Friday, May 3, 2024
Homeब्लॉगअभ्यासूनी प्रकटावे...

अभ्यासूनी प्रकटावे…

प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनाचा प्रवास हा आपली निश्चित केलेली ध्येय साध्य करण्यासाठी करत असतो. ध्येय ठरविली म्हणजे ते काही लेगच साध्य होत नाही. ध्येयाच्या दिशेने प्रवास करण्यासाठी आपणाला सातत्याने निश्चितपणे अभ्यास करावा लागतो. ध्येय साध्यतेसाठीची पाऊलवाट निर्माण करताना त्यासाठी नियोजनाची गरज पडत असते. त्यादृष्टीने प्रत्येकजन पावले टाकत असतो.

आपण नियोजन करतो म्हणजे काय करतो तर, व्यापक अर्थाने ध्येयाच्या दिशेचा प्रवास करताना ती वाट कशी असणार आहोत त्याचा तो एक आराखडा असतो. त्याच बरोबर या प्रवासात कोणत्या प्रकारच्या समस्या येऊ शकतील त्याचा अंदाज बांधत असतो. एका अर्थाने त्याचा व्यापक विचार करून आपली वाट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या दिशेचा ध्यास घेऊन अभ्यासाची कास धरली तरच आपल्याला यशाकडे जाता येते. आपले ध्येय कितीही मोठे आणि आव्हानात्मक असले तरी ते अशक्य असे नसतेच. मात्र त्यासाठी अभ्यास आणि प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची तयारी दाखवावी लागते.आपण ध्येय साध्यतेसाठी किती प्रयत्न करतो हे अधिक महत्वाचे आहे.

- Advertisement -

आपल्या भोवतालमध्ये अशी अनेक यशस्वी लोक आहेत की, ज्यांच्या जीवनात अनेक समस्या होत्या. कधी आर्थिक परीस्थिती चांगला नव्हती. कधी आई वडील अशिक्षित होते. कधी क्षेत्रीय भोवताल आदिवासी, ग्रामीण होता. शाळा, महाविद्यालयांची सुविधा नव्हती. मार्गदर्शन करण्यासाठी कोणी नव्हते. अशा परीस्थितीत अनेकांनी आपले जीवन बदलवले आहे. संगणक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय किर्तीच्या संशोधकाचे आयुष्य म्हणजे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ज्या माणसांच्या आयुष्यात कुठेच सुखाचा धागा दिसत नव्हता. ज्याला एका वेळेचे अन्न मिळविणे अवघड होते.चर्चमध्ये आठवडयातून एक दिवस जेवण मोफत मिळते म्हणून हा माणूस काही किलोमिटर पायपीट करत चालत होता.

पोटाची भूक भागविण्याची देखील क्षमता नव्हती मात्र हा माणूस ज्ञानाची साधना करत होता.परदेशात असलेल्या संगणकात बिघाड झाल्यावर अनेक तज्ज्ञांनी प्रयत्न करूनही तो दुरूस्त करता आला नाही तेव्हा त्याला कंपनीने पाठविले. त्यांनी तो दुरूस्त केला. आव्हाने समोर होती मात्र ती अभ्यासाच्या जोरावर सहजतेने त्यांनी पेलली.ते जीवनात कधीच पराभूत झाला नाही असा मात्र अर्थ नाही. अभ्यासाची मिळालेली संधी ते घेत राहिले. त्यातून स्वतःची वाट चालत राहिले. जीवनात अभ्यासाला कोणताही पर्याय असत नाही. आज समाजात बुध्दीवान लोकांना फार मूल्य नाही असे बोलले जात असले तरी ते काही खरे नाही. समाजात जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा त्यांच्या सल्ल्यासाठी प्रतिक्षा करावी लागते. प्रत्येक क्षेत्रात तज्ज्ञतेचे मूल्य आहेच. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. ज्ञानाचे मोल लोकांना द्यावेच लागते मग ते क्षेत्र कोणतेही असो. रस्त्यात गाडी बंद पडल्यावर एखादा फिटर बोलविला जातो. तो येतो गाडी खोलतो आणि पाच एक मिनिटात गाडी दुरूस्त करतो आणि हजार रूपये मागतो.

