आपल्या देशातील असलेली सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परीस्थितीत परिवर्तन करायचे असेल आणि त्या व्यवस्थेला खरोखर अधिक सक्षम करायचे असेल तर शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्याची गरज सातत्याने विचारवंत व्यक्त करत आले आहेत. जगाच्या पाठीवर कोणत्याही राष्ट्र आणि समाजाच्या विकास प्रक्रियेतील सर्वात मोठा अडथळा हा समाजाचे अज्ञान हाच आहे. त्यामुळे आपल्याला अपेक्षित लोकशाहीचे फळ मिळत नाही. त्यामुळे केवळ लोकशाहीची व्यवस्था असून उपयोग नाही, तर त्या व्यवस्थेतील नागरिकांची जबाबदारी अधिक महत्वाची असते.
नागरिकांमधील अज्ञान हाच लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू आहे. राजकारण, समाजकारणातील प्रश्न काय आहेत हे समजण्याची पात्रता जनतेत असली पाहिजे. यासाठी नागरिकांचे किमान शिक्षण असायला पाहिजे. ते मिळाले म्हणजे नागरिक त्याच्या साहाय्याने अधिक शिक्षण घेऊ शकतील. वाचनाने ते ज्ञानात भर घालू शकतील. विवेकी, ज्ञानी, विचारवंत नागरिक ही महान शक्ती आहे. असे जास्तीत जास्त नागरिक देशात, राज्यात असल्याने राज्याला स्थैर्य आणि प्रतिष्ठा लाभून ते प्रगतीपर बनते असे विनोबानी म्हटले होते. विनोबांना देशाच्या कल्याणाचा मूलमंत्र शिक्षणात सापडला होता. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तनाची वाट निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न आणि सूचवलेली दिशा अधिक महत्वाची आहे. आपण त्या मार्गाने चालण्याचा आजवर प्रामाणिकपणे प्रयत्न केला असता तर आपल्याला निश्चितपणे बरेच काही हाती लागले असते. कोणत्याही वाटेला जेव्हा अपयश येते तेव्हा त्या वाटा चुकीच्या नसतात तर त्या वाटेकडे जातानाचा प्रवासातील उणिवा लक्षात घ्यायला हव्यात.
लोकशाही व्यवस्थेत नागरिकांची समज अधिक महत्वाची असते. त्यातूनच त्यांच्यातील शहाणपणाची व्यवस्था भक्कम बनते. त्यासाठी समतेचा विचार दृढ असायला हवा असतो. मात्र जेव्हा समाजात लहान मोठया कारणानी संघर्ष उभे राहातात तेव्हा मात्र व्यवस्थेला धक्का बसतो. आपण शिक्षण व्यवस्थेतून शांततेचा मंत्राची पेरणी करू इच्छितो. शिक्षणातून समाज मनात विशालता निर्माण व्हावी. विवेक निर्माण होईल त्यादृष्टीने पावले टाकली जावी म्हणून शिक्षणाने कार्यरत राहाण्याची गरज आहे. दुर्दैवाने आपल्या समाज व्यवस्थेत जाती, धर्म, पंथाच्या भिंती अधिक भक्कम बनत चालल्या आहेत. आर्थिक विषमता डोळ्यात भरेल इतक्या मोठया प्रमाणावर अधोरेखित होते आहे. गेले काही वर्षापासून समाजातील संघर्ष कमी होण्याऐवजी त्यात अधिक वाढ होतांना दिसता आहे. आपले व्यक्तीगत प्रश्न जसे मोठे बनत आहे तसे सामाजिक प्रश्नाचे स्वरूपात बदल होता आहेत आणि ते अधिक खोलवर रूजताना दिसत आहेत.
विवेक आणि शहाणपण मनामनातून हरवत चालले आहे. आपणही आपल्यातील माणूसपण हरवत चाललो आहोत. अंतकरणातील करूणा कमी होते आहे. सत्यापेक्षा सत्तेची वाट मोठी आणि अपेक्षित वाटू लागली आहे. तत्वे, मूल्य हरवत चालली आहेत. माणूसकीचा झरा आटत चालला आहे. नात्यातील वीणही सैल होते आहे. सारे काही पैशाने विकत घेता हा भाव अधिक दृढ होत चालला आहे. संस्काराची देखील ऐसीतैशी सुरू आहे. संस्काराचा देखावा उभा करण्याकडे कल वाढतो आहे. स्वातंत्र्याच्या गप्पा होता आहेत, पण प्रत्येकालाच गुलाम करण्याची वाट हवी आहे. अनेकांना स्वातंत्र्याची भिती वाटू लागली आहे. आज माणसंच विकली जाता आहेत. तत्व कालबाहय ठरू लागली आहे. तत्वनिष्ठता म्हणजे वेडयांची वाट ठरत आहे. पैसा खाणारी आणि भ्रष्ट मार्गाने पैसा कमविणारी माणसं मोठी वाटू लागली आहेत.
भ्रष्टाचारी माणसांना प्रतिष्ठा प्राप्त होते आहे. त्यांच्या संपत्ती इमले उंच उंच चढता आहेत आणि तत्वांनी जगणारी माणसं आपली झोपडी बरी असं म्हणत जीवनाची वाट चालता आहेत. त्यांना आपली तत्वे अधिक महत्वाची वाटता आहेत. काही केले तरी आपण तत्व सोडणार नाही ही तत्वनिष्ठता स्वातंत्र्यपूर्व कालावधीत अधोरेखित होत होती. अनेकानी आपल्या जीवनात हरिश्चंद्र राजाची वाट अनुसरली होती. स्वप्नात राज्य देणारा राज्य जीवनातही तीच वाट चालत होता. शब्द हीच जीवनाचे मोल असे त्यांना वाटत होते. त्याच वाटेने आज काही लोक जाता आहेत. त्यामुळे त्याकाळी तत्वाशी गद्दारी करणा-या माणसांच्या बातम्या होत होत्या. कारण अधिकाधिक माणसं निष्ठावान होते. आज निष्ठावान असणारी आणि स्वतःच्या तत्वांशी एकनिष्ठ राहातात त्या माणसांची संख्या दिवंसेदिवस कमी होते आहे. त्यामुळे त्यांची बातमी होते.निष्ठा हरवत चालली आहे असे नाही तर ती जणू संपली आहे. त्यामुळेत्या वाटेने चालणारी माणसं वेडी ठरता आहेत.
प्रामाणिकपणा हा वेडेपणा वाटावा अशी आपली सामाजिक स्थिती आहे. वर्तमानात माणसं चांगली वागले की त्याला वृत्तमूल्य प्राप्त होते .माणसं एकमेकाशी चांगली वागत नाही म्हणून आपण सौजन्य सप्ताहासारखे विविध सप्ताह साजरे करतो आहोत.ज्या समाजात चांगूलपणा हाच स्थायी भाव होता तो हरवल्याने अशा सप्ताहाची गरज वाटू लागली आहे.लोक तर या सप्ताहात देखील चांगले वागतील याची खात्री देता येत नाही.भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन आणि सप्ताहाच्या काळात लोक लाच घेताना रंगेहात पकडले जाता आहेत.शपथ हा फक्त शब्द उरला आहे त्यातील आर्तता आणि भाव पूर्णतः लुप्त पावला आहे.
आपल्या समाजात माणसं निष्ठेपासून दूर जाणे, शब्दाला मोल न देता साक्ष फिरवणे ,धार्मिक ग्रंथावर हात ठेवत बिनधास्त खोटे बोलणे, दिलेले अनेक शब्द कितीतरी वेळा फिरवणे,जीवनात वेळ न पाळणे. पैसे खाणे, अगदी मडयावरचे लोणी खाण्यापर्यंत आपली मजल पोहचली आहे. आपल्या समाजाचा हा -हास आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी ,पैशासाठी सरळ मार्गाने आणि कायदे, नियमाने जे होणे अपेक्षित आहे त्या कामात स्वतःचअडथळे निर्माण करत सामान्यांची कामे अडविण्यात अनेकांना धन्यता वाटते. आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपण समाजाचे नुकसान झाले तरी चालेल,त्यात राष्ट्राचे हित जोपासले गेले नाही तरी चालेल मात्र आपले स्वहित अधिक महत्वाचे आहे ही धारणा मात्र अधिक दृढ होत चालली आहे.
पैशापुढे तत्व आणि मूल्यांचे मूल्य कमी होत चालले आहे. जीवनात ज्या तत्वांची वाट चालण्याचा आनंद घ्यायला हवा. त्या वाटा दुरापास्थ होत चालल्या आहेत. खरचं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवताना सुरू असलेल्या संघर्षाच्या वेळी इंग्रज सत्तेला वर्तमानात दिसणारी तत्वहीन माणसं सापडली असती तर ? स्वातंत्र्याचे समर लढवले गेले असते का ? त्याचे उत्तर आपोआपच मिळते ते म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेच नसते.आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत लढणारी नेते महात्मा गांधी आणि क्रांतीकारक विकले गेले असते तर इंग्रजानी त्यांना जे काही हवे आहे ते सारेच दिले असते. त्या क्रांतीकारणांना सारे काही स्वतःच्या जीवनासाठी प्राप्त करता आले असते.
