Monday, November 25, 2024
Homeब्लॉगइतकाच काय तो फरक..

इतकाच काय तो फरक..

आपल्या देशातील वर्तमान शिक्षणाचा विचार आपण जेव्हा करतो आहोत तेव्हा आपल्या शिक्षणातून अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत अशी खंत आपणच व्यक्त करतो. मात्र तेव्हा इतिहासातही शिक्षणाची स्थिती अधिक चिंताजनक होती. आज आपल्याकडे किमान प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्यात आले आहे.त्यामुळे शिक्षणाचे सार्वत्रकीकरण झाले आहे. आज सरकारी शिक्षणाबरोबर खाजगी शिक्षणाची वाटही विस्तारते आहे. शिक्षण फोफावत असले तरी शिक्षणाचा अपेक्षित परिणाम वर्तमानात दिसत नाही.

महात्मा फुले यांनी त्यावेळी देखील व्यक्तीने शिक्षण घेतल्यानंतर त्याच्या व्यक्तीगत व सामाजिक जीवनात परिवर्तन अपेक्षित केले होते. याचे कारण तेव्हा असलेल्या शिक्षणातूनही ते घडत नव्हते आणि आजही त्या अपेक्षा पूर्णत्वाला जाताना दिसत नाही हे वास्तवही लक्षात घ्यायला हवे. या देशाच्या इतिहासातील शिक्षणाची स्थिती आणि शिक्षणाकडून असलेल्या अपेक्षा महात्मा फुले यांनी हंटर आयोगापुढे केलेल्या मांडणीत व्यक्त केल्या होती.महात्मा फुले यांची भूमिका आजही आपण समजावून घेतली तर त्यातील अनेक गोषटी साध्य होण्यात आपल्याला यश मिळू शकले नाही.त्यामुळे शिक्षणाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.त्या जर पूर्ण होणार नसेल तर शिक्षण सुरू राहील पण त्याचा राष्ट्रीय परिवर्तनात भूमिका असणार नाही हे लक्षात घ्यायला हवे.

- Advertisement -

आज शिक्षणाचे सार्वत्रकीकरण झाले आहे.शिक्षण सर्वांना मिळू लागले आहे.जाती धर्माच्या नावावर होणारा शिक्षणातील भेदाने शिक्षणाच्या थांबलेल्या वाटा आता सर्वांसाठी खुल्या झाल्या आहेत. सर्वांना शिक्षण मिळू लागले आहे. कायद्याने जे द्यायला हवे होते ते दिले आहे, पण शिक्षणातील वाढत्या फी मुळे गरीबांना शिक्षणाची दरवाजे मात्र एकप्रकारे बंद होऊ लागले आहेत.स्वातंत्र्यानंतर देशात सर्वांना जगण्यासाठी लागणारी आर्थिक,सामाजिक स्थिती उपलब्ध होईल अशी अपेक्षा होती. मात्र गेले काही वर्षात देशात आर्थिक विषमता अधिक वेगाने अधोरेखित होत असल्याने गरीबांना शिक्षण घेण्याची इच्छा असली तरी ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल होऊ शकलेले नाही. प्राथमिक शिक्षण शिक्षण हक्क कायद्याने प्राथमिक शिक्षण मोफत मिळू लागले आहे.सरकारी शाळांचे आस्तित्व आहे म्हणून किमान प्राथमिक शिक्षण काही प्रमाणात करण्याकडे पालकांचा कल आहे. मात्र जसे जसे शिक्षणाचा स्तर उंचावत जातो त्याप्रमाणे शिक्षण अधिक महाग बनत चालले आहे. त्यातच देशात गेले काही वर्षात सातत्याने खाजगी विद्यापीठांच्या संख्या सातत्याने वाढत आहे. त्या विद्यापीठांची फी तर केव्हाच लाखोची उडडाने घेत आहे.

एकीकडे या देशात दोन वेळेची खाण्यासाठीची असलेली भ्रांत,हातावर पोट असलेली आणि ज्यांची मासिक उत्पन्न महिना दोन तीन हजारापेक्षा कमी आहे असे कोटयावधी कुटुंबे या देशात आहेत.त्या कुटुंबातील सदस्यांचा मोठा संघर्ष जगण्यासाठी आहे.अशावेळी त्या कुटुंबासाठी शिक्षण ही चैन ठरावी अशी स्थिती आहे.गरीबांना शिक्षणाची वाट दिवंसेदिवस कठीण बनत चालली आहे.महात्मा फुले यांनी हंटर आयोगा समोर साक्ष देताना जे विचार व्यक्त केले होते त्याच विचारांच्या अपेक्षा आजही पूर्णत्वाला जाऊ शकलेल्या नाहीत हे आणखी दुर्दैव आहे.