आपल्याला पाच मिनिटासाठी हजार रूपये खूप वाटतात. याचे कारण त्याने फक्त एखादा नट अधिक आवळलेला असतो.त्यामुळे आपला जीव खालीवर होतो. मात्र तो फिटर जे पैसे घेतो तो केवळ पाच मिनिटाचे घेत नाही. तर नेमकेपणाने कोणता नट आवळायचा आहे हे निश्चित करण्यासाठी त्यांने जो अभ्यास केला त्याचे ते पैसे असतात. एखादा वक्ता एका तासाचे पाच दहा हजार रूपये मागतो. लोक आनंदाने देतात. त्यामागे त्यांने केलेली अनेक वर्षाची साधना असते. ही साधना म्हणजे अभ्यास असतो. लोक ज्ञानासाठी पैसे मोजायला तयार असतात. ज्ञान मिळविण्यासाठी लोक जीवनभर अनुभव घेत असतात. त्याचे ते मोल असते हे लक्षात घ्यायला हवे. अनेकदा आपण शिक्षण क्षेत्रात एकाच पदावर काम करत असतो मात्र तरी पण एखाद्या शिक्षकाला समाज मनात प्रतिष्ठा असते. कधी तरी एखाद्या अधिका-याला इतरांपेक्षा सन्मान मिळतो. त्यामागे त्या शिक्षक, अधिका-याची आर्थिक श्रीमंती हे कारण नसते हे लक्षात घ्यायला हवे. त्याचे कारण त्यांची ज्ञानाची श्रीमंती हेच असते. खरंतर तुम्ही कोठे काम करता यापेक्षा तुम्ही ते काम कसे करता याला अधिक महत्व आहे. कामातील दर्जा उत्तम राखायचा असेल तर आणि त्या कामात विविधता आणायची असेल तर त्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय असत नाही.त्यामुळे समाज मनात अभ्यासाची वृत्ती रूजविण्याची गरज आहे.

शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येकालाच अभ्यासाची गरज आहे. आपण जे काही शिकविणार असतो त्या घटकाचे अध्यापन प्रभावी आणि परिणामकारक करण्यासाठी काय काय करता येईल याचा विचार करणे, अध्ययन अनुभवाच्या संदर्भात विविधता आणणे आणि त्यासाठी विविध संदर्भाने सृजनशील विचार करावा लागतो. अभ्यासक्रम बदलला की पाठक्रम, पाठयपुस्तक बदलते. मात्र पाठयपुस्तक बदलतात याचा अर्थ केवळ पाठ, कविता, घटक बदलतात असे होत नाही. अनेकदा त्यामागे नवदृष्टी, नवविचाराचेही प्रतिबिंब असते हे जाणून घेण्याची गरज असते. शिक्षणात काय शिकवायचे, कसे शिकवायचे, कोणाला शिकवायचे यासारखे अनेक प्रश्न रोजच समोर असतात. त्याचा विचार अनिवार्यच असतो.शिक्षणात नित्य नूतन विचाराची प्रक्रिया करण्याची गरज आहे.

शिक्षणाच्या प्रक्रियेत ज्ञानरचनावादी दृष्टीकोन आला आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन सुरू आहे.शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती आणि नव्याने आलेले शिक्षण धोरण, जगाच्या पाठीवर बुध्दीशास्त्रामध्ये झालेले संशोधने, माहिती तंत्रज्ञानात झालेले बदल, त्यांचे शिक्षणातील उपयोजन, अध्ययन , अध्यापन, साधने, तंत्रे यात झालेले बदल लक्षात घेतले तर आपल्याला शिक्षण प्रक्रियेत बदल केल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात येते. त्यामुळे व्यापक अर्थाने विचार करणे आणि त्याचवेळी स्वतःला त्या त्या घटकांच्या अनुषंगाने समृधद् करत राहणे याला कोणताही पर्याय नाही. आपण बदललो नाही तर आपण व्यवस्थेतून कालबाहय होण्याचा धोका आहे. जुन्या ज्ञानावर आपण शिक्षणाच्या प्रवाह बाहेर टाकले जाण्याची शक्यता अधिक आहे. प्रवाहात टिकणे आणि प्रवाहात स्वतःला प्रतिष्ठित करणे यासाठी अभ्यास करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. त्यामुळे संत काय आणि विचारवंत काय त्यांनी अभ्यासाच्या वाटेने जाण्यासाठीच आपल्याला सतत प्रोत्साहीत केले आहे.

