या साध्यतेचा प्रवास झाला तर समतेची वाट चालत बंड करण्याची शक्यता अधिक आहे.घटनांकारानी समतेचा विचार महत्वाचा मानला.समतेत सर्वांच्या विकासाचा विचार सामावलेला आहे.
समता म्हणजे समानता नव्हे हे ही लक्षात घ्यायला हवे.आपण अलिकडे समानतेचा विचार अधिक करू लागलो आहे.समतेचा विचारात प्रत्येकाल स्वतःच्या विकासासाठी जी जी म्हणून गरज असेल त्यासाठी पुरेशा प्रमाणात मदत करणे म्हणजे समता आहे.गरजेप्रमाणे देण्याचा विचार आहे.समानतेमध्ये सर्वांना समान देण्याचा विचार आहे.शिक्षणामुळे समानतेचा विचार दृढ होतो आणि त्यामुळे त्या दिशेने प्रवास करणे शक्य आहे.त्यासाठी स्वतःत पेरलेली हिम्मत आपल्याला लढयासाठी ताकद देत असते.ही तर शिक्षणाची शक्ती आहे.ती प्राप्त झाली तर प्रत्येक व्यक्ती योग्य वाटेचा प्रवास करेल.ती वाट केवळ अक्षर साक्षरतेची राहिली तर शिक्षणाचा परिणाम साधला जाणार नाही.पूर्वी लोक शिकली नाही मात्र तरी विवेकाची वाट चालत होती.याचे कारण त्यांचे शिक्षण जीवन अनुभव युक्त होते. आज शिकलेली माणसं ही वाट चालताना दिसत नाही याचे कारण त्यांच्या शिक्षणात ख-या शिक्षणाचा अभाव आहे.त्यामुळे आपल्या समाजाच्या प्रश्नांची मुळे ख-या शिक्षणाच्या अभावात आहे हे लक्षात घ्यायला हवे.
शिक्षणाचा प्रकाश मस्तकी पडला तर आपल्याला मिळणारा प्रकाश जीवनातील अविवेकाचा अंधकार नष्ट केल्याशिवाय राहाणार नाही.विवेकाचा प्रकाश शिक्षणातून निर्माण झाला तर व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनात निश्चित आपल्याला यश अनुभवता येईल.समाजात विवेकशीलतेच्या प्रकाशाचा अनुभव आला तर समाजातील अज्ञानाचा अंधार,त्याच बरोबर हिंसा,संघर्ष,लोभ यासाऱख्या गोष्टी देखील आपोआप कमी होताना दिसू लागतील.त्यामुळे समस्याच्या मुळाशी शिक्षणाचा अभाव हे कारण असेल तर शिक्षणच अधिक शक्तीशाली करण्यासाठी प्रयत्न झाल्याशिवाय आपल्या व्यवस्थेतील अंधकार नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे फुल्यांनी जी वाट निवडली होती तीच वाट आपल्या सर्वांच्या उध्दाराची आहे.ती वाट अधिक रूंदावण्याची गरज आहे.आपल्याला पुन्हा आत्म्याचे सत्व प्राप्त करायचे असेल तर शिक्षणाच्या वाटेचा विचार करण्याची निंतात गरज आहे.
– संदीप वाकचौरे
( लेखक शिक्षण क्षेत्राचा अभ्यासक आहे )