मुंबई | Mumbai
ईद-ए-मिलाद निमित्त सोमवारी १६ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर झालेली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने मुंबई शहर आणि मुंबई उपनगर येथे ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे.
या दोन जिल्ह्यात आता १८ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी असेल. तसेच उर्वरित जिल्ह्यांमध्ये त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन सुट्टीबाबत निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने शासन निर्णय काढून या निर्णयाची माहिती दिली आहे.
मुस्लिम संघटनांनी याविषयीची मागणी केली होती. १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असून दोन्ही समाजात एकोपा टिकावा यासाठी मुस्लिम समुदायाकडून मागणी करण्यात आली होती. यंदा मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येणारा ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्दशी लागोपाठ आले आहेत. ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांकडून मिरवणूक काढण्यात येते.
हे ही वाचा : उमेदवारीची ‘माळ’ की हाती ‘टाळ’ याकडे श्रीगोंदाकरांचे लक्ष
तर अनंत चतुर्दशीलाही मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन मिरवणूका काढल्या जातात. राज्यात कुठेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुस्लिम संघटनांनी नुकतीच एक बैठक घेऊन सरकारने ईदची सुटी १६ सप्टेंबर ऐवजी १८ सप्टेंबर रोजी जाहीर करावी, जेणेकरून मिरवणुकाही त्याच दिवशी काढता येतील, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
या मागणीचा विचार करत राज्य सरकारने अधिसूचना काढत मुंबई आणि उपनगरात १८ सप्टेंबर रोजी ईदची सुट्टी जाहीर केली आहे. ईदच्या मिरवणुका १८ सप्टेंबरला काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात ईदची सुटी सोमवार १६ सप्टेंबरला द्यावी की १८ सप्टेंबरला याविषयी जिल्ह्यात निघणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या मिरवणुकांचा विचार करुन संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर करावी, असेही निर्देश अधिसूचनेत देण्यात आले आहेत.
हे ही वाचा : खळबळजनक! बायकोला नांदायला पाठवत नाही म्हणून मेहुण्याच्या ३ वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण करून हत्या