जगाच्या पाठीवर प्रतिष्ठित होणे आणि सन्मान प्राप्त करणे यासाठी ज्ञानाची गरज असते. आपल्या देशात काय आणि परदेशात काय सर्वत्र आपण ज्यांना पुज्यनीय मानत आलो आहोत ती माणसं ज्ञानसंपन्न होती. आपल्या देशातील ऋषी, मुनी ही फक्त अध्यात्मिक वृत्तीची होती म्हणून त्यांना सन्मान नाही मिळाला, तर त्यांच्याकडे असलेले ज्ञान हेच त्यांना प्रतिष्ठा देऊन गेले. आपल्या ज्ञानात आणि विद्यार्थी यांच्या ज्ञानात अंतर जितके जास्त असेल तितकी प्रतिष्ठा अधिक असणार आहे. आपण जेव्हा असे म्हणतो की विद्यार्थी व शिक्षक यांच्याकडून शिक्षकांना सन्मान मिळत नाही. तेव्हा शिक्षक म्हणून आपणच आत्मपरिक्षण करायला हवे. आपला पेशा आहे त्यामुळे आपणच आपल्या पेशाबाबत अधिक जागृकता दाखविण्याची गरज आहे. आपल्या पेशाची प्रतिष्ठा उंचावणे हे आपल्याच हातात आहे. त्यामुळे आत्मपरिक्षणाची जबाबदारी देखील आपल्यावरच येऊन पडते आहे.

शिक्षक हे अधिक ज्ञानसंपन्न असतात ,त्यामुळे आत्मपरिक्षण करण्याची शक्ती त्यांच्याच सामावलेली असू शकते. त्यामुळे ही वाट आपण चालणे अधिक महत्वाचे आहे. आपण आपल्या भूतकाळात डोकावून पाहतो तेव्हा पूर्वीच्या शिक्षकाला अधिक सन्मान होता.त्यांना अधिक आदर मिळत होता.त्यांच्या बददल समाजमनात आदरयुक्त धाकही होता. याचे कारण त्यांच्याकडे ज्ञानसंपन्नता. त्यावेळी असलेल्या लोकसमूहापैकी शिक्षक हे तुलनात्मक दृष्टया अधिक ज्ञानसंपन्न होते. शिक्षक व विद्यार्थी यांच्या ज्ञानात देखील अंतर अधिक होते.त्यामुळे त्यांना आदर मिळत होता. समाजात ज्याला अधिक आदर मिळतो तो नेहमीच ज्ञानसंपन्न असतो हे लक्षात घ्यायला हवे.माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन ,ए.पी.जे अब्दूल कलाम यांना राष्ट्रपती म्हणून जरूर सन्मान मिळत होता.मात्र अवघ्या जगाने त्यांना तेव्हाही डोक्यावर घेतले आणि आजही डोक्यावर घेतले जाते याचे कारण त्यांच्यात सामावलेले ज्ञानाची उंची.त्यांचे ज्ञान आणि अभ्यासाने जगावर प्रभाव पडला होता.

संत ज्ञानेश्वरानी देखील ज्ञानेश्वरीत म्हटले आहे की,

म्हणोनी अभ्यासासी कांही / सर्वथा दुष्कर नाही /

यालागी माझ्या ठायी / अभ्यासे मीळ ज्ञानेश्वरी 12/ 113

जगाच्या पाठीवर तुम्हाला काही साध्य करायचे असेल तर काहीच अशक्य नाही.मात्र ते केवळ अभ्यास करणा-यांसाठीच. अगदी आपण ज्या परमेश्वराला प्राप्त करू पाहतो आहोत तो प्राप्त करण्याचे माध्यम देखील अभ्यासच आहे. आपण श्रध्दा, भक्तीने परमेश्वर प्राप्त करू असे वाटत असेल पण तसे तेही शक्य नाही, कारण परमेश्वराच्या प्राप्तीसाठी देखील भक्ती आणि श्रध्देसोबत अभ्यासाच करावा लागेल असे माऊली सांगता आहेत. समर्थ रामदास म्हणता आहेत की, “दिसामाजी काही तरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे” जावे. वाचन आणि लेखन करणे हा अभ्यासच आहे. आपण व्यक्त होणार असलो तरी त्याकरीता अभ्यासोनी प्रकटावे सकळजन. अभ्यास नसेल तर शांत राहणे हे केव्हाही चांगले हे लक्षात घ्यायला हवे. आता संत ज्या मार्गाने जाण्यास सांगता आहेत तो मार्ग आपल्यासाठी सुकर आणि प्रतिष्ठित आहे हे लक्षात घेऊन चालत राहाण्यास काय हरकत आहे.त्यामुळे सर्वच क्षेत्रात यशस्वी होण्याचा एकमेव राजमार्ग आहे तो अभ्यास…हाच आहे.

संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

- Advertisment -

ताज्या बातम्या