Tuesday, May 7, 2024
Homeब्लॉगआम्ही बालकद्रोही...

आम्ही बालकद्रोही…

खरेतर मी मुलांना शिकविण्यासाठी सक्षम आहे. मी शिकवतो म्हणून मुले शिकतात असे साधारण शिक्षण क्षेत्रात काम करणारा प्रत्येक जन बोलत असतो. मात्र शिक्षणात काय पण जीवनाच्या प्रवासात देखील कोणी तरी कोणाला शिकवते म्हणूनच शिकतात हे काही खरे नाही. मुल स्वतःच शिकत असते. त्यांना जे काही पाहायला मिळते, अनुभवायला येते, कानावर जे येते त्यातून ते अर्थ लावत असतात.

शिकण्यासाठी शिक्षक हा मदत करतो आणि शिकण्यासाठी प्रक्रियेत सुलभक म्हणून काम करीत असतो. जगप्रसिध्द शिक्षणतज्ज्ञ गिजुभाई बधेका असे म्हणतात की, “समर्थ शिक्षणशास्त्रज्ञांचे असे मत आहे, की जो शिक्षक असे म्हणतो, की मी मुलांस शिकवतो, मी मुलास हवे तसे बनवू शकतो. तो खरा शिक्षक नाही. तो एक शिक्षणद्रोही आहे. बालद्रोही आहे. गुन्हेगार आहे”. या मताचा शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाने गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.

- Advertisement -

….तरच आनंदाचा प्रवास

गिजूभाई म्हणजे बालकांचा विचार करणारा शिक्षणतज्ज्ञ आहे. ज्यांच्या विचारप्रक्रियेच्या केंद्रस्थानी बालक राहिले आहे. बालकांच्या शिक्षणाबाबत अधिक गंभीरपणे ते विचार करीत होते. खरेतर बालक अनेक गोष्टी स्वतःच शिकत असते. बालक शाळेत येण्यापूर्वी अनेक गोष्टी स्वतःहून शिकून आलेले असते. अगदी बालक शाळेत येते तेव्हा त्याला स्वतःची भाषा येत असते. ती भाषा त्याला कोणी जाणीवपूर्वक शिकवलेली नसते. भाषा संवादाने, कानावर पडून तो शिकलेला असतो. त्या भाषेच्या आधारे शाळेत आणि जीवन व्यवहारात श्रवण, भाषण करत असतो. त्याच बरोबर तो भाषेचे व्याकरण न शिकताही त्याने भाषा आत्मसाथ केलेली असते. त्याच बरोबर विचार करण्याची प्रक्रिया देखील तो करीत असतो. एखाद्या गोष्टीचा त्याला अनुभव मिळत असतो. तो अनुभव घेतल्यानंतर त्या अनुभवाचा अर्थ लावणे, त्या अनुभवातून नवे काही शिकणे तो करीत असतो. लहान वयात मुले जे काही करून पाहात असते त्यात त्याचे शिकणे असते. खेळण्यातून देखील तो शिकत असतो.

एक बालक तीन चार वर्षाचे असेल, त्याला खेळण्यासाठी त्याने दोन पातेले घेतले होते. एक पातेले मोठे होते आणि एक छोटे होते. ते पातेले ते खेळत होते. मोठया पातेल्यात छोटे पातेले घालत होते. मग लहान पातेल्यात मोठे पातले घालण्याचा प्रयत्न करीत होते. पण पातेले एकमेकात काही जात नव्हते. पुन्हा पुन्हा ते बालक प्रयत्न करीत होते, हा खेळ थांबायचा, पुन्हा केव्हा तरी आठवण आली की पुन्हा सुरू व्हायचा. हा प्रयत्न म्हणजे मुलाचे शिकणे आहे. पुढे कधीतरी मुलाने निश्चितपणे या कृतीतून त्याला कळत होते, की मोठया आकाराचे पातेल्यात लहान पातेले जाते पण लहान पातेल्यात मोठे पातले जात नाही. त्यातून त्याने स्वतःच आकलन केले आणि स्वतःच ज्ञान प्राप्त केले. अनेक वेळा चूका करीत अंतिम निष्कर्षा पर्यंत ते पोहचले होते. अशा कितीतरी गोष्टी विद्यार्थी स्वतःच शिकत असते. पाठातील आशय शिकतांना पूर्वानुभव लक्षात घेऊन नवे अनुभव द्यायचे असतात असे म्हटले जाते. त्याचे कारण पूर्वानुभव म्हणजे तो जे काही शिकला आहे, त्याला जोडून नव्या अनुभवातून शिकणे करणे असते.

आम्हाला स्वातंत्र्य हवे…

अनेकदा नवे म्हणून आपण त्याला जे काही शिकू पाहातो, ते त्याने जुने जे काही ज्ञान प्राप्त केले त्याच्याशी नाते सांगणारे असते. त्यामुळे एकूणच शिकण्याच्या प्रक्रियेत बालक स्वतःच शिकण्यासाठी प्रयत्न करीत असते. बालक जे स्वतःहून शिकते ते दीर्घकाळ लक्षात राहाते. तर बाहेरून लादले गेले, की ते अल्पकाळ स्मरणात राहाते. स्वतःहून शिकण्यात आनंद असतो, त्या शिकण्यात अधिक ज्ञानइंद्रीयांचा सहभाग असतो. त्या शिकण्यात स्वतःची अभिरूची असते. त्यात त्याला स्वातंत्र्य असते. चूका करण्याची पुन्हा पुन्हा संधी असते. जेव्हा कोणी आपल्याला शिकवत असते तेव्हा त्यात त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतले गेलेले असते. त्या शिकण्यात सक्ती असते. कोणी तरी शिकवत असते तेव्हा शिकविणा-यांने स्वतःची पाऊलवाट निर्माण केलेली असते. त्याच्या मुलांच्या पाऊलवाटेचा प्रवास नसतो. मात्र स्वतः शिकण्याच्या प्रयत्नात चुकांची संधी असते. मुल जितक्या चुका अधिक करते तितके ते अधिक शिकत असते. त्या प्रत्येक चुकेत एक नवे शिकणे असते.

एकदा आईन्स्टाईन प्रयोग करीत होते. त्यांच्या सोबत काही नवे सहकारी देखील मदतीला होते. एकच प्रयोग पुन्हा पुन्हा करणे घडत होते आणि अंतिम साध्यतेपर्यंत जाणे घडत नव्हते. त्यात तरूण वैज्ञानिक वैतागले होते पण आईन्स्टाईन मात्र पहिला प्रयोग जितक्या उत्साहाने करीत होते. तितकाच उत्साह कायम ठेऊन पुन्हा पुन्हा प्रयोग करीत होते. तेव्हा त्या थकलेल्या वैज्ञानिकांनी त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही प्रत्येक वेळी न थकता कसे काय प्रयोग करतात? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “प्रत्येक प्रयोग करतांना मी एक चूक करीत होतो. पुढचा प्रयोग करतांना ती चूक दुरूस्त करणे घडत होते. मग पुन्हा नवी चूक, पुन्हा ती दुरूस्त करणे, पुन्हा नवी चूक.. असे घडत गेल्यांने एका प्रयोगात अनेक चूका घडत जातात आणि त्या दूर करत अंतिम सत्यापर्यंत पोहचता येते. आपण शेवटच्या उत्तरापर्यत पोहचतो तेव्हा फक्त उत्तर दिसते आणि प्रयोग करणा-याला त्यातून अनेक चूकांची मालिका दूर सारत उत्तर दिसते”. पण शेवटच्या उत्तरा पर्यंत जाताना अनेक गोष्टींचे शिकणे झालेले असते. त्या चुका म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेतील केवळ चूका नसतात तर ती प्रत्येक एक चूक म्हणजे नवे काही शिकणे असते. असे शिकणे स्वयंशिक्षणात असते.

पुस्तकातून घडूदे मस्तके..

बाहय शिकण्यात आणि शिकविण्यात चूका करण्याचे स्वातंत्र्यच नाकारले जाते. या प्रकारच्या शिक्षणात मुलांला आनंद असतो. त्यामुळे रचनावादाच्या सिंध्दात प्रत्येक मुल स्वतःच शिकते हे मान्य केले आहे. प्रत्येक मुल हे ज्ञानाचा निर्माता असते यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. ज्ञानाच्या निर्मितीसाठी शिक्षक केवळ विविध प्रकारचे अध्ययन अनुभवांची मालिता तयार करीत असतात. शिक्षक हा सुलभक असतो तो शिकवत नाही तर शिकण्यासाठीचे वातावरण निर्माण करीत असतो. शिकण्यासाठी संधी निर्माण करण्याची गरज असते. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता निर्माण करण्याचे काम सुलभकाचे असते. मुलांना चुकण्यासाठी अधिक संधी दिल्या की मुले अधिक प्रमाणात शिकत जातात. खरेतर गिजूभाईंनी ज्या काळात हे मत व्यक्त केले त्या काळात मेंदूशास्त्र फारसे प्रगत नव्हते. त्याकाळात मुल म्हणजे कोरेकरकरीत असते. मुल म्हणजे मातीचा गोळा, त्याला जसे आकार देऊ तसे ते घडते अशा काळात गिजूभाईंनी जगाच्या कितीतरी पुढे जात हा विचार प्रतिपादन केला आहे.

