मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत आलेला आणि विरोध झालेला एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजप पक्षप्रवेशाबाबतचे काही खुलासे आज केले आहेत. एकनाथ खडसे कोणत्या पक्षात आहेत? या प्रश्नाचे अखेर उत्तर मिळाले आहे. आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असून, पक्षाचे काम सुरू करणार आहे, असे खडसेंनी स्पष्ट केले. यासोबतच भाजपमध्ये प्रवेश होऊनही घोषणा न होण्यामागचे कारण सांगताना भाजपमधीलच दोन नेत्यांची नावे सांगितली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ खडसे महणाले, भाजपच्या नेत्यांची दिल्लीत भेट झाली. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेशाची प्रक्रिया झाली. गळ्यात मफलर देऊन पक्षात प्रवेश झाला असे देखील म्हटले पण, त्यानंतर राज्यातील नेत्यांनी माझा विरोध केला अशी माहिती खुद्द एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
जयंत पाटलांनी माझा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नसल्याचे नमूद केले आहे. “मी भाजपात प्रवेश केलेला नाही. मी आजही शरद पवार गटात आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. पण पक्षाध्यक्षांनी तो स्वीकारलेला नाही. मी स्वत:हून भाजपात मला प्रवेश द्यावा अशी विनंती कधीही केली नव्हती. भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मला सूचना केली होती की तुम्ही भाजपामध्ये या. मी त्यांना सांगितले की मी विचार करेन. म्हणून भाजपात जाण्याचा विषय आला. मुळात माझी फारशी इच्छा नव्हती.पण, भाजपच्या जेष्ठ्य नेत्यांकडून मला सूचना आल्या म्हणून मी प्रवेश केला, असे एकनाथ खडसेंनी म्हटले आहे.
दरम्यान, यावेळी एकनाथ खडसे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन या राज्यातील भाजपा नेत्यांची नावे घेतली. “लोकसभेची निवडणूक होती. त्यात भाजपाचे ९ खासदार निवडून आले. तेव्हा भाजपाची स्थिती नाजूक असल्याचे सर्वेमध्ये दिसत होते. भाजपाला बळकटी मिळावी या हेतूने वरीष्ठांनी मला भाजपा प्रवेशाची विनंती केली असावी. रक्षा खडसे निवडणुकीत उभ्या राहिल्या तेव्हा त्यांना मदत करण्याचे आवाहन भाजपातून मला करण्यात आले होते. मी त्यांना मदत केली, त्या निवडून आल्या. तोपर्यंत मी चांगला होतो. पण निवडून आल्यानंतर मात्र प्रवेशाला विरोध झाला”, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.
ज्या माणसाने ४० वर्ष भारतीय जनता पार्टी उभी केली.हे आज बोलत आहेत ते माझ्या नेतृत्त्वाखाली काम करत होते. यांच्या जीवनात मी त्यांना राजकीय बळ दिले आहे. पंरतु आता ते काही कारणांनी विरोध करायला लागले. पण ठिक आहे, मी देखील भाजपमध्ये जाण्यासाठी फार उत्सुक नव्हतो. भाजप नेत्यांनी मला सूचना दिल्या म्हणून मी पक्षप्रवेशाची तयारी दाखवली. त्याआधी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा