परळी –
भाजपात ज्यांना आम्ही मोठे केले त्यांनीच आज पाठीत खंजीर खुपसला.मुंडे साहेबांच्या जीवनात जे घडले तेच आज माझ्या जीवनात घडत आहे. ती वेळ पंकजावर येवू नये अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो.पक्षातून आम्ही बाहेर पडावे यासाठी त्रास देण्याचे काम सुरु आहे.
मात्र आम्ही पक्ष सोडणार नाही,एकवेळ माझ्यावर भरवसा ठेवू नका मात्र पंकजा पक्ष सोडणार नाही असा घणाघात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेवून आज गोपिनाथगडावरुन वस्रहरण केले.
गोपीनाथ गडावरुन आज भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी चांगलीच फटकेबाजी केली. यावेळी त्यांच्या व्यथाही मांडल्या. खडसेंनी म्हटले की, तुम्हाला आम्ही किती ही छळलं तरी आम्ही तुमच्यासोबत राहू, असे मी नाही महादेव जानकर म्हणत आहेत.
पण ते हे मुंडे साहेब आणि पंकजाताई यांच्या प्रेमापोटी म्हणत आहेत.’जनसंघापासून जेव्हा भाजपची स्थापना झाली. तेव्हापासूनची वाटचाल आम्ही पाहिली. आधी शेटजी भटजींचा पक्ष म्हणून हिणवले जात होते त्या पक्षाला बहुजनांचा पक्ष बनवण्याचे काम मुंडे साहेबांनी केले.असेही त्यांनी स्पष्ट केले.
आम्हाला पाडण्याचे पाप तुम्ही केले हे मान्य करा !
हे राजकीय व्यासपीठ नाही. पंकजाताईंनी सांगितले 10 मिनिटाच्या वर बोलू नका. पक्षावर बोलू नका. पक्ष मला ही प्रिय आहे. पण आज जे पक्षाचे चित्र आहे तर जनतेला मान्य नाही.
तु निवडून येशील असे म्हणायचे आणि दुसर्याला हात द्यायचा. माझ्यावर आरोप झाले. तसेच मुंडे साहेबांवर झाले होते. आपल्याच लोकांनी आपल्याला उद्धवस्त करण्याचे काम केले. आम्हाला पाडण्याचे पाप तुम्ही केले. तर आम्ही काय करायचे सांगा. पंकजाताई पक्ष सोडणार नाही. पण माझा भरवसा धरु नका.
पक्षामध्ये राहून जर अशी वागणूक देत असाल तर पक्षाबाहेर राहून कशी वागणूक द्याल. तुम्ही पक्षाबाहेर जा असं चाललं आहे. मुंडे साहेब असते तर मी मुख्यमंत्री झालो असतो. असेही यावेळी एकनाथराव खडसे यांनी म्हटले. याचवेळी प्रेक्षकांमधून नवीन पक्ष काढा, अशी मागणी करण्यात आली.