मुंबई | Mumbai
ज्याने संभाजीराजांना हाल करून मारले, हिंदूंची मंदिरे तोडली असा औरंगजेब हा चांगला शासक कसा असू शकतो? असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला. औरंगजेब हा महापापी होता, त्याला चांगला म्हणणाऱ्या अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असेही ते म्हणाले. अधिवेशनासाठी उपस्थित असलेल्या आमदार अबू आझमी यांनी देशभरात औरंजेबाची चुकीची प्रतिमा रंगवली जात असल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारले असता त्यांनी आझमी यांचे विधान अत्यंत चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यांना सडेतोड प्रत्यूत्तर देत आझमी यांनी माफी मागावी असे म्हटले आहे.
औरंगजेब हा चांगला प्रशासक होता. संभाजीराजे आणि त्याची लढाई ही धर्माची नव्हती तर राजकीय होती असं समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी म्हटले. त्यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “चाळीस दिवस संभाजीराजेंना हाल करुन मारले. त्यांचा अपमान केला, अत्याचार केला. अशा अत्याचार केलेल्या औरंग्याला चांगले म्हणणे हे दुर्दैवी आहे. त्याने हिंदूंची मंदिरे तोडली. त्याने गरिबांना लुटले. आया-बहिणींवर अत्याचार केले. त्याने अनेकांना धर्मपरिवर्तन करायला लावले. असा व्यक्ती चांगला प्रशासक होऊ शकतो? औरंगजेब महापापी होता.” मुख्यमंत्री याची योग्य दखल घेतील व योग्य ती कारवाई करतील असे ही ते म्हणाले. अबू आझमींनी राष्ट्रपुरुष, देशभक्तांचा अपमान केला. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली.
काय म्हणाले अबु आझमी?
अबू आझमी यांनी छत्रपती संभाजीराजे व औरंगजेब याच्यातील युद्धाविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता तसेच छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेब यांच्यामध्ये धर्माची लढाई नव्हती सत्तेची होती असे देखील ते म्हणाले आहेत. पुढे त्यांनी यावर बोलताना म्हटले की औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान पासून ब्रम्हदेशपर्यंत होती. त्याकाळात देशाचा जीडीपी २४ टक्के होता. त्यामुळे औरंगजेबाची प्रतिमा सध्या चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे असा दावाही त्यांनी यावेळी केला. औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरांची उभारणी केली असेही ते म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा