Monday, November 25, 2024
Homeब्लॉगविचारांचे मारेकरी कोण?

विचारांचे मारेकरी कोण?

महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती उद्या साजरी होत आहे. त्यांच्या प्रतिमांच्या मिरवणूका होतील. प्रतिमेचा पूजन होईल. मात्र खरी गरज आहे ती त्यांच्या विचारांची पाऊलवाट चालण्याची. ज्यांच्या जीवन तत्वज्ञानाने या देशातील प्रत्येकाच्या जीवनाचा उध्दार होईल अशी शक्तीशाली विचाराची मांडणी फुले यांनी जीवनभर केली आहे. ज्यांच्या विचारामुळेच समाजात परिवर्तन घडू शकेल. महात्मा फुले या कर्ते सुधारक होते त्यांनी कधीच बोलकेपणाची भूमिका घेतली नाही. जी माणसं महात्मा फुले यांच्या जीवन तत्वज्ञानाच्या वाटेने चालली त्यातील अनेकांच्या जीवनाचा उध्दार झाला आहे. फुले हे अत्यंत द्रष्टे महापुरूष होते.त्यांनी या देशातील विषमता, दारिद्रय, अनिष्ठ रूढी, पंरपरा आहेत त्यांच्या मुळाशी शिक्षणाचा अभाव आहे हे त्यांनी ओळखले होते. त्यामुळे त्यांनी समाजाच्या वेदनेतून मुक्ती मिळविण्यासाठी मांडलेले उपायांची अत्यंत प्रभावी मांडणी करत समाजमनात शिक्षणाचे मोल रूजविण्याचा प्रयत्न केला.

महात्मा फुले यांना पावणेदोनशे वर्षापूर्वी जे कळाले होते हे आज आम्हाला का कळत नाही? हा खरा प्रश्न आहे. फुले यांना जी सामाजिक क्रांती अपेक्षित केली होती ती क्रांती आजही होऊ शकली नाही. शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी समाज, तत्कालीन व्यवस्थेकडून जे सोसले त्यामुळेच या देशातील वंचित समूहाला शिक्षणाची दरवाजे खुले झाली. त्यामुळे एक मोठा समूह शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी झाला आला. शिक्षणाने शिकलेल्यांच्या मनात अन्यायाच्या विरोधात चीढ निर्माण होईल. गुलामीची जाणीव होईल असे वाटत होते. खरंतर शिक्षणाने या जाणीवा विकसित करण्याची गरज असते. मात्र दुर्दैवाने वर्तमानात शिक्षणाने अनेकांच्या हाती पदवी दिली. पदवीने अनेकांच्या हाती नोकरी आली. नोकरीने पैसा आला आणि पैशाला सुख, समाधान आले. भौतिक प्रगती उत्तम झाली मात्र त्या पदवीने परिवर्तनाची हिम्मत आणि संवेदनशीलता येऊ शकली नाही हे आपण लक्षात घ्यायला हवे. शिक्षणाने माणसं अधिक आत्मकेंद्री बनली आहे. शिक्षणामुळे समाजभान विकसित होण्याची गरज असताना तसे मात्र घडताना दिसत नाही. त्यामुळे जयंती, पुण्यतिथी साजरी करताना, प्रतिमा पूजनाबरोबर त्यांनी निर्माण केलेल्या विचार प्रकाशाची वाट चालण्याची गरज आहे. आपण महात्मा फुलेंच्या प्रतिमा डोक्यावर घेतल्या मात्र त्यांचे विचार मस्तकी घेण्यास आपण विसरलो तर नाही ना? अशी शंका पुन्हा पुन्हा येत राहते. त्यामुळे एका अर्थाने आपण थोरांच्या विचाराचे मारेकरी ठरलो आहोत का ? असा प्रश्न मनात पुन्हा पुन्हा येत राहतो.त्यामुळे आता तरी संवेदनशीलतेने विचार करून त्यांनी निर्मिलेल्या विवेकाच्या वाटेने चालण्यासाठी हिम्मत दाखवायला हवी.