कधी काळी शिक्षक आम्ही मुलांना शिकवितो त्यामुळेच मुले शिकतात असे म्हणत होते. खरेतर शिक्षक जे म्हणत होते ते जर खरे असे असेल तर वर्गातील कोणताही विद्यार्थी नापास होता कामा नये. पण तरी काही मुले नापास होतात, कोणीतरी कमी गुण मिळवितात कोणी अतिउत्तम गुण मिळवितात. याचा अर्थ शिक्षकांने जे काही अनुभव दिले आहेत त्या आधारे मुल ज्या गतीने ज्ञान प्राप्त करू शकले त्याचा तो परिणाम आहे. कारण विद्यार्थी स्वतःच ज्ञान निर्मित करीत असतो. जो शिक्षक असे म्हणतो, की मी मुलांस शिकवतो, मी मुलास हवे तसे बनवू शकतो. तो खरा शिक्षक नाही. हे विधान वर्तमानातील शिक्षण शास्त्राने सिध्द केले आहे. त्यामुळे माझ्यामुळे शिकतो, मी शिकवितो म्हणून ते शिकते आहे असे म्हणणा-याच्या बाबतीत ते म्हणतात तो एक शिक्षणद्रोही आहे. बालद्रोही आहे. गुन्हेगार आहे. किती कमालीचा संताप एका अर्थाने गिजूभाईनी व्यक्त करतात. यातून त्यांचे मुलावरचे प्रेम अधोरेखित होते. ते म्हणतात मुलांना कामे करायला आवडतात. त्याला त्याचा रूमाल धुऊ देत. तिला तिचा कप भरूदे. त्याला फुलदाणी सजवू दे.. तिला तिचे ताट विसळू देत. त्याला मटार सोलू दे. तिला जेवण वाढू देत. त्यांना कामे करू देत पण अर्थात त्याच्या गतीने आणि इच्छेने. हे खरे शिक्षण आहे.

बालशिक्षणांच्या दिशेने…

या दिशेचा प्रवास त्यांना अभिप्रेत आहे. त्यामुळे हे जर मुले करतील तर त्यातून बरेच काही शिकणार आहे. करून शिकण्याची संधी त्यांना अपेक्षित होती. आज आपण वर्तमानात तोच विचार पुढे घेऊन चाललो आहोत. त्यामुळे त्याविचाराने ते सांगत होते की कृती करीत स्वतःच बालक शिकणार आहे. त्यामुळे कृती तर बालक करेल. त्यातून तो विचार करेल आणि त्यातून अर्थ लावत ज्ञानाची निर्मिती करेल. त्यातून बालक शिकण्याचा प्रयत्न करेल म्हणून तर त्यांना कोणी शिकविते हे तत्व मान्य होत नाही, कारण पोपटपंचीच्या शिकण्यावरती त्यांचा भरवसा नाही. ते म्हणतात त्याप्रमाणे मुलांबददल वाचले, लिहिले, विचार केला. झाले नाही. आपल्याला नवीन मंदिरे उभारायची आहेत आणि त्यात ज्ञान आणि विवेकाची स्थापना करायची आहे. मुलांचे नवे युग सुरू झाले आहे. फक्त बोलून फायदा नाही. आपल्याला काहीतरी करून दाखवायचे आहे. कृतीत आणायचे आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाचा विचार केला तर नव संशोधनाच्या दिशेने पुढे जात, नवा विचार साध्य करावा लागेल. त्या दिशेने प्रवास करण्यासाठी आपणच पाऊलवाट निर्माण करावी लागेल. ही वाट आनंददायी आणि समाजाचे भले करणारी आहे.. फक्त आपल्याला आपला अहंकार सोडावा लागेल इतकेच.

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या