बेंगळुरू | Bangalore
कर्नाटकमध्ये गुरुवारी रात्री भीषण दुर्घटना घडली आहे. कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात जिलेटीन साठ्याचा मोठा स्फोट झाला. स्फोटात आठ जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका ट्रकमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
हा स्फोट जिलेटीन काड्यांनी भरलेल्या ट्रकमध्ये झाल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटामुळे भुकंपासारखे धक्के जाणवले व अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. हा स्फोट गुरुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास झाला. शिमोगा जवळील अबलागेरे गावानजिक रेल्वे क्रशर प्लांट हूणसोंडी येथे स्फोट झाला. यात बिहार राज्यातील आठ मजूर ठार झाले आहेत. शिमोगा ग्रामीणचे आमदार अशोक नाईक यांनी सांगितले, की जिलेटीनने भरलेल्या ट्रकमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाचे कारण अद्याप समजले नाही.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जिलेटिन वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये हा स्फोट झाला. ट्रकमध्ये असणाऱ्या आठ मजुरांचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की परिसरात भुकंपासारखे धक्के जाणवले. मृतांचा आकडा वाढू शकतो. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी उच्चस्तरीय तपासाचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. पीडितांना आवश्यक ती मदत कर्नाटक सरकार उपलब्ध करून देत असल्याचं मोदींनी सांगितलं आहे.