- Advertisement -

महात्मा फुले हे अत्यंत द्रष्टे महापुरूष होते. समाजाच्या वेदनेची नेमकी जाणीव त्यांना झाली होती. यांना समाजाच्या परिस्थितीचे पूर्ण भान होते. फुले यांनी इंग्रजानी केलेच्या सुधारणांचे स्वागत केले होते. मात्र त्याचवेळी त्यांच्या भूमिकेवरती कठोर टीका देखील केली होती. ते म्हणतात “इंग्रज सरकारने आम्हा अज्ञानी शुद्रादि अतिशुद्रादांच्या मुक्ततेविषयी काहीच प्रयत्न केला नाही.याविषयी मोठा अचंबा वाटतो.” इंग्रजानी जरूर या देशातील पंरपरा, रूढींच्या अनुषंगाने सुधारणांसाठी पावले टाकली होती. या देशातील जाती व्यवस्थेच्या भिंती,विषमतेची बीजे अत्यंत भक्कम होती. या भिंती कोसळून पडण्याची गरज होती. त्यामुळे या व्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी शिक्षणाशिवाय कोणताही पर्याय नव्हता. इंग्रजाकडे संर्वासाठी शिक्षणाची मागणी केली होती, मात्र शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्यासाठी इंग्रजानी पुरेसे आणि जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत. शुद्र आणि अतिशुद्र समाजाच्या आयुष्यात मुक्तत्ता साध्य करायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणापोय नव्हता हे फुले यांनी जाणले आहे. मात्र त्यासाठी विशेष असे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले नाही हे ज्ञात आहे. त्यामुळे फुले यांनी इंग्रजावर अनेकदा कठोर टिका केली होती.

कारण शुंद्राच्या उन्नतीचा विचार केवळ शिक्षणाच्या माध्यमातूनच पेरला जाऊ शकतो हे त्यांनी जाणले होत आणि इंग्रज नेमके तेच करत नव्हते. त्यामुळे ते म्हणाले होते की, अविद्या ही अनर्थकारी आहे. मती, नीती, गती आणि वित्त हे नष्ट होण्याचे एकमेव कारण अविद्या आहे. एखाद्या व्यक्तीत अविद्या सामावलेली आहे याचे कारण शिक्षणाचा अभाव आहे. विद्या प्राप्त करण्याचा मार्ग शिक्षण आहे. शिक्षण नसेल तर विद्या, ज्ञान कोठून येणार? असा प्रश्न विचारला जातो विद्या आली की शहाणपण येते. त्याचबरोबर विवेक येतो. सदसदविवेक बुध्दी प्राप्त होते. शिक्षणातून या गोष्टी घडल्या की, जीवनाचा पुढील मार्ग नव्याने साध्य होण्यास मदत होते. जीवनाच्या उन्नतीचा एकमेव राजमार्ग शिक्षण आहे. शिक्षण नसेल तर जीवनात बौध्दिक विकास घडणार नाही. बुध्दी नसेल तर चांगले वाईट कसे कळणार? विवेक नसेल तर आपल्या नितीचा विचार मनात रूजणार नाही. नीती नाही म्हटल्यावर जीवनात गती प्राप्त होण्याची शक्यता नाही. जीवनात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तन हवे असेल तर आपल्याला विवेकच हवा आहे आणि परिवर्तनाची वाट चालली तरच गती मिळेल.

जीवनाला गती प्राप्त झाली तरच वित्त हाती येणार आहे. जीवनात वित्त नसेल तर जगण्याची वाट सुलभ कशी होणार? वित्त म्हणजे केवळ पोटभरण्यापुरता मर्यादित विचार नाही. जीवनाच्या प्रत्येका टप्प्यावरती आपण जे काही करू पाहातो तेथे आपल्याला वित्त हवे असते. वित्ताशिवाय पुढील प्रवास साध्य करणे कठीण असते हे लक्षात घेता.. त्याची गरज प्रत्येकाला आहे. मात्र ती गरज पूर्ण करायची असले तर त्यासाठीचे शहाणपण आणि विवेक हवा आहे आणि त्यासाठी शिक्षण हवे असते. त्यामुळे प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा हा शिक्षणाचा अभाव हा आहे हे फुले जाणून होते. फुले म्हणाले होते की, शुद्रांचे दुःख कमी करायचे असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा जालीम उपाय नाही.

एकीक़डे फुल्यांसाऱख्या सुधारकांनी शुद्रांना शिक्षण मिळावे म्हणून पावले टाकली. इंग्रजानी सातत्याने मागणी झाल्यावर प्रयत्न सुरू केले मात्र हे सारे गतीने घडण्याची शक्यता नव्हती. इंग्रजानी येथील शुद्रांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला करण्याचा प्रयत्न केला असला, तरी येथील सनातन्यांनी मात्र आपल्या भारतीय असलेल्या बांधवानाच शिक्षण नाकारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते. भारतात आज आपण ज्यांना सुधारणावादी विचारवंत म्हणतो असे काही सुधारकही शुद्रांना शिक्षण देण्याचे मताचे नव्हते. समाजात ज्या वर्गांचा व्देष आहे अशा समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणू नये. असा प्रयत्न केला तर सत्तेला धोकादायक ठरेल असेही म्हटले जात होते. अतिशुद्रांची मुले शाळेत आणली गेली, दाखल केली गेली तर हिंदूस्थानात मोठा धिंगाना होईल असे धर्ममार्तंड सांगत होते. याचा सरळ अर्थ होता या देशात शुद्रांच्या आय़ुष्यात असलेले दुःख कधीच कमी होऊ नये ही त्यांची धारणा होती.

आपल्या समाजातील शुद्रांना देखील शिक्षणाचा अधिकार मिळू नये याच मताचे होते. त्याचे हे मत म्हणजे आपल्या बांधवाचा उध्दार घडावा असे वाटत नव्हते. जेथे भारतीय असलेल्या अनेकांना शुद्रांच्या जीवनातील अंधकार नष्ट करावा अस वाटत नव्हते तेथे इंग्रजाना तसे वाटण्याची शक्यता नाही. दलित शिकले तर या देशात एका वर्गाला लागणारे मजूर कुठून मिळणार असा प्रश्न तत्कालीन सत्तेत असणा-यांना राजांनीच विचारला होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे बालमजूरी विरोधात कायदा आणू पाहत असताना देखील या देशातील काही लोकांनी असा कायदा करण्यास विरोध केला होता.त्याचे कारण आपल्या शेतावर लागणारे मजूर कोठून मिळणार? स्वस्तात हवी असलेले मजूर म्हणजे वंचित,दलित समूहच होता. त्यामुळे शिक्षणाला विरोध करताना आपण हे लक्षात घ्यायला हवे की, फुले यांनी संघर्ष करून शंभर सव्वासे वर्षानंतरही मानसिकता बदलण्यास आपल्याला पुरेसे यश आले नव्हते.

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात हे घडत होते. आज शिक्षण सर्वांना मिळण्याचा कायदेशील अधिकार मिळाला आहे. त्यामुळे या अधिकाराचा फायदा घेण्यासाठी लागणारी व्यवस्था मात्र अद्याप पूर्ण समाजात निर्माण करण्यात आपल्याला यश मिळू शकले नाही. समाज परिवर्तनाच्या वाटचालीत फुले यांनी सतत शिक्षणाची आग्रही भूमिका घेतली होती. समाजात कोणतीही समस्या असली तरी तिच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्यात शिक्षणाचा अभाव हेच महत्वाचे कारण सापडते. समाजात आज निर्माण झालेल्या समस्या या केवळ शिक्षण नाही म्हणून निर्माण झाल्या आहेत हे सहजतेने लक्षात येईल. महात्मा फुले यांनी या देशातील सर्व समस्यां निराकरणाचा मार्ग शिक्षणातून जातो हे पुन्हा पुन्हा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दुर्दैवाने त्यांनी दाखवलेल्या वाटेचा प्रकाश वर्तमानात झेपणारी माणसं निर्माण होऊ शकली नाही हा आपण वाट चाललेल्या शिक्षणाचा पराभव आहे.

वर्तमानात शिक्षण सक्तीचे आणि मोफत मिळत असले तरी समाजातील सर्वांना समान दर्जाचे मिळण्यात अडचणी आहेत. समाजात विषमता ठासून भरलेली आहे तीच विषमता वर्तमानात शिक्षणात प्रतिबिंबीत होते आहे. आर्थिक स्तरानुसार शाळांही निर्माण झाल्या आहेत. श्रीमंतासाठी श्रीमंत शाळा आणि गरीबांसाठी गरीब शाळा निर्माण होत असतील तर ते शिक्षण समाजात समतेचा विचार कसा प्रस्थापित करणार हा खरा प्रश्न आहे. शिक्षणातून आपण जे काही अपेक्षित करत आहोत ते साध्य होत नाही असे सांगितले जाते. याचे कारण शिक्षणातून अपेक्षित विचार पेरले गेले तरी जेथे आस्तित्वातच विषमता आहे तेथे समतेचा विचार रूजण्याची अपेक्षा तरी कशी करता येईल. येथील श्रीमंत पालकांना आपल्या पाल्यांच्या सोबत गरीबांची मुले शिकू नये असे वाटते. आपल्या पाल्याला गरीबीचे दर्शन घडू नये की, आपल्या पाल्यांना दारिद्रयांचा अनुभव येऊच नये ही ती काय अपेक्षा असेल की त्यापलिकडे काही आहे हे जाणून घ्यायला हवे. समाजातील आर्थिक दृष्टया विषमता असलेली मुले शिकण्यासाठी एकत्रित येऊ नये असे वाटत असेल तर भविष्यात समाजात विषमता नष्ट करण्यासाठीचा विचार देखील अधोरेखित होण्याची शक्यता नाही.

संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या