माणसांच्या जीवनात माणसाला नेमके काय हवे आहे..? आज प्रत्येकालात सत्ता,संपत्ती, प्रतिष्ठा हवी आहे. त्यात स्तर आणि भिन्नता जरूर आहे.. पण ती हवी आहे हे मात्र खरे. हे सारे मिळाले की आपण सुखी होऊ असे प्रत्येकालाच वाटते. पण हे सारे ज्यांना मिळाले ते खरचं सुखी झाले आहेत का? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. हा सारा प्रवास म्हणजे अहंकाराची वाट आहे. या वाटा जीवनात सुखाभास निर्माण करतील पण त्या वाटा जीवनानंदाचा अनुभव मात्र देऊ शकणार नाही. याचे कारण सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा म्हणजे अंहकाराची वाट आहे. जेव्हा जीवनात अंहकाराचा परिपोष होतो तेव्हा त्या वाटेने जे काही मिळते ते केवळ आभासमय असते. त्यात खरा आनंद सामावलेला नाही. शिक्षणातून आपण अंहकाराची मुक्तीचा विचार पेरण्याची अपेक्षा करतो, पण तेथेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अंहकाराचे परीपोष होत असतो.
शिक्षणच मुळात अंहकारयुक्त आहे मग ते तरी अंहकाराची मुक्त कशी करणार हा खरा प्रश्न आहे. आपल्या जीवन प्रवासात मी जे काही करतो तेच महत्वाचे आहे असे वाटने हाही अंहकार. मी कोणाचा तरी बॉश आहे ही धारणाही अंहकार.. मी ज्ञानी आहे.. त्याच्यापेक्षा मला अधिक समजते ही भावनाही अंहकार.. आपण कोणीतरी आहोत ही मनात वरचढ होत जाणारी भावना म्हणजे अंहकार.. जेथे जेथे अंहकार असतो तेथे फार सुखाचा, समाधानाचा आणि अंतरिक प्रगतीचा मार्ग सापडण्याची शक्यता नसते. आपल्याला जीवनात उन्नती हवी असेल तर त्यासाठी ‘सिध्दार्थ ते बुध्द’ हाच मार्ग अनुसरण्याची गरज आहे. कृष्णमूर्ती म्हणतात, की शिक्षक म्हणून वेगळी प्रतिष्ठा नाही. विद्यार्थ्यांच्याप्रमाणेच तुम्ही समस्या असलेला एक माणूस आहात. तुम्ही स्वतः कोणीतरी आहात असे समजून बोलू लागतात तेव्हा सारेच बिघडण्यास आरंभ होतो. आपल्यातील बिघडलेली वाट ही आपणच बिघडवली आहे.. त्यामुळे दुरूस्तीचा मार्गही आपल्याच हाती आहे.
माणसाच्या जीवनात अनेक समस्या आहेत.त्या सा-या समस्या या जीवनाच्या उन्नतीतील अडथळे आहेत. मात्र त्या सर्व समस्या वरवर भिन्न असल्या तरी त्या सर्व समस्यांच्या मुळाशी एकच गोष्ट आहे. ती समस्या म्हणजे माणसात दडलेला स्वार्थ. कृष्णमूर्ती म्हणतात, की स्वार्थ ही आपल्या जीवनातील मूलभूत समस्या आहे. आपल्या जीवनात आपल्याला काही साध्य करायचे आहे. आपल्या प्रत्येकाला एक महत्वकांक्षा निश्चित आहे. आपल्यात महत्वकांक्षा सामावलेल्या आहेत तर ती साध्य करण्यासाठी माणसं हव्या त्या वाटेचा प्रवास करताना दिसतात. महत्वकांक्षा साध्य करणे हे जणू अंतिम ध्येय आहे. त्या ध्येयासाठी आपल्या भोवतालमध्ये स्पर्धा आहे. त्यातून आपल्याला प्रथम स्थान प्राप्त करायचे आहे. आपल्या जीवनात असलेली स्पर्धा आणि विशेष कौशल्याची निर्दयता हे अहंकाराचा भाग बनत जातात. आपल्याकडे जी कौशल्य आहेत ती आपल्याकडेच आहे. तीच अधिकाधिक चांगली आहेत त्यामुळे त्यातूनही अंहकाराचेच भरण होत असते. जीवनात आपल्याला काही बनायचे आहे तर त्यासाठीची वाट निर्माण करताना देखील आपण कोणाच्या तरी वाटेचा म्हणजे अनुकरणाचा प्रवास करू पाहत असतो. त्या वाटा निवडताना आपल्यातील प्रतिष्ठा उंचावेल असाच विचार असतो.. आपण कोणासारखे बनू तर आपल्या अधिक प्रतिष्ठा मिळेल ही भावना त्यात सामावलेली असते. त्यामुळे अनुसरण व अनुकरण हे देखील अहंकाराचाच भाग बनत असतात. मुळात आपल्याला काय बनायचे आहे हे आपण ठरवायला हवे असले तरी ते अंतरिक भावनेचे प्रतिबिंब असायला हवे. आपण जसे आहोत तसे बनण्याचा प्रयत्न केला तर बरेच प्रश्न सुटू शकतात, पण आज तसे घडत नाही. त्याउलट आपल्याला अंहकाराचे भरण करणारी वाट हवी असते. त्यावाटेने आपण सुखावत जातो आणि सुख मिळत जाते, पण ते खरे सुख नसते. त्यामुळे जीवनातील सत्याची वाट चालायची असते. त्या वाटेकरीता अंहकारमुक्तीचाच प्रवास घडायला हवा आहे. ती अंहकारमुक्तीत शिक्षणातून होत नाही. त्याउलट शिक्षणातून विविध माध्यमातून अंहकाराचे भरण होईल असीच पेरणी होताना दिसते आहे. शिक्षणात स्पर्धा सर्वदूर आहे. ती स्पर्धा मग मार्काची आहे.. ती प्रथम क्रमांकांची आहे. ती गुणवत्तेची आहे. तेथे जे हवे आहे ते देखील प्रथम क्रमांकाने हवे आहे.. त्यामुळे शिक्षण तर स्पर्धाच पेरते आहे.. मग जेथे स्पर्धा आहे तेथे अंहकाराचेच भरण आहे. जेथे अहंकार आहे तेथे मुक्तीचा विचाराची शक्यता नाही. शिक्षणातून जे पेरले जाते तेच समाजात उगवते आहे. त्यामुळे समाजात अंहकाराने भरलेली माणसं आहे. अंहकार आहे म्हणून संघर्षाचा जन्म आहे.
कृष्णमूर्ती म्हणतात, की शाळांमधील शिक्षकाला समस्या सोडवण्याची मनापासून इच्छा असेल आणि तशी त्याची भावना असेल अशी आशा आहे. विद्यार्थ्याला निःस्वार्थीपणे जगण्यास कशी मदत करेल? तुम्ही म्हणाल, ‘ही चमत्कारिक देवांची देणगी आहे किंवा अशक्य म्हणून बाजूला साराल. परंतु जर ह्या बाबतीत खरोखर गंभीर असाल आणि तसे असायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांसाठी संपूर्णपणे जबाबदार असाल तर ह्या पुरातन, ऊर्जेपासून हा अहंकार जो खूप दुःखाचे कारण आहे त्यापासून कशी सुरुवात कराल? बंधनकारक मन मुक्त करायला हवे. जेव्हा मुले रागाने बोलतात किंवा कुणाला तरी ठोसा लगावतात किंवा स्वतःच्या मोठेपणाचा विचार करतात, तेव्हा तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक म्हणजे ममतेने त्यांना साध्या शब्दात, ह्याचे काय परिणाम आहेत हे सांगणार नाही का? जेव्हा विद्यार्थी ‘हे माझे आहे’ म्हणून आग्रह धरतो किंवा ‘हे मी केले’ म्हणून गर्वाने सांगतो किंवा कधीतरी भीतीपोटी काही गोष्टी करण्याचे टाळतो, तेव्हा तो हळूहळू स्वतःभोवती भिंत निर्माण करत असतो. हे त्याला स्पष्ट करून सांगणे अशक्य आहे का? जेव्हा विद्यार्थ्यांच्या इच्छा, भावनिक खळबळ त्यांच्या तर्कशुद्ध विचारांवर मात करतात, तेव्हा ही अहंकाराची छाया पसरत चालली आहे हे त्यांच्या लक्षात आणून देणे शक्य नाही का? असे अनेक सवाल ते करतात.मुळात शिक्षणातून ‘आपण’ पासून ‘मी’ पर्यंतचा प्रवास करत असतो. खरेतर हा प्रवास ‘मी’ पासून ‘आपण’ कडे होण्याची गरज असते. मी प्रथम क्रमांक प्राप्त केला. मी यशस्वी झालो.. मी हे केले… मी ते केले.. प्रत्येकवेळी संवादात जेव्हा मी येतो तेव्हा तो अंहकारच असतो. शिकलेल्या माणसांमध्ये अधिक अंहकार आहे.. मी कोणीतरी आहे ही भावना अधिक सुखावत असते.माझे अधिकार, माझे पद, माझी प्रतिष्ठा असं बरच काही त्यात असते. शिकलेली माणसं एकत्रित राहू शकत असं म्हटले जाते. खरंतर राहू शकत नाही असं नाही, पण त्यात अहंकाराची अधिक स्पर्धा असते. आपला अंहकार जोपासला, सुखावला जाण्याची शक्यता नसते तेथे संघर्ष निश्चित असतो. शिकलेल्या प्रत्येक माणसांमध्ये अंहकार मोठया प्रमाणात सामावलेला असतो. कोणाची तरी पदवी, कोणाचे पद, कोणाचा अधिकार, कोणाचा पगार, कोणाचा तरी बंगला अस बरच काही अहंकार सुखावणारे असते. त्यामुळे तेथेही अंहकाराचीच स्पर्धा असते.. मग ही स्पर्धा असेल तर तेथेही दुःखच मिळणार. समाजात विविध अंगी स्पर्धा आहेच मात्र शिकलेल्या माणसांत तर अंहकाराचीच स्पर्धा अधिक मोठी आहे. त्यामुळे शिकलेल्या माणसांत भिंती उभ्या राहता आहेत. त्या भिंती पाडून टाकणारी व्यवस्था शिक्षणातून उभी राहण्याची गरज आहे. आपण शिक्षणातून वाढणारा अंहकार कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.. अन्य़था अंहकाराचे पोषण करणारी व्यवस्था आपण उभी करत जाऊ आणि त्यातून उभ्या राहाणा-या भिंती अधिक उंच उंच उभ्या राहतील. त्यामुळे समाजात विभाजन होण्याबरोबर विषमता निर्माण होण्याचा धोका आहे. जेथे अंहकार असतो तेथे प्रेमाचा भाव आपोआप संपुष्टात येतो. तो अहंकार कुठल्याही रूपातील असला तरी तिथे प्रेम असू शकत नाही हे त्याना सांगणे शक्य नाही का? आपण अंहकाराचा परिपोष होणार नाही यासाठी जाणीवपूर्वक पेरणी करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. अंहकार संपला की नाते अधिक भक्कम होतील. माणसांतील माणूसकीची उंची देखील अंधिक उंचावेल यात शंका नाही. आपल्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा हाच मुळी स्वार्थ आणि अंहकार आहे. आपल्यातील स्वार्थ बाजूला सारला तर बरेच प्रश्न निकाली निघतील. स्वार्थ संपला की अंहकारही संपतो आणि त्याचवेळी स्पर्धा देखील थांबते. त्यामुळे समाज निर्माण होण्याबरोबर संघर्ष देखील संपुष्टात येण्यास मदत होईल. त्यामुळे शिक्षणातून प्रेमाचा भाव प्रवाहीत करण्याची निंतात गरज आहे.
कृष्णमूर्ती म्हणतात, की परंतु विद्यार्थी शिक्षकाला विचारेल ‘तुम्हाला प्रत्यक्षात कळले आहे का ? की तुम्ही शब्दांशी केवळ खेळत आहात?’ तो प्रश्नच तुमच्यातील प्रज्ञा जागवेल आणि त्याच प्रज्ञेने तुमच्यामध्ये योग्य भावना उचंबळून येतील आणि उत्तर देण्यासाठी योग्य शब्द सुचतील. असं खरंतर घडायला हवे. शिक्षक म्हणून तुम्हाला वेगळी प्रतिष्ठा नाही; विद्यार्थ्याप्रमाणेच आयुष्यातील समस्यांसह तुम्ही पण एक माणूस आहात. खरंतर आपण माणूस आहोत हेच आज विसरत चाललो आहोत. समाजात प्रत्येकाचा एक कंपू उभा राहत आहे. त्या कंपूतही अंहकार सामावलेला आहे. ज्या क्षणी तुम्ही प्रतिष्ठित पदावरून बोलता, त्या क्षणी मानवी नातेसंबंध खरोखर बिघडवत असतात. आपण प्रतिष्ठित पदावरून बोलू लागलो की आपल्या अंहकाराचे पोषण होते.. आणि इतर कोणी तरी कनिष्ठ आहेत ही भावना दृढ होते.. त्यातून संघर्षाचा जन्म होतो. त्यामुळे शिक्षण जर प्रेमाने ओथंबलेले असेल तर त्यात सर्वांच्याच हिंताचा प्रवास घडताना दिसेल. आज सर्वांना प्रतिष्ठा हवी आहे. ती प्रतिष्ठा कशासाठी हवी आहे, तर त्या प्रतिष्ठेमध्ये सत्ता अभिप्रेत आहे. आज प्रत्येक जन जेथे आहे तेथील सत्तेची गरज वाटत असते. अनेकदा अधिकाराची जाणीव असताना देखील आपल्याला अधिकारीची भूक शांत बसू देत नाही. मग आपण कोणाच्या तरी अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न करत असतो त्यातू पुन्हा नव्या संघर्षाचा जन्म होत असतो. जेव्हा कोणी प्रतिष्ठेच्या मागे लागलेला असतो तेव्हा कळत किंवा नकळत सहजतेने पाशवी जगात प्रवेश केला जात असतो. शिक्षण आणि शिक्षकांवर प्रचंड जबाबदारी आहे. जर ही संपूर्ण जबाबदारी म्हणजे प्रेम, स्वीकारलीत तर अंहकार समूळ नाहीसा होईल.आपण ही वाट चालल्याशिवाय चांगला समाज आणि चांगले राष्ट्र तरी कसे निर्माण होईल हा खरा प्रश्न आहे.
_ संदीप वाकचौरे
(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)