जोतीराव फुल्यांनी १८८२ रोजी हंटर आय़ोगाच्या समोर सादर केलेल्या आपल्या निवेदनात स्वतःबददलचा जो उल्लेख करण्यात आला आहे त्यात एक व्यापारी, शेतकरी, नगरपिता असे म्हटलेले आहे. त्या निवेदनात त्यांनी आपण स्थापन केलेल्या शाळांची आणि आपल्या शैक्षणिक कार्याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आपण किती वर्षे शिक्षक म्हणून कार्य केले आणि आपला शिक्षण क्षेत्रातील अनुभव किती आहे ह्याविषयी त्यांनी त्यात माहिती ग्रंथित केलेली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात “गुलामगिरी” ह्या ग्रंथातील काही उतारे नमूद करत आपल्या निवेदनास प्रारंभ केला आहे.देण्यात आलेल्या निवेदनात ते म्हणतात: “ सरकार असे सुखस्वप्न बाळगत आहे की, हे वरिष्ठ वर्गातील लोक कनिष्ठ वर्गातील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करतील.” हे सुखस्वप्न तेव्हा होते.तेव्हा समाजातील एका वर्गाने कनिष्ठ वर्गाला शिक्षणाची कायमची दरवाजे बंद केली होती. या देशातील शुद्र म्हणून ज्यांचा उल्लेख केला जात होता त्या सर्वांसाठी शिक्षणाची दरवाजे बंद करण्यात आली होती.

तेव्हा एका अर्थाने ज्या उच्चवर्गासाठी शिक्षण दिले गेले होते तरी ते उच्चवर्गीय असलेली व्यवस्था कनिष्ठासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करण्याची शक्यता नव्हतीच आणि त्यांनी तसे केलेही नाही. तेव्हा सरकार जे सांगत होते त्याचा नेमका अर्थ महात्मा फुले यांनी जाणला होता. फुले पुढेही म्हणाले होते,की हे सुखस्वप्न उराशी बाळगून गरीब शेतकऱ्यांकडून सरकार जो सारा गोळा करते त्या सर्व वसुलाचे उत्पन्न सरकार वरिष्ठ लोकांच्या शिक्षणावर उधळते. विद्यापीठे श्रीमंतांच्या मुलांना शिक्षण देतात आणि त्यांची ऐहिक उन्नती साधण्यासाठी साह्य करतात. हा त्यांनी तेव्हा केलेला विचार आणि नोंदवलेले आक्षेप आजही आपल्या विद्यापीठांवर कायम आहे.विद्यापीठांच्या वाढत्या फीमुळे गरीबांची लेकरं तिथपर्यंत पोहचत नाही.गुणवत्ता असली तरी आर्थिक विषमतेमुळे शिक्षणाची दरवाजे किलकिले होऊ शकली नाही.त्यामुळे उच्च शिक्षण या देशातील शेतकरी,कष्टकरी,कामगाराच्या श्रमाने बहरले आहे.मात्र त्यांना अथवा त्यांच्या मुलांसाठी उच्च शिक्षणांची दरवाजे मात्र अजूनही खुली होताना दिसत नाही.त्यामुळे या देशाच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात आपण उच्च शिक्षणात केवळ 26 टक्के विद्यार्थी समाविष्ट करू शकलो.

अद्याप 74 टक्के विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेच्या बाहेर आहे याचा अधिक गंभीर विचार करण्याची गरज आहे.फुले जे म्हणाले होते ते आजही कायम आहे.त्यामुळे देशातील गरीबांतील गरीबाला शिक्षणात सहभाग घेता यायला हवा तरच सामाजिक उत्थान घडू शकेल. विद्यापीठातून शिक्षण घेऊन जी विद्यार्थी बाहेर पडली आहेत त्यांची वर्तमानातील स्थिती देखील तशीच आहे. महात्मा फुले म्हणाले होते , की “ त्या विद्यापीठातून निघालेल्या सुशिक्षितांनी आपल्या देशबांधवांच्या उन्नतीच्या कार्यात काहीही भर घातली नाही. ” हे प्रश्न फुले यांनी तेव्हा विचारले होते तेच प्रश्न आजचा विचार करणारा समाज विचारतो आहे.शिकलेली माणसं स्वतःच्या उन्नतीचा विचार करता आहेत.त्यात समाजाच्या प्रति काही दायित्व आहे असे चित्र दिसत नाही.शिकलेला माणसं अधिक स्वार्थी बनली आहे.त्यांना स्वतःच्या पलिकडे काहीच दिसत नसल्याचा आक्षेप समाजातील एका समूहाकडून सतत नोंदविला जातो आहे.शिक्षण घेतल्यानंतर राष्ट्र व समाजाच्या प्रति आपली बांधिलकी अधिक विकसित होण्याची गरज महात्मा फुले यांनी तेव्हा अपेक्षित केली होती.मात्र आज शिकल्यानंतर ती बांधिलकी वृंध्दीगत झाल्याचे दिसत नाही.