सावरकरांना झालेली काळ्या पाण्याची शिक्षा कशासाठी भोगली असती? भगतसिंग, बाबूगेणू, सुखदेव यासारखी क्रांतीकारकांनी कशासाठी बलिदान केले असते ? त्यांना हवी तर संपत्ती, सत्ता आणि सुख पायापाशी लोळण घेत आले असते , पण या वीरांनी आपल्या तत्वांना मुरड घातली नाही. देशासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी ते काटेरी वाट चालत राहीले.त्याग करत ते लढत राहिले. त्यांच्या फकिरीवृत्तीमुळे ही माणसं त्यामुळे आजही अधिक मोठी वाटतात.त्यांच्या चरणावर आजही अनेकजन लोळण घेतात.त्यांचे जीवन दर्शनीय वाटते याचे कारण त्यांच्यातील निष्ठा आणि प्रामाणिकपणा.त्यांचा त्यागही मोठा होता.हे आपण विसरू शकत नाही.महात्मा गांधी नावाचा फकिरही त्यामुळे अजूनही मनामनात जीवंत आहे.
एकेकाळी या देशातील आकाशाच्या उंचीची माणसं होती.त्यांच्या चरणावर नतमस्तर व्हावीत इतकी महान व दर्शनीय माणसं होती.ती वाट भविष्यात चालत राहाण्याची प्रेरणा मनामनात निर्माण व्हावी म्हणून शिक्षणाने काम करणे अपेक्षित होते.त्यासाठी विनोबा म्हणतात की, त्यासाठीच नागरिकांचे किमान शिक्षण असायला पाहिजे.ते मिळाले म्हणजे नागरिक त्याच्या साहाय्याने अधिक शिक्षण घेऊ शकतील.वाचनाने ते ज्ञानात भर घालू शकतील.आपल्याकडे आपण प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले आहे.त्या शिक्षणातून पायाभूत स्वरूपाच्या क्षमता आपण विकसित केल्या तर नागरिकांना निश्चित उन्नतीचा दिशा मिळतील अशी अपेक्षा विनोबा व्यक्त करतात.
वाचनाचे कौशल्य साध्य झाले तर विद्यार्थी स्वयं अध्ययनाची वाट चालू शकतील.त्यातून वाचनाने ज्ञानात भर घालू शकतील.वाचन हे ज्ञान प्राप्तीचे साधन असल्याने प्रत्येकजन स्वतःच्या ज्ञानासाठी प्रयत्न करेल.त्यातून स्वतःच उन्नत होवू शकतील.त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला किमान प्राथमिक शिक्षण दिले जावे अशी अपेक्षा होती. आज आपल्याकडे प्राथमिक शिक्षण सक्तीचे होऊ शकले.मात्र त्या शिक्षणातून मस्तक घ़डण्याची जी अपेक्षा होती ती मात्र पूर्णत्वाला जाऊ शकली नाही.शिकलेली माणसं स्वतःला समृध्द करण्याची वाट स्वतःच चालतील असे काही घ़डले नाही. आज पदवी हाती आली असली तरी पुस्तके मात्र सुटली आहे.माहिती मोठी असली तरी ज्ञान हरवले आहे.शिक्षणाचे नाते जीवन उन्नतीपेक्षा मार्कांशी अधिक घटट झाले आहे.
स्वउन्नतीशी असणारे नाते लोक कल्याणापासून दूरावले आहेत.त्यामुळे लोकशाही व्यवस्थेसाठी अधिक जागृत आणि जबाबदार नागरिक निर्माण करण्यात यश मिळू शकलेले नाही.शेवटी कोणत्याही देशाची लोकशाही आपल्याला समृध्दतेच्या वाटेने घेऊन जायची असेल तर त्यासाठी विवेकी,ज्ञानी,विचारवंत नागरिक महत्वाचे असतात हिच लोकशाही व्यवस्थेच्या समृध्दतेकरीता महान शक्ती आहे. ही शक्ती असेल तरच लोकशाही सक्षम होऊ शकेल. त्यामुळे आपल्याला शिक्षणातूनच या वाटा निर्माण कराव्या लागणार आहेत. त्याशिवाय लोकशाही, राष्ट्र आणि समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे लक्षात घ्यायला हवे.
– संदीप वाकचौरे
( लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे )