Wednesday, July 24, 2024
Homeब्लॉगपरीक्षांमध्ये सुधारणा हव्याच...

परीक्षांमध्ये सुधारणा हव्याच…

शिक्षणात पुन्हा एकदा परीक्षांचा विचार केला जाऊ लागला आहे. त्याचे स्वागत होताना दिसत आहे. पालक खुष आहे.. विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागेल.. अन्य़था नापास असा विचार त्यात केला जात आहे. शिक्षण,परीक्षा हे सूत्र आपल्या शिक्षणात सातत्याने विचारात घेतले जाते. शिकण्यापेक्षा परीक्षेचा विद्यार्थ्यांनावर अधिक ताण येते हे अनेकदा समोर आले आहे. शिकण्याचा विद्यार्थ्यांना फारस ताण येत नाही मात्र जे शिकायचे आहे त्या नंतर जर परीक्षा घेतली जाणार आहे असे जरी म्हटले तरी विद्यार्थी तणावात येतात हे आजवर समोर आले आहे. वर्तमानात परीक्षा ही मुलांसाठी सर्वात भितीदायक गोष्ट बनू पाहते आहे. शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थी जेवढे परीक्षेला घाबरतात तेवढे कशालाही घाबरत नाही.हे शिक्षणाचे वास्तव आहे. परीक्षेचा ताण घेऊन अनेक विद्यार्थी आत्महत्या करतात हे समोर आले आहे. परीक्षेत नापास होण्याची भिती, मार्क कमी पडण्याच्या भितीने देखील मुलं स्वतःला संपवणे पसंत करतात. शिकणे अधिक आनंददायी करण्यासाठी देशात विविध संस्थानी वेगवेगळ्या प्रकारच्या शिफारशी केल्या आहेत. परीक्षेतील ताण तणाव कमी करण्याबरोबर परीक्षेतील यश मिळवण्यासाठी प्रो.यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडयात ब-याच शिफारशी करण्यात आलेल्या आहेत.त्या शिफारशींचा विचार केला असता तर बरेच प्रश्न सुटले असते. मात्र आपल्याकडे शिक्षणातील विविध आयोग, समित्या यांचे अहवाल येतात मात्र त्यावर गंभीरपणे पावले उचलले जात नाही हे वास्तव आहे. त्यामुळे देशभरातील शिक्षणाचे प्रश्न कमी होताना दिसत नाही.

- Advertisement -

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडयात हे नमूद केले आहे की, पाठयपुस्तकांमधील आशयावर आधारित प्रश्नांपेक्षा, प्रश्नांची सोडवणूक आणि समजूतीवर आधारित परीक्षा असावी. मुळात आशयावर आधारित परीक्षा ही चुकीच्या शिकवण्याच्या पध्दती व पाठांतराला पोषक नसते ज्यामुळे परीक्षेच्या काळातील ताण वाढतो. परीक्षेचा ताण वाढण्याच्या संदर्भातील हा विचार अधिक महत्वाचा आहे. त्याच बरोबर छोटया परीक्षा असण्याची गरज व्यक्त केली आहे. खरतर छोटया परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील आनंद उंचावेल. परीक्षांचा होणारा ताण कमी होईल. परीक्षेचा अर्थ केवळ विद्यार्थी काय शिकला हे पाहण्यासाठी आहे. परीक्षेत विद्यार्थी किती चुकला हे महत्वाचे नाही तर विद्यार्थ्याला जे शिकवले आहे त्यातील त्याला किती कळाले हे जाणता यायला हवे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर मूल्यमापन करण्यास काय हरकत आहे. सध्या देशात बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्का कायद्यातील कलम 29 मध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची प्रक्रिया सुरू केली आहे. यातील आकारिक मूल्यमापन हे प्रत्येक टप्प्यावर करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. असे मूल्यमापन करण्याची निंतात गरज आहे. छोटया परीक्षा ही शिकण्याच्या प्रक्रियेतील महत्वाची गोष्ट आहे. त्याच बरोबर आपण ज्या परीक्षा घेतो त्यातही 25 ते 40 टक्के लिखित उत्तरे आणि बाकी उत्कृष्ट आराखडा असलेल्या बहुउत्तरी प्रश्नांच्या स्वरूपातील प्रश्नपत्रिका असे बदल करावेत. 90 टक्के मुलांना पेपर लिहून परत तपासण्यासाठी वेळ शिल्लक उरायला हवा. परीक्षांसाठी प्रश्न हे किती दीर्घ असावेत याचा विचार करण्याची गरज असते. प्रश्नांच्या उत्तरे खूप दीर्घ लिहावे लागले तर विद्यार्थ्यांना वेळ पुरणार का ? याचाही विचार व्हायला हवा. त्यामुळे परीक्षेला विचारलेले जाणारे प्रश्न हे बहुउत्तरी स्वरूपातील असायला हवे. अर्थात आपल्या राज्यात दहावी बारावीच्या परीक्षांसाठी कृतीपत्रिकांचा पर्याय गेले काही वर्ष स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे निश्चित विद्यार्थ्यांना मदत होते आहे. अर्थात एखादा घटक, अथवा वाचन कौशल्याचे आकलन किती प्रमाणात होते यावरच प्रश्न सोडवणे शक्य आहे. मुळात मूल्यमापनाव्दारे विद्यार्थ्यांचे पाठांतर प्रक्रियेला प्रोत्साहन मिळू नये यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

विद्यार्थ्यांवर परीक्षांचा ताण येऊ नये म्हणून शक्य होईल तितक्या अधिक प्रमाणात परीक्षांचे आयोजन मुलांच्या स्वतःच्या शाळांतच करायला हवे.विद्यार्थ्यांना शाळा बदलून दुस-या गावी परीक्षेसाठी जावे लागणे म्हणजे आणखी असुविधा निर्माण करणे आहे. मुलांना वातावरणाशी जुळून घेणे काहीसे कठीण होते. परीसर अनोळखी असतो.अधिक मुले एकत्रित आले तर त्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो.. अर्थातच तो परिणाम नकारात्मक असतो. इतर वेळी एकत्र येणे आणि परीक्षेला एकत्रित येणे यात निश्चित फरक आहे. त्या वातावरणात गोंधळणे घडण्याची शक्यता आहे. कॉपी टाळण्यासाठी इतर शाळांमधले शिक्षक हे पर्यवेक्षक म्हणून नेमावेत अशी शिफारस आहे. आपल्याकडे कॉपी ही एक शिक्षणाला लागलेली किड आहे.त्याचा अत्यंत विपरित परिणाम होताना दिसतो आहे. स्थानिक पातळीवर परीक्षा घेतल्या तर क़ॉपीचे प्रकार वाढतात असे म्हटले जाते. त्यामुळे कॉपीच्या विरोधात कायदे करून आपण परीक्षा कॉपी मुक्त करू शकणार नाही.त्यामुळे पालक आणि विद्यार्थी यांच्या मानसिकतेतच बदल घडविण्याची गरज आहे.अर्थात ते मोठे आव्हान आहे, गेले काही वर्षात शिक्षण क्षेत्रात कॉपीसारख्या वाममार्गात शिक्षक आणि पालकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे हे अधिक चिंताजनक आहे. त्याचबरोबर कोणत्याही परीस्थितीत परीक्षा पुढे ढकलणे हे टाळायला हवे.तसे घडले तर विद्यार्थ्यांवर नकारात्मक परिणाम होतो. विद्यार्थ्याला त्याचे किती विषय तयार आहेत तेवढे देण्याची मुभा असावी आणि परीक्षा पूर्ण करण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी दिला जावा. ही लवचकिता अपेक्षित केली आहे. गरजेप्रमाणे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य हे महत्वाचे आहे. असे घडले तर ज्या विषयांची तयारी झाली आहे तेवढ्याच विषयाची तयारी झाली तेवढे पेपर देण्याची संधी म्हणजे मुलांवरील ताण कमी करणे आहे. यातून मागणी प्रमाणे परीक्षा ही कल्पना विकसित होईल. ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपली तयारी पूर्ण झाल्याची भावना राहील.पास-नापास ही परीभाषा वापरणे थांबवावे. त्याऐवजी पुनर्परिक्षा सुचवित आहोत. खरतेर किशोरवयीन वयापर्यत मुलांवर पास, नापास हा शब्दांनी देखील मोठा नकारात्मक परिणाम होत असतो. आपण नापास झालो म्हणजे आपल्याला काहीच येत नाही अशी धारणा बनते. नापास झालो म्हणजे आपण जगण्यासा जणू पात्र नाही असे विद्यार्थ्याला वाटते. त्यामुळे पास नापास ऐवजी पर्यायी शब्दांचे उपयोजन केले तर त्याचा सकारात्मक परिणाम साधला जाणे शक्य आहे. आपल्या राज्यात त्यादृष्टीने गेले काही वर्ष प्रयत्न केले जाता आहेत. ते कौतुकास्पदच आहे. गुणवत्ता कमी पडते हे दाखविणारी भाषा वापरावी. अर्थात एखादी नकारात्मक गोष्ट सकारात्मकतेने मांडता येणे अधिक गरजेचे असते. आपण वर्णनात्मक नोंदी करताना देखील जो विचार करतो आहोत त्यात सकारात्मक नोंदी करण्याबाबत सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे भाषा वापरण्याचे कौशल्य अधिक महत्वाचे असणार आहे. काही काळानंतर लगेच पुन्हा परीक्षा ठरवावी, म्हणजे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही. अर्थात आपण त्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. निकालानंतर दोन महिन्याच्या आत पुनर्परिक्षा घेतली जात असल्याने त्यामुळे विद्यार्थ्याचे वर्ष वाया जात नाही. गणित, इंग्रजी सारख्या विषयांच्या उत्तर पत्रिका दोन पातळ्यांवर तपासल्या जाव्यात. प्रमाण पातळीवर आणि उच्च पातळीवर ज्या विद्यार्थ्यांनी सहापैकी 2/3 विषयांत प्रमाण पातळी गाठली आहे व उरलेल्या 2/3 विषयात उच्चश्रेणी गाठली आहे असा विचार केला जावा. कालांतराने सर्वच विषयांकरता ही पध्दती वापरली जावी अशी शिफारस करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल.शिकण आनंददायी करायचे असेल तर आपल्याला परीक्षा अधिक आनंददायी करण्याची गरज आहे.त्याशिवाय शिक्षणातील दिसणारे वर्तमानातील प्रश्न कमी होणार नाही. मुळात या शिफारशी अधिक गंभीरपणे घेतले गेले तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, न्युनगंड कमी होण्यास मदत होईल.अर्थात यातील अनेक शिफारशी बिना पैशाने अमलबजावणीत आणता येणे शक्य आहे. त्यामुळे त्याची अमलबजावणीच्या दृष्टीने काहीसे प्रयत्न होता आहेत. देशातील केंद्रिय परीक्षा मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षेतील श्रेणी अथवा टक्केवारी न नोंदविणेची भूमिका घेतली आहे. त्यामुळे किमान सकारत्मक परिणाम दिसू लागतील अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. अर्थात जोवर पालकांची मानसिकता आणि मार्कांची स्पर्धा थांबत नाही तोवर आपल्याला शिक्षणाचा आनंद घेता येणार नाही.

_ संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या