शिकलेली माणसं आपल्या समाजात शिक्षणाचा प्रसार प्रचार व्हावा म्हणून फारसा प्रयत्न करत नाहीत हे महात्मा फुले यांचे निरिक्षण वर्तमानात कायम आहे.उलट शिकलेली माणसं आज समाजात कार्यरत आहेत, मात्र ते सामान्यांच्या मदतीचा हात देण्याऐवजी अडविण्यासाठी अधिक प्रयत्न करत असल्याचे दिसते आहे .समाजात अशिक्षित असलेल्या भारतीय नागरिकांची विविध ठिकाणी होणारी अडवणूक करणारी आणि समाजात भ्रष्टाचार करणारी मंडळी कोण आहे ? एका अर्थाने समाजातील सध्याच्या सामाजिक भ्रष्ट परीस्थितीच्या मुळाशी शिकलेल्या माणसांची विचारधारा अधिक कारणीभूत आहे हे लक्षात घ्यायला हवे.फसवणूक करण्यातही शिकलेली माणसंच आघाडीवर आहे.या देशाती न शिकलेला माणूस अधिक प्रामाणिक आहे.त्याला पाप ,पुण्याची अधिक भिती आहे.त्याचेवरती मूल्यांचा प्रभाव आहे.त्यामुळे ते अधिक चांगले जगता आहेत.शिकलेली माणसं आधुनिक विज्ञानाच्या नावाखाली आपली मूल्य व्यवस्था हरवून बसली आहे.

“विद्यापीठातून पदव्या घेऊन बाहेर पडलेल्या तरुणांनी सर्वसाधारण जनतेसाठी काय केले ? आपल्या आयुष्यक्रमाच्या योगे त्यांनी समाज मनावर कोणता परिणाम घडवून आणला ? अभागी अशा बांधवांच्या शिक्षणासाठी स्वतः आपल्या घरी किंवा दुसरीकडे त्यांनी शाळा सुरू केल्या काय ? या प्रश्नांची उत्तरे महात्मा फुले तेव्हा मागत होते.आजही हाच प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर नकारात्मक येईल यात शंका नाही. शिकलेल्या माणसांच्या मुळे समाजमनात बदल घडला आहे का ? समाजाचे उत्थान घडविण्यासाठी शिकलेल्या माणसांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग केला आहे का ? मुळात शिकलेली माणसं अधिक स्वविकासावर लक्ष केंद्रित करतात.अनेकदा आपल्या पलिकडे काहीच नाही ही त्यांची धारणा असते असे मत समाजमनातूनच व्यक्त होते आहे.त्यामुळे काल जे चित्र होते तेच आज आहे. तेव्हा इंग्रजांच्या हाती असलेल्या शिक्षणाचा परिणाम होता आज तर आपल्या स्वातंत्र्यानंतरची शिक्षणाची व्यवस्था आहे, पण परिणाम मात्र इंग्रजाच्याच शिक्षणाचा होता तोच साधला गेला आहे. आपल्या शिक्षणातून आपण फार काही वेगळी पेरणी करण्यात यश मिळू शकले नाही.

महात्मा फुले म्हणतात ,की कोणत्या कारणामुळे असे सांगण्यात येते , जर लोकांची बौद्धिक आणि नैतिक पातळी वाढवावयाची असेल तर वरिष्ठ वर्गातील शिक्षणाचा दर्जा वाढविला पाहिजे ? राष्ट्राच्या कल्याणाची वृद्धी झाली आहे किंवा नाही हे समजण्याचे एकच साधन आहे ते म्हणजे महाविद्यालयात किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि विश्वविद्यालयीन पदव्यांच्या याद्याही होत. ज्याप्रमाणे जंगलातील शिकारीविषयक कायदा केल्याने किंवा १० पींड कर भरणाऱ्याना मतदानाचा हक्क दिल्याने घटनेची कल्याणकारकता सिद्ध होत नाही, त्याप्रमाणे विद्यापीठातून रँगलर बाहेर पडल्याने किंवा तेथे देशी व्यक्तींची “डीन” आणि “डॉक्टर” म्हणून नेमणूक केल्याने, ते सारे देशहिताचे आहे असे सिद्ध होत नाही.” मुळात कोणाला एकाला शिक्षण मिळाल्याने इतर लोंकाना शिक्षण मिळेल हे म्हणणे सयुंक्तीक नाही.शिक्षणाचा व्यापक विचार आजवर देखील आपण करू शकलो नाही.शिक्षण घेतलेली माणसं जोवर आपल्यात सामाजिक जाणीवा आणि दायित्व निभावत नाही तोवर शिक्षणातून अपेक्षित समाजिक व राष्ट्रीय परिवर्तनाच्या अपेक्षा फोल ठरतील.शिक्षण घेतलेली माणसं स्वतःच्या पलिकडे डोकावत नसतील तर ती माणसंही अशिक्षितच समाजायला हवी..बदल फक्त अक्षर साक्षरतेचा ..इतकाच काय तो फरक .

संदीप वाकचौरे

(लेखक